प्रतिष्ठा

प्रतिष्ठा


आयुष्याच्या फांद्या वाढतंच जातात दिवसागणिक्

पानगळ ही ठरलेलीच असते ऋतूनुसार  तरी आपले स्वप्न् असतेच की  

एकावर एक मजले चढले पाहिजेत टुमदार असे 

का म्हणून थांबावे  दिवसांनी  आमच्यासाठी  कालचक्र सोडून ?

का म्हणून पाखरांनी  आमच्या  अंगणात येऊन बागडावे मनसोक्त ?

झाडांना फुलांना आपण का नाही विचारत 

उन्हाच्या प्रखर झळया अंगावर झेलतांना 

कोणता स्कार्फ बांधता नाकातोंडावरून घट्ट  ?

पाखरांना तरी कसे  विचारावे  आपण  

तुमचा फ्लॅट कोणत्या एरियामध्ये आहे म्हणून ? 

साधं आभाळ तरी ठेवलं आहे का त्यांना उडायला ?

आपल्या घरांचे रंगीबेरंगी उंचच उंच मनोरे चढवतांना  

आतल्या आत ऐकू येतो का कधी  ? घरटे उध्वस्त्  झालेल्या 

पाखरांचा -हदय पिळवटून टाकणारा मूक आक्रोश 

अपेक्षांचे जड झालेले ओझे जरासे टेकवून 

का नाही  पाहत सरळ उभे राहून इथल्या प्रत्येक गोष्टीकडे  आपण ? 

कोणी अशी ही संस्कृती रुजू घातली की 

जंगल तोडून बांधा उंचच उंच इमले ?

आणि वाढवा आपली प्रतिष्ठा 

एखादे दिवशी  निवारे उध्वस्त् झालेले प्राणी येतील तेंव्हा 

पळ काढताल

तुमची प्रतिष्ठा तिथेच टाकून विष्ठेसारखी.!

कसली प्रतिष्ठा घेऊन जन्माला आलात आपण की विष्ठा ?


संतोष सेलूकर ,परभणी

7709515110