वाचन प्रेरणा दिनानिमित्त कविसंमेलन रंगले 

 दि.१७ आॅक्टो.२०२१ रोजी गणेश वाचनालय परभणी व सृजन उर्मी काव्य समूह परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिन अर्थात डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी मा.मोहनजी कुलकर्णी  हे होते.सर्व प्रथम एक पुस्तक एक दिवस या गणेश वाचनालयाच्या उपक्रमांतर्गत *गोदाकाठच्या कविता* या सुचिता पाटेकर यांनी संपादित केलेल्या प्रातिनिधिक कविता संग्रहाचा परिचय  कवी दिलीप चारठाणकर यांनी करुन दिला.परभणी जिल्ह्याचा वैभवशाली इतिहासच या कवितासंग्रहातून अभिव्यक्त झाला आहे ,असे प्रतिपादन त्यांनी केले.
त्यानंतर कवी संतोष सेलूकर कविता संग्रहा विषयी भाष्य करतांना म्हणाले ,"ह्या संग्रहातील शिक्षकांच्या अभिव्यक्ती केवळ शाळा,घर, विद्यार्थी,वर्ग,परिसर शिक्षक या भोवतीच फिरत नसून त्यांना सामाजिकतेचेही भान आहे त्याचबरोबर वास्तवाशी तिचे घट्ट नाते आहे."
पुस्तक परिचयानंतर कविसंमेलनास सुरुवात झाली.यात सर्वप्रथम दिलीप चारठाणकर यांनी 
*मह्या काटेरी बोरीले लाल गाभुळलं बोरं* 
*येती शेजारी- पाजारी चाखी चवं पोरी पोरं*
 ही कविता सादर केली.मनिषा आष्टीकर यांनी
*हरी रोज सेवेस येई जनीच्या तसे गोड नाते जुळावे जरासे नभी चांद आला फुलावे जरासे* ही गझल सादर करुन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.मारूती डोईफोडे यांनी 
*शपथ तुला आठवणींची नाही आठवायचे असे काही अर्ध मिटल्या डोळ्यांनी चुकूनही डोळे नाही खुणवायचे असे काही.*
कविता सादर करतांना रसिक जनांनी दाद दिली.
.दिपक कुलकर्णी यांनी 
*चला मुलांनो आपण सारे पुस्तक वाचू या अज्ञानाच्या अंध:कारा दूर लोटून या* तर

राम जोशी यांनी 
 *ती माणसे वेगळीच होती ही माणसे वेगळी कशी ?* ही बहारदार कविता सादर केली.
प्रेमेंद्र भावसार 
*लटके हसणे बेगडी दिसणे जीवन सारे झाकीच आहे निर्मळ निर्भेळ जगणे अजून बाकीच आहे.* त्यानंतर 
पल्लवी देशपांडे
 *वळवाचा पाऊस होऊन मुक्त बरसायचं होतं थंडीतली उब होऊन तुझ्यासाठी‌ जगायचं होतं*
अशा प्रकारे व्यक्त झाल्या.
संजीवनी खोत यांनी 
*आई हसत सोसते सारे सुखदुःखाचे उनपावसाळे शिणलेल्या तनामनावर फुंकर तिचे हळवे उमाळे* ही कविता तर 
 सारिका काळवीट- सेलूकर 
*यांनी लोपतात सूर्यचंद्र पाहताच मुद्रिका तेवतात दिपमाळ हासताच चंद्रिका*
*कालदंड शंखपुष्प तूच एक शांभवी*
*शूलधारी घोर रुप हा विनाश थांबवी*
ही दुर्गामातेचे चामर वृत्तातील स्तवन सादर केले.
 सुवर्णा मुळजकर यांच्या  *तुझ्या डोळ्यात बिंब माझे पाहता मज छान भासे मी गवसते त्यात मजला हेच माझे रुप खासे* या कवितेला श्रोत्यांनी भरभरून दाद दिली.
मधुरा उमरीकर 
*कसा सोडूनी सांग आम्हास गेला किती जीवनाचा फिका रंग झाला* तर 
भानुदास धोत्रे या कवीने *"गोठ्यात लक्ष्मी गाय दावणीला ||भरवते चारापाणी माय पाहुणीला   ||* अशी सक्षम रचना रसिक जनांसमोर ठेवली.  तर "सोपान डोके,  यांनी *लेक जन्मली म्हणून करु नको चिंता दोन्ही काठ भिजवते लेक वाहती सरिता* अशी 
कविता सादर केली .संतोष सेलुकर यांनी *"पोळणाऱ्या अंतरीच्या भावनांना जाण्आधी जीव गेल्यावर कशाला शोधणे त्या कारणाना.."* या आशयाची सुंदर गझल सादर  केली. अर्चना डावरे *गोडुल्या सानुल्या हात तुझा पदराशी भासे मला* ही कविता सादर करत रसिकांची मने जिंकली..महेश देशमुख यांची
*या ढगांशीया विजांशी जोडलेले नाव आहे मीविजेचा दोष माझे वादळाचे गाव आहे* ही रचना दाद मिळवून गेली.
शेवटी मोहन कुलकर्णी यांनी अध्यक्षीय समारोप करतांना *'ऋतूंचेबरेअसते,अंगावरुन वाहून जातात,देह छिलून जातो;ऋतू अंगात भिनल्यावर पोरी ऋतू घेतात अंगावर..* अशी भावस्पर्शी कविता सादर केली
या बहारदार कविसंमेलनाचे सूत्रसंचलन प्रसिद्ध कवी महेश देशमुख यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिनकर देशपांडे व संदीप पेडगावकर यांनी प्रयत्न केले