गोदा विकास
दिवाळी 2025
अनुक्रमणिका
अक्र |
शीर्षक |
लेखक |
1 |
काही निवडक पत्रे
|
डॉ.सुचिता पाटेकर |
2 |
नादारीचा सातबारा
(७/१२) आपल्या कवितासंग्रहाविषयी प्रतिक्रिया |
डॉ.सुचिता पाटेकर |
|
ललित |
|
1 |
भारताचा वनपुरुष : जादव मोलाई पायेंग |
डॉ. सुरेश सावंत, नांदेड. |
2 |
फूल |
सतीश पुंडलिक नवघरे |
3 |
मोकळा घसाटा |
सविता देशपांडे परभणी |
4 |
नदीच्या कविता..नदीची गाणी |
मनिषा कुलकर्णी–आष्टीकर |
5 |
शेतकऱ्यांच्या जेंव्हा स्वप्नांचा चिखल होतो ! |
मारोती भु . कदम |
6 |
तिचं माहेरपण |
सौ.शारदा श्रीकृष्ण वानखेडे |
7 |
देणा-याने देत जावे
(नाटिका) |
सौ सुप्रिया श्रीमाळी |
8 |
परिपाठ |
श्रुती संतोष सेलूकर |
|
|
|
|
कथा … |
|
1 |
दुधावरची साय! |
सौ. अर्चना गिरीश डावरे |
2 |
करता करविता.. |
प्रशांत भंडारे |
|
पुस्तक परिचय.. |
|
1 |
आजचे टोकदार वर्तमान.. |
प्रा. महेश मोरे,नांदेड |
2 |
आभाळाच्या मुली |
प्रा. साईनाथ पाचारणे, पुणे |
3 |
वा-या रे वा-या |
सुभेदार शिवाणी भारत
|
|
|
|
|
काव्यरंग … |
|
|
|
|
1 |
झाड आणि रक्त |
देविदास फुलारी |
2 |
युद्ध बाकी आहे |
ज्ञानेश्वर गायके |
3 |
गुज |
जगदीश कदम |
4 |
शेतीचे अभंग |
रमेश चिल्ले |
5 |
गोंधळलाय माणूस |
नारायण शिंदे |
6 |
फुलराणी |
प्रतिभा जगदाळे |
7 |
दिवसेंदिवस |
डॉ.संतोष सेलूकर |
8 |
कविता |
संजय जगताप |
9 |
माझ्या मायचं पुराण |
रामदास केदार |
10 |
नियती |
अश्विनी गहणकारी |
11 |
कोपले आभाळ |
पंडित पाटील |
12 |
बाप कल्पतरुचे झाड |
व्यंकट अनेराये |
13 |
पाारखी |
विठ्ठल सातपुते |
14 |
निसर्ग |
संगिता आवचार |
15 |
बदली |
सारिका काळवीट |
16 |
मन ,अव्दैत
,आंतरजाल |
दिनकर के. देशपांडे |
17 |
कहाणी |
ललिता गादगे |
18 |
गावाकडाचा पाऊस |
विरभद्र मिरेवाड |
19 |
आश्वत्थमी व्यथा |
डॉ.अविनाश कासांडे |
20 |
दान भुईचे |
प्रशांत भंडारे |
21 |
दोर |
संजय चिटणीस |
22 |
धिरोदात्त असा एक
,सावरुन घ्यावे,नदीरुप एकरुप |
तुकाराम खिल्लारे,परभणी |
23 |
ओढ माहेराची |
सौ.शारदा वानखेडे |
24 |
बाई जन्माचं व्याज
म्हणून , प्रकाश वाट |
मधुरा उमरीकर |
25 |
मराठी माणूस धन्य
पावले |
सविता उमेश वडगावकर |
|
| |
|
काही निवडक पत्रे
आदरणीय
कविवर्य
शंकर
वाडेवाले सर
नमस्कार
आपला "वाऱ्या रे
वाऱ्या " कविता संग्रह वाचला. आपणआपला हा कवितासंग्रह प्रिय नकोशीला समर्पित केला
याचा फार आनंद झाला. बाल विश्वातील वेगवेगळ्या कल्पनांना आपण शब्दबद्ध करून बालवाचकांसाठी
आनंदाचा खजिनाच उपलब्ध करून दिलेला आहे. बाहुली,शुभमंगल,हत्तीदादा, मनीमाऊ, चिऊताई,
मोती असे अनेक बालगीतं शब्दांचे यमक असल्यामुळे नक्कीच गुणगुणायला मुलांना आवडेल.
हत्तीदादा बालकवितेत
फताडे पाय... खूप छान कल्पना आपण केली ती मला फार आवडली... प्राण्यांची शाळा कवितेत
शिक्षणाधिकाऱ्याचा पण उल्लेख आपण केलेला आहे... माझं पद पाहून मला खूप हसायलाही आले
आणि आनंदही झाला. शिक्षणाधिकारी पण प्राण्यांच्या शाळेत असतात हे मला त्यातून कळलं...
मुखपृष्ठ व कविता संग्रहातील रेखाटणे श्री
संतोष घोंगडे सरांनी अत्यंत आशययुक्त साकारलेली आहे...
एकंदरीत बालवाचकांच्या पसंतीला उतरणारा
कवितासंग्रह म्हणून मी "वाऱ्या रे वाऱ्या" बालकवितासंग्रहाचे कौतुक करते....
बाल साहित्यांमध्ये आपल्याकडून अधिकाधिक
साहित्याची भर पडत राहो अशा शुभेच्छा देते...
डॉ.सुचिता पाटेकर
शिक्षणाधिकारी योजना पुण
आदरणीय कविवर्य
नमस्कार
नादारीचा
सातबारा (७/१२) आपल्या कविता संग्रहातील शेतकऱ्यांच्या आयुष्याचे वास्तव व्यक्त करणाऱ्या
कविता समजून घेतल्या. त्यातून आपण काव्यरूपात व्यक्त केलेल्या भावना अश्रूंना वाट मोकळी
करून देतात.....कारण मी सुद्धा शेतकऱ्याची लेक आहे आणि हे मी अनुभवलं आहे.
" तीळ काराळ बुडाले
फुटे उडीदाला मोड"
" पावसाचा धिंगाणा
जीव खालीवरी...
सारं गेलं हिसाळ्या
उधळल्या तुरी...."
या
काव्यपंक्तीतून हाती आलेलं धान्य कसं निसर्गाच्या कोपात डोळ्यासमोर नाहिसं होते....याचे
चित्र उभे राहते.
" बियाणे निक्क
पेरून आलो
पाऊस पसार हाराशीत गेलो.."
" आडतीत माल नेला
नाही तिथं मोल त्याला...
मातऱ्याचं दाम मला निक्की
रास अडत्याला..."
अशाप्रकारे नादारीचा सातबारा म्हणजे आपल्या मनातील
शेतकऱ्यांविषयी वाटणारी भावना आपण कागदावर शब्द रूपात मांडून समाजापुढे आणली....
मुखपृष्ठावर आपला शेतकऱ्याच्या वेषातील तील फोटो
मुखपृष्ठकार विजयकुमार चित्तरवाड यांनी सुबक पद्धतीने मांडलेला आहे....
.......
श्री दत्ता डांगे सहृदय व्यक्तीमत्व आपल्याला पुस्तकाचे प्रकाशक म्हणून लाभले......
योगायोग जुळून आला.....आपल्या पुढील साहित्य कृतीसाठी खूप खूप शुभेच्छा....
डॉ.सुचिता पाटेकर
शिक्षणाधिकारी योजना पुणे
भारताचा वनपुरुष : जादव मोलाई पायेंग
डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
ही गोष्ट आहे आसाम राज्यात घडलेली. गोष्ट तशी फार जुनी नाही, अगदी ४५ वर्षांपूर्वी घडलेली. गोष्ट कसली, चमत्कारच हा! एका साध्यासुध्या माणसाने आपल्या समर्पणातून घडविलेला चमत्कार!कोणी कल्पनाही केली नव्हती, असा नेत्रदीपक चमत्कार! गोष्ट वाचून कदाचित आपलाही विश्वास बसणार नाही, असा चमत्कार! वाळलेल्या खोडाला हिरवीगार पालवी फुटावी, असा चमत्कार! जन्मापासूनच अंध असलेल्या माणसाला अचानक दृष्टी यावी, असा चमत्कार! माणसाला अचानक शिंग फुटावेत, असा चमत्कार! अडचणी सांगणा-या आळशी माणसांचे डोळे उघणारा चमत्कार!
आसाम राज्यात ब्रह्मपुत्रा आणि सुबनसिरी ह्या नद्या वाहतात. ह्या दोन नद्यांच्या संगमावर 'माजुली' हे बेट तयार झाले आहे. हे बेट पूर्वी जोरहाट जिल्ह्यात होते. अलीकडेच माजुली हा नवीन जिल्हा झाला आहे. ह्या दोन्ही नद्यांना दरवर्षी महापूर येतो. त्यामुळे 'माजुली' बेटावर दरवर्षी वाळू, गाळ आणि चिखल साचतो. दरवर्षी येणाऱ्या महापुरामुळे बेटाची जमीन खचून जाते. त्या निर्जन बेटावर झाडेझुडपे नसल्यामुळे मातीला धरून ठेवण्याची काहीच सोय नव्हती. झाडेझुडपे असती, तर त्यांच्या मुळांनी माती धरून ठेवली असती. पुराचे पाणी थोपवून धरले असते. पाणी परतवून लावले असते. पण त्या रेताड जमिनीवर तशी काहीच सोय नव्हती. झाडेझुडपे नसल्यामुळे त्या बेटावर कसलीच सावली नव्हती. पाऊस पडून गेल्यावर तिथे भयंकर गर्मी होत असे. त्यामुळे तिथे जीवजंतू जगणे अवघड झाले होते. जीवजंतू आणि वनस्पती जगण्यासाठी वातावरण अनुकूल असावे लागते. इथे तर सगळीच प्रतिकूल परिस्थिती. अशा ओसाड जमिनीत, शापित भूमीत १९७९मध्ये एक चमत्कार घडला.
रामायणातली एक गोष्ट सांगितली जाते. आपल्यापैकी अनेकांनी ऐकलेली आख्यायिकाच ती. खरी-खोटी, माहीत नाही. अहिल्या नावाची एक स्त्री, कोणा एका रागीट ऋषीच्या शापामुळे जंगलात दगड होऊन पडली होती. 'पुढे वनवासात प्रभू रामचंद्र येतील आणि त्यांच्या पदस्पर्शाने तुझा उद्धार होईल', असा त्या ऋषीने त्या अहिल्येला उ:शाप दिलेला होता. ठरल्याप्रमाणे पुढे कधीतरी प्रभू रामचंद्र त्या जंगलात आले आणि त्यांच्या पदस्पर्शाने अहिल्येचा उद्धार झाला. ती पुन्हा स्रीरूपात आली, असे सांगितले जाते. या गोष्टीचा अर्थ इतकाच घ्यायचा, की कोणाच्या पावलांनी कोणत्या वस्तूचा, व्यक्तीचा आणि जागेचा उद्धार होईल, हे सांगता येत नाही.
तसाच प्रकार माजुली बेटावर घडला.
ही घटना घडली १९७९ साली. सोळा वर्षांचा एक मुलगा दहावीची परीक्षा देऊन माजुली बेटावरून पायीपायी आपल्या सपोरी गावी जात होता. त्या वर्षी ब्रह्मपुत्रा नदीला महापूर येऊन गेला होता. त्या महापुरामुळे परिसरात खूपच नुकसान झाले होते. त्या मुलाला वाटेत अनेक साप मृतावस्थेत दिसले. एक-दोन साप मेले असते, तर कुणी तरी ते मारले असावेत, असे वाटले असते. पण साप संख्येने जास्त होते. ते कुणी तरी मारले असण्याची शक्यताच नव्हती. पुराच्या पाण्यासोबत वाहून आलेले जखमी साप. काही मेलेले, तर काही मरणाच्या दारात असलेले साप. त्या मुलाला ह्या गोष्टीचे आश्चर्य वाटले. वाईटही वाटले. त्याने ह्या गोष्टीचा छडा लावण्याचे ठरविले. त्याने आपल्या गावी गेल्यावर जाणत्या माणसांशी या विषयावर चर्चा केली.
चर्चेनंतर त्या मुलाला समजले, की माजुली बेटावर झाडेझुडपे नसल्यामुळे असे होत आहे. गाव आणि परिसरातील पशुपक्ष्यांचीही संख्या कमी झाली होती. जिथे किडेमुंग्याही जगू शकत नाहीत, तिथे साप कसे जगणार? मग यावर उपाय काय? बेटावर झाडे लावणे आणि ती जगवणे हाच त्यावरचा एकमेव उपाय होता. उपाय सापडला, पण तो करणार कोण? हे काही एकट्या-दुकट्याचे काम नव्हते. एकट्याने प्रयत्न करणे म्हणजे फाटलेल्या आभाळाला शिवण्यासारखे होते. त्या मुलाने गावकऱ्यांना सांगितले, आपण सगळे मिळून बेटावर झाडे लावू. ती झाडे जगवू, तरच आपण जगू शकतो. नाहीतर एक दिवस आपणही त्या सापांसारखे तडफडून मरून जाऊ. आपले जगणे-मरणे आता आपल्याच हातात आहे.
लोकांनी ऐकून न ऐकल्यासारखे केले. काही लोकांनी त्या मुलाचे हे म्हणणे हसण्यावारी नेले. काही लोक म्हणाले, हा शुद्ध वेडेपणा आहे. आपण निसर्गाच्या विरोधात जाऊच शकत नाही. निसर्गाच्या मनात असते, तर निसर्गानेच इथे झाडे लावली असती. निसर्गानेच झाडे वाढवली असती. निसर्गानेच इथे जंगल तयार केले असते. निसर्गाच्या विरोधात जाणारे आपण कोण? निसर्गापुढे आपली ताकदच किती! निसर्गाच्या पुढे माणूस म्हणजे अगदीच किडामुंगी! निसर्गापुढे आपला काय निभाव लागणार! ज्यांना काहीच करायचे नसते, ते लोक असेच बोलत असतात.
तो मुलगा जंगल खात्यातील अधिकाऱ्यांना भेटला. त्याने अधिकाऱ्यांना विनंती केली, 'माजुली बेटावर झाडंझुडपं नसल्यामुळे बेटावर जीवजंतू जगत नाहीत. साप मरून पडत आहेत. आमच्या परिसरातील पशुपक्षी कमी झाले आहेत. मी ह्या बेटावर झाडे लावू इच्छितो. मला तुमची मदत पाहिजे'.
त्यावर अधिकारी म्हणाले, 'ती जमीन शापित आहे. वर्षानुवर्षे पडीक पडलेली आहे. दरवर्षी महापूर येतो आणि सुपीक मातीचा थर वाहून जातो. त्यामुळे त्या जमिनीत काहीच उगवत नाही. तिथे झाडे लावणे म्हणजे खडकावर पेरणी करण्यासारखे आहे. आम्ही तुला काहीच मदत करू शकत नाही. तुला तुझ्या एकट्याच्या हिमतीवर जे करायचे ते कर'.
असे सांगून जंगल खात्यातील अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी झटकली. वास्तविक झाडे लावणे, ती जगवणे, वाचवणे आणि वाढवणे हे जंगल खात्यातील अधिकाऱ्यांचे काम. ते आपले काम करत नव्हते. मदत करायलाही तयार नव्हते. उलट 'त्या' जमिनीत काहीच उगवणार नाही, असे सांगून त्या मुलाचा हिरमोड केला. ज्यांना काहीच करायचे नसते, ते लोक अशीच कारणे सांगत असतात. अशाच पळवाटा शोधत असतात. म्हणतात ना, न करत्याचा वार शनिवार!
जंगल खात्यातील अधिकाऱ्यांनी वाजवलेली नकारघंटा ऐकून तो मुलगा निराश झाला नाही. ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असते, तो अशी कारणे सांगत नाही. पळवाटा शोधत नाही.
हिंमतबाज माणूस समस्येपासून दूर पळत नाही, तो त्या समस्येला भिडतो. समस्येला सामोरा जातो. आव्हानांना तोंड देतो. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करतो. जो प्रवाहाच्या विरुद्ध पोहतो, तोच इतिहास घडवतो. जो परिस्थितीला वाकवतो, त्याचेच नाव इतिहासात सोनेरी अक्षरांत लिहिले जाते. झपाटलेली माणसे असे काही अद्भुत काम करून जातात, की पुढे लोक त्यालाच 'चमत्कार' समजायला लागतात. खरे तर तो क्षणात घडलेला चमत्कार नसतोच. त्याच्या पाठीमागे असते त्या माणसाची जिद्द, चिकाटी, परिश्रम, झपाटलेपण, त्याग, समर्पण आणि प्रचंड मेहनत. यातूनच उभे राहते ते अविश्वसनीय असे काम! असेच अविश्वसनीय काम 'त्या' मुलाने उभे केले.
माजुली बेटाचे वाळवंट होण्याच्या मार्गावर होते. 'त्या' मुलाने असा विचार केला नाही, की कोणी तरी हे काम करतील आणि मी दुरून पाहीन. त्या मुलाने ठरविले, की जरी मला कोणी मदत केली नाही, तरी हरकत नाही. हे काम मी एकट्याने करीन आणि सगळे लोक ते पाहातच राहतील. त्या मुलाने मनाशी चंग बांधला की, जर कोणीच करणार नसेल, तर आपणच एकट्यानेच ते करू.
बघू, काय होते ते! फार तर यश येईल किंवा अपयश. यापेक्षा अधिक काय होणार आहे! तो मुलगा झपाटल्यासारखा कामाला लागला. खरे तर हे काम अजिबात सोपे नव्हते. वर्षानुवर्षे पडीक पडलेल्या जमिनीवर हिरवळ फुलविण्याचे स्वप्न पाहणे म्हणजे आकासाला गवसणी घालण्याचाच प्रकार होता. तसे करण्यासाठी तो मुलगा पुढे सरसावला. त्या १६ वर्षीय मुलाचे नाव होते जादव मोलाई पायेंग. दि. ३१ ऑक्टोबर १९६३ रोजी एका गरीब आदिवासी कुटुंबात त्याचा जन्म झालेला. त्याच्या आईचे नाव अफुली पायेंग आणि वडलांचे नाव लखीराम पायेंग.
जादव मोलाई पायेंग याने पुढचे शिक्षण सोडून दिले आणि माजुली बेटाचे रंगरूप बदलण्यासाठी कंबर कसली. १९७९च्या एप्रिल महिन्यातील पहिल्याच दिवशी त्याने बांबूची २५ रोपे लावली. विविध झाडांच्या ५० बिया मिळवून त्यांचे रोपण केले. माजुली बेटावर मुंग्या नव्हत्या. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी मुंग्या तर आवश्यक आहेत. म्हणून जादवने दुसरीकडून मुंग्या पकडून आणून बेटावर सोडल्या. १९८०च्या दशकात आसाममध्ये सशस्त्र उठाव होत होते. त्या काळात हा माणूस हातात अवजारे घेऊन माजुली बेटावर झाडे लावत होता. एकीकडे विद्रोही लोक आसामच्या रस्त्यांवर रक्त सांडत होते आणि जादव माजुली बेटावर हिरवे स्वप्न पाहत होता. दिवसरात्र एकच काम, वेगवेगळी झाडे लावणे आणि त्यांना पाणी घालणे. तो दररोज किमान एक तरी झाड हमखास लावत असे. ज्या दिवशी एकही झाड लावले नाही, असा एकही दिवस गेला नाही. मागील ४० वर्षांत त्याने या बेटावर ४ कोटींपेक्षा अधिक झाडे लावली आहेत. हे काम करताना तो तहानभूक विसरून जात असे. तो लग्न करायचेही विसरून गेला होता.
वयाच्या सोळाव्या वर्षापासून सव्विसाव्या वर्षापर्यंत तो बेटावर एकटाच रमला होता. त्याला वृक्षारोपणाशिवाय दुसरे काहीच सुचत नव्हते. एके दिवशी त्याचे काम पाहण्यासाठी गावातील काही लोक तिथे आले. आदिवासी समाजात मुलामुलींची लग्नं लवकर होतात. सव्वीस वर्षे, म्हणजे जादवचे लग्नाचे वय जास्तच झाले होते.
ते लोक म्हणाले, 'तू आता म्हातारा झाल्यावर लग्न करणार आहेस का?'
'काय करायचय लग्न करून?' जादवने लोकांनाच प्रतिप्रश्न विचारला.
'तू मेल्यावर, तुझं नाव सांगायला तुला लेकरं झाली पाहिजेत.' गावकरी म्हणाले.
'मी लावलेली झाडंच माझं नाव सांगतील'. जादव मोलाई पायेंग मोठ्या आत्मविश्वासाने बोलला.
लोक म्हणाले, 'झाडं बोलत नसतात. लवकर लग्नाला तयार हो. आणखी उशीर केलास, तर तुला कोणी मुलगी देणार नाही'.
अखेर तो कसाबसा लग्नाला तयार झाला. सव्विसाव्या वर्षी त्याचे लग्न झाले. त्याच्या पत्नीचे नाव बिनिता पायेंग. लग्नानंतर पायेंग पतिपत्नी त्याच बेटावर राहू लागले.
जादव मोलाई पायेंग हा मेलेली माती जागवणारा माणूस आहे. त्याने माजुली बेटावरील मृत झालेल्या मातीत प्राण फुंकले. गेल्या चाळीस वर्षांत, जादवने लावलेली ४ कोटी झाडे खूपच वाढली आहेत. १३६० एकरांत त्यांचे किर्र जंगल तयार झाले आहे. वडापिंपळाची झाडे चांगलीच बहरली आहेत. बांबूच्या बनात आता बाराही महिने वारा शीळ घालत असतो. एके काळी ह्या जंगलात मुंग्या बघायला मिळत नव्हत्या. वाईट वातावरणामुळे साप मरून जात होते. आता हे जंगल म्हणजे बंगाली वाघ, हरीण, ससे, वानरे, हत्ती, गेंडे आणि विविध प्रकारचे पक्षी यांचे अभयारण्य बनले आहे. ह्या जंगलातली जैवविविधता कल्पनेपेक्षा अधिक वाढली आहे. दरवर्षी हत्तींचा एक कळप ह्या जंगलात तीन महिने मुक्कामाला असतो. एकदा वनअधिकारी जंगली हत्तींचा शोध घेत ह्या जंगलात पोहोचले, तेव्हा ह्या जंगलाची भव्यता त्यांच्या लक्षात आली. हे तेच अधिकारी होते, ज्यांनी जादवला मदत नाकारली होती. त्या जमिनीत काहीच उगवणार नाही, असे सांगून त्याची हिंमत खच्ची करण्याचा प्रयत्न केला होता.
२००८ साली एका पत्रकाराने ह्या जंगलात जाऊन जंगलाविषयी एक वृत्तमालिका लिहिली. अनेकांनी ह्या जंगलाविषयी वृत्तचित्रे आणि डॉक्युमेंटरी तयार केल्या आहेत. यू ट्यूबवर त्या डॉक्युमेंटरी पाहायला मिळतात. त्यामुळे एका माणसाने वाढविलेले हे जंगल जगाला माहीत झाले.
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात अनेकांच्या परिश्रमातून सेंट्रल पार्क ही बाग विकसित करण्यात आली आहे. जादव मोलाई पायेंग ह्या एकाच माणसाने तयार केलेले 'माजुली वन' सेंट्रल पार्कपेक्षाही मोठे आहे.
दि. २२ एप्रिल २०१२ रोजी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात जादव मोलाई पायेंग यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी त्यांनी जंगलाच्या जडणघडणीविषयीचे आपले अनुभव कथन केले. ते ऐकून सगळेच थक्क झाले. अतिशय प्रभावित होऊन कुलगुरू डॉ. सुधीर कुमार सोपोरी यांनी त्यांना 'फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया' (भारताचा वनपुरुष) ही उपाधी बहाल केली.दि. ३१ जानेवारी २०१५ रोजी भारत सरकारने त्यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते 'पद्मश्री' हा किताब देऊन गौरविले.२०१७च्या ऑक्टोबर महिन्यात भोपाळ येथील भारतीय वनप्रबंधन संस्थेने त्यांना सन्मानित केले.
आसाम कृषी विद्यापीठ आणि काझीरंगा विद्यापीठ ह्या दोन विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टरेट ही पदवी दिली आहे. दहावीपर्यंत शिकलेल्या, एका अल्पशिक्षित माणसाला दोन- दोन विद्यापीठांनी मानद डॉक्टरेट देणे ही मोठीच गोष्ट आहे! त्या वेळी केलेल्या भाषणात जादव मोलाई पायेंग म्हणाले, की तुम्ही निसर्गावर प्रेम करा. निसर्ग तुमच्यावर प्रेम करतोच.
जादव मोलाई पायेंग यांच्या सन्मानार्थ त्यांनी विकसित केलेल्या जंगलाला 'मोलाई फॉरेस्ट' (मोलाई वन) असे नाव देण्यात आले आहे. 'मोलाई वन' म्हणजे एका सामान्य माणसाच्या
एकाकी प्रयत्नांतून जगात किती मोठा बदल होऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात, २०२४मध्ये न्यूज १८ ह्या वृत्तवाहिनीने 'अमृत रत्न' हा विशेष सन्मान देऊन त्यांचा गौरव केला. 'पर्यावरणवादी कार्यकर्ता' म्हणून जादव मोलाई पायेंग हे नाव आता केवळ भारतापुरते मर्यादित राहिलेले नाही. आता हे नाव जागतिक स्तरावर पोहोचले आहे. जगातील विविध देशांना ते पर्यावरणसंरक्षण आणि पर्यावरणसंवर्धनाच्या बाबतीत मदत आणि मार्गदर्शन करत असतात.
जादव मोलाई पायेंग म्हणतात, 'निसर्गाशिवाय आपण जगूच शकत नाही. म्हणून पर्यावरणसंरक्षणाचे आणि पर्यावरणसंवर्धनाचे धडे शालेय जीवनातच दिले पाहिजेत'.
जादव मोलाई पायेंग यांनी केलेले कार्य अजोड असे आहे. पर्यावरणसंरक्षणाचे काम करून त्यांनी मातृभूमीचे ऋण फेडले आहे. अशक्य ते शक्य करून दाखवले आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व आपल्या समाजासाठी अतिशय प्रेरणादायी आहे. ते भारतातले खरेखुरे हीरो आहेत. ते खरेखुरे आयडॉल आहेत. त्यांनी उभा केलेल्या जंगलामुळे आता माजुली बेटाची जमीन खचत नाही. माती वाहून जात नाही. मोलाई वन आता हवामान बदलाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झाले आहे. जादव यांनी लावलेली कोट्यवधी झाडे कार्बन डाय ऑक्साईड वायू शोषून घेतात आणि मुबलक