कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

तो कोरोनाच होता

तो कोरोनाच होता

चुकवले अंदाज ज्याने तो कोरोनाच होता.
हुकवले मृत्यूपासून ज्याने तो कोरोनाच होता.

भरडून रोज गुळगुळीत आमुचे जाते
टकवले गिरणीस आमच्या ज्याने तो कोरोनाच होता.

देश जेंव्हा बंद होता बंद होती कमाई
धकवले व्यवहार ज्याने तो कोरोनाच होता.

मागमूसही नव्हता भितीचा जीवाला
 ढकलले दाढेत मृत्यूच्या ज्याने तो कोरोनाच होता.

गाव सोडून शहरी रमली होती माणसे
हाकलले शहरातून ज्यांना तो कोरोनाच होता.

बसून घरी आबर चबर खाण्यामूळे
वकवले भडाभडा ज्याने तो कोरोनाच होता

संकटात ही पांघरुन माणूसकीची भरजरी शाल
 चकवले आम्हास ज्याने तो कोरोनाच होता.

नेले हिरावून  प्रियजणांना आमच्यापासून दूर.
दुखवले रात्रंदिन ज्याने तो कोरोनाच होता.

आॅनलाईन क्लास मधील रटाळ शिकवणे ते
पकवले डोक्यास ज्याने तो कोरोनाच होता.

संतोष सेलूकर

Kavita desh

मुख्याध्यापकांचे केबिन 
दारावर नेमप्लेट लावलेली 
ग.दी कुलकर्णी एम ए एम एड 
थोडं आत गेलं की दिसतो 
खूप काही सोसलेला महात्मा गांधींचा फोटो 
त्याच्या बाजूला अखंड भारताचे चित्र डोळ्यासमोर घेऊन हसणारे पंडित नेहरू मोठ्या खिळ्याला जाड दोरीन बांधलेले असतात 
काचबंद चौकटीच्या आतून करारी बाण्याने 
पहात असतात नेताजी सुभाषचंद्र बोस 
मुख्याध्यापकही खिडकीतून न्याहाळत असतात सारे वर्ग बसल्या बसल्याच 
इतक्यात दोन मुलं केबिनमध्ये येतात 
"...सर माझ्या पुस्तकातला भारताचा नकाशा ह्या मन्याने फाडला....."
नकाशाचे तुकडे झालेले पाहून सर जाम चिडतात 
मुले पुस्तक घेऊन निघून जातात.
 नकाशा चे तुकडे टेबलावर तसेच पडलेले.. 
सर मनाशी म्हणतात "तुम्ही तुमचा भारत फाटल्याची तक्रार माझ्याकडे आणली;पण माझी भारत फाटल्याची तक्रार मी कुणाकडे घेऊन जाऊ..
 टेबलावरचे तुकडे वाऱ्याच्या झुळूकीने उडू लागतात..


संतोष सेलूकर
परभणी

शिक्षक म्हणजे विशाल वृक्षच


शिक्षक म्हणजे विशाल वृक्षच असतो 
ज्याच्या फांदी फांदीतून सळसळत असतात बेदरकारपणे ज्ञानाची पानं 
त्याच्याच छायेखाली सौख्य लाभते
अज्ञानाच्या उन्हात न्हाऊन निघालेल्या
अस्फुट चित्कांरांना 
किंवा त्याच्याच रेषेखाली अधांतरी लटकलेली असतात कित्येक भावनांच्या डोहात भिजून नतमस्तक झालेली इवालाल्या चेहऱ्याची निरागस अक्षरे 
शिक्षक नसतो कधीच बिचारा
तोच तर असतो सर्वस्वी बादशहा शाळेचा त्याच्याच स्वामीत्वाने महत्व येत असते शाळेला 
तोच तर असतो खरा संशोधक, शास्त्रज्ञ नखशिखान्त अंधार भरलेल्या चिमूकल्या गोळ्यातून सूर्याचं तेज बाहेर काढणारा
तो समाज सुधारक क्रांती कारकही तोच कित्येक चेतनांना पाठबळ असते त्याच्या समर्थ तत्त्वज्ञानाचे 
शिक्षकाला जपावी लागतात कुतूहलाच्या झाडाची पानं जीवापाडआणि आकार द्यावा लागतो एका मुक्त पणे बागडणाऱ्या
निराकार चैतन्याला
...कधी स्वतःला विसरून बागडावं ही लागतं जाणून घ्यावी लागतात बोल खोल खोल काळजाच्या आतनिर्ममपणे...कधी अंधार ही प्यावा लागतो बिनबोभाटपणे 
तेव्हा कुठे चमकतात उजेडाची किरणं उद्दीष्टांच्या वाटेवर 
त्याच्या सोबतीला असतेच की खडूची धारदार तलवार अन फळ्याची ढाल असते पाठीशी 
विश्वास ठेवा एक ना एक दिवस अंधार संपून उजेडाचे राज्य येईल.
अन तेंव्हा मात्र शिक्षक म्हणून त्याची प्रतिमा अधिक स्पष्ट दिसेल
संतोष सेलूकर
परभणी
७७०९५१५११०























































































































































































































कविता. कवी म्हणजे...

*कविता*
*कवी म्हणजे....*

कवी म्हणजे, कवी म्हणजे,कवी असतो 
ग्रहताऱ्यांत चमकणारा रवी असतो 

कधी गाणारा गवई असतो तर कधी 
उपदेश करणारा मौलवी असतो

कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो.
ग्रहता-यात चमकणारा रवी असतो


शहाणा म्हणावं तर वेड्या धुंदीत राहतो 
वेडा म्हणावं तर शहाणपणाच्या गोष्टी करतो 
कधी कधी तर शेकड्यास सवई असतो 

कवी म्हणजे, कवी म्हणजे,कवी असतो 
ग्रहताऱ्यांत चमकणारा रवी असतो.

कविला नसतात कधी नाती आपली- परकी काही 
प्रत्येक संवेदनेशी असते त्याने नाळ  जोडलेली  
कवी म्हणजे शब्द लेकरांची आई असतो.

कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो 
ग्रहताऱ्यांत चमकणारा रवी असतो.

*संतोष सेलुकर* *परभणी*

तीन प्रतिक्रीया

तीन प्रतिक्रीया
एके दिवशी सकाळच्या उन्हात माखलेला
एक जण भेटला ओळखीचा वाटला म्हणून
ख्याली-खुशाली घेतली तर म्हणाला,
माहीत नाही मजला
मी जगलो कसा अन मेलो कसा
आलो तसाच गेलो
ना वाटले जगावे ना वाटले मरावे


त्याच विचार चक्रात गुंतून राहीलो
दुपार होईपर्यंत
तोच रस्त्यावरून जाणारा दुसरा एक जण
बोलता बोलता म्हणालादिसत नसले जरी
मृत्यूच्या गावाट घर माझे;
याचा अर्थ जीवनाच्या गावात माझे
वास्तव्य आहे असा होत नाही

विचार चक्राने मग तर अधिकच
वेग घेतलासावल्या विखरून गेल्या
पक्षी घरट्याकडे परतायला लागलेले.
नदीच्या काठावर पाण्यात पाय सोडून
बसलेला एक जण दिसला;
तसा माझ्याकडे पाहून हसला
हसत हसतच म्हणाला, “जगतो असा मी की मृत्यूसही वाटते जगावे
धुंद होऊन जगातल्या कणकणात उरावे

संतोष सेलूकर


परभणी 

कवी बाबासाहेब सौदागर

*'सामान्य माणूसच माझ्या लेखनाची प्रेरणा'- *चित्रपट गीतकार* *बाबासाहेब* *सौदागर*. दि.11/08/19 पेठशिवणी ता.पालम येथे विठोबा पाटील वाडेवाले स्मृती साहित्य पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.प्रमुख अतिथी म्हणून लोकप्रिय गीतकार पटकथा लेखक बाबासाहेब सौदागर यांच्या शुभ हस्ते ग्रामीण साहित्यिकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यात बालाजी जाधव अंबड ,अनिता यलमट्टे उदगीर ,वसुंधरा सुत्रावे नांदेड यांचा समावेश होता. प्रास्ताविक शंकर वाडेवाले प्रसिध्द ग्रामीण कवी यांनी केले.मा.बाबासाहेब सौदागर यांनी आपला स्वतःचा संपूर्ण जीवनप्रवास लोकांसमोर मांडला.चित्रपट गीत लेखन करतांना आणि एकंदरच स्वतःचे स्थान निर्माण करतांना किती संघर्ष करावा लागतो हे सांगताना तर अगदी रसिकांचे डोळे पाणावले.ते म्हणाले ,"की ऐन संक्रांतीच्या दिवशी‌ पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र विकून मी गाणं लिहायला कोल्हापूर कडे निघालो.तिथे जगदीश खेबुडकर गाणं जर त्यांना चांगलं वाटलं नाही तर तसाच कागद फाडून तोंडावर फेकतात असे मला कळले होते.म्हणून त्यांच्या समोर जाण्यांची हिम्मत होत नव्हती. मला एक अभंग लिहायला सांगितला.मी एक छान अभंग लिहून खेबुडकरांकडे गेलो.मनात खूप भीती होती.त्यांनी तो अभंग वाचला अन् म्हणाले मला माझ्या गादीचा वारसदार आज मिळाला.लिहीत रहा असा आशीर्वाद दिला. आता १०० पेक्षा अधिक चित्रपटांना मी गाणी लिहीली आहेत. सत्ताधिश चित्रपट स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेला सुद्धा माझीच गाणी आहेत,हे सांगितल्यावर तर रसिकांनी त्यांना गाणं ऐकवण्याचा आग्रहच धरला.लगेच त्यांनी मोबाईल सुरू केला. बोलत होते,मध्ये मध्ये स्वत:चे संघर्षमय जीवन व्यक्त करत होते. पाठीवर झेललेले प्रहार अन् मग कसे पडले गळ्यात हार हे ही त्यांनी उलगडून सांगितले.बाबासाहेब सौदागर म्हणजे मूर्तीमंत प्रतिभेचा झराच जणू.सारं काही सोसून आणि रापून त्यांच्या प्रतिभेला अशी काही धार आलेली आहे की लावणी असो किंवा अभंग असो नाही तर असू दे चित्रपट गीत अथवा मालिकेचे गीत तेवढ्याच निष्ठेने ते लिहीतात.त्यांचे शब्द रसिकांच्या मनाचा ठाव घेतात.त्यांच्या काव्यप्रतिभेला कोणीही सलाम केल्याशिवाय राहत नाही.बाबासाहेब सौदागर आणि आम्ही शेतशिवार प्रतिष्ठाणचे कार्यकर्ते दिवसभर सोबत होतो.त्यांच्या गाण्यातला सच्चेपणा त्यांच्या वागण्या बोलण्यातून ओघळावा त्याप्रमाणे ते अगदी सहज ग्रामीण शेतकरी आणि कामकरी लोकांशी संवाद साधत होते.सामान्य माणूसच माझ्या लेखनाची खरी प्रेरणा आहे हे सांगायला सुध्दा ते विसरले नाहीत.चित्रपट गीतकार म्हणून कुठलाच मोठेपणा न मिरवता भरभरून ते लोकांशी बोलत होते.स्वत:च्या वाट्याला आलेले कटू अनुभव सुद्धा त्यांनी समर्थपणे पेलले परंतु कधी निराश होऊन नशापाणी केले नाही .काव्याची नशा आशा प्रकारे होती की सारं काही त्यामुळंच घडलं,नोकरी सोडून काव्यलेखन करून आपण स्वत:चे कुटूंब चांगल्या प्रकारे चालवू शकतो हा आत्मविश्वास घेऊन ते गीतलेखनाकडे वळले.आज १०० पेक्षा अधिक चित्रपटाला त्यांनी गाणी लिहीली असून पटकथा लेखन ही केले आहे. शंकर वाडेवाले दादा असा वारंवार उल्लेख करत करत ग्रामीण कवितेवर असलेले त्यांचे प्रेम शब्दाशब्दांमधून दिसून येत होते.जेवढी त्यांची गीतलेखनाची प्रतिभा विलक्षण आणि सच्चेपणाची आहे तेवढाच त्यांच्या वागण्या बोलण्यातून व्यक्त होणारा सच्चेपणा विलक्षण वाटतो.स्वत:ची आजी ओव्या गाऊन नवनिर्मीती करायची आणि याच संस्कारातून मी कविता लिहू लागलो.अन्यत:आमच्या घरात कवितेला स्थान नव्हते.शेतीत आईला मदत करत करत सर्व भावंडांचे शिक्षण केले.बहिणीच्या लग्नासाठी स्वत: चा काहीही विचार न करता साटे- लोटे लग्न करण्याचा प्रसंग ही त्यांनी बोलतांना सांगितला. असा हा प्रतिभावंत अस्संल ग्रामीण कवी गीतकार माणूस ज्याला विक्रम गोखलेसारख्या दिग्गंज कलाकाराने हॅट्सऑफ केले.खरोखरंच अतिशय मनस्वी कलावंताला भेटून आम्हाला एखाद्या उंच शिखरावर जाऊन दिव्य काही तरी कामगिरी केल्यासारखी अनुभूती आली तर धन्यवाद! शब्दांकन *संतोष सेलूकर* परभणी ७७०९५१५११०

कविता

                                        प्रतिष्ठा

आयुष्याच्या फांद्या वाढतंच जातात दिवसागणिक्

पानगळ ही ठरलेलीच असते ऋतूनुसार  तरी आपले स्वप्न्‍ असतेच की 

एकावर एक मजले चढले पाहिजेत टुमदार असे

का म्हणून थांबावे  दिवसांनी  आमच्यासाठी  कालचक्र सोडून ?

का म्हणून पाखरांनी  आमच्या  अंगणात येऊन बागडावे मनसोक्त ?

झाडांना फुलांना आपण का नाही विचारत

उन्हाच्या प्रखर झळया अंगावर झेलतांना

कोणता स्कार्फ बांधता नाकातोंडावरून घट्ट  ?

पाखरांना तरी कसे  विचारावे  आपण 

तुमचा फ्लॅट कोणत्या एरियामध्ये आहे म्हणून ?

साधं आभाळ तरी ठेवलं आहे का त्यांना उडायला ?

आपल्या घरांचे रंगीबेरंगी उंचच उंच मनोरे चढवतांना 

आतल्या आत ऐकू येतो का कधी  ? घरटे उध्वस्त्  झालेल्या

पाखरांचा -हदय पिळवटून टाकणारा मूक आक्रोश

अपेक्षांचे जड झालेले ओझे जरासे टेकवून

का नाही  पाहत सरळ उभे राहून इथल्या प्रत्येक गोष्टीकडे  आपण ?

कोणी अशी ही संस्कृती रुजू घातली की

जंगल तोडून बांधा उंचच उंच इमले ?

आणि वाढवा आपली प्रतिष्ठा

एखादे दिवशी  निवारे उध्वस्त्‍ झालेले प्राणी येतील तेंव्हा

पळ काढताल

तुमची प्रतिष्ठा तिथेच टाकून विष्ठेसारखी.!

कसली प्रतिष्ठा घेऊन जन्माला आलात आपण की विष्ठा ?

 

                         संतोश सेलूकर ,परभणी  9822826747

कविता माझी मुलगी

"माझी मुलगी" कवी प्रदीप निफाडकर यांची ही मुलीवरची कविता....( मात्र दुर्दैवं हे की पुण्यात अपघातात निफाडकर यांची मुलगी प्रांजली हिचे  निधन झाले.प्रांजलीचे नुकतेच लग्न झाले होते तिला दीड वर्षाचे बाळ आहे.)
माझी मुलगी

जागोजागी भेटत असते माझी मुलगी
कोणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी

तिला न रुचते नटणे-बिटणे तरी नेहमी
परीसारखी सुंदर दिसते माझी मुलगी

मला मिळाले किती चांगले आई-बाबा
मैत्रिणींना सांगत असते माझी मुलगी

हळूहळू मग चालतात हे वादळवारे
झोक्यावरती जेव्हा बसते माझी मुलगी

कर्जाचा हा डोंगर थोडा हलण्यासाठी
मुलासारखे राबत असते माझी मुलगी

चित्र काढते, पोळ्या करते, गाणे गाते
दु:खालाही खुशाल पिसते माझी मुलगी

गळ्यात माझ्या घास उतरण्या नाही म्हणतो
अवती भवती जेव्हा नसते माझी मुलगी

घरी यायला मला जरासा उशीर होता
आईसोबत जागत बसते माझी मुलगी

तिला लागली गझलांची या खोड आगळी
हळूच रात्री कुशीत घुसते माझी मुलगी

आठवते मज माझी आई अशीच होती
जेव्हा माझे डोळे पुसते माझी मुलगी

तिला न्यायला राजकुमारा उशिरा ये तू
अजुनी मजला अल्लड दिसते माझी मुलगी

 प्रांजलीला भावपूर्ण श्रध्दांजली🙏🏼🙏🏼

कविता

कविता
खूप झेलल्या अंगावरती या अज्ञानाच्या झळा
चलरे बाळा म्हणूनी मज बोलविते ही शाळा

मनामनातून  फुलून येतो गणवेशाचा रंग
पाठीवरती लढण्या दफ्तर ढाल असावी संग
हिमालयाचे शिखर लावतो भिंतीवरच्या फळा
चलरे बाळा म्हणूनी मज बोलविते ही शाळा

मनात माझ्या क्षणात येते लिहू लागतो कविता
चार ओळीच्या शब्दामधूनी अर्थ भेटतो पुरता
मनगंगेच्या तीरावरचा डोलत राही मळा
चलरे बाळा म्हणूनी मज बोलविते ही शाळा

ज्ञान सांडता वेचून घ्यावा अमूल्य असा ठेवा
जरा निसटता हातून आमुच्या वाटत राही हेवा
भंगपावूनी मनात फुटते अज्ञानाची शीळा
चलरे  बाळा म्हणूनी मज बोलविते ही शाळा 

संतोष सेलूकर
प्रा.प.जि.प.शाळा बलसा बु
ता.पूर्णा जि.परभणी
मो.7709515110
ई-मेल Santosh.selukar@gmail.com

कविता शिक्षकाची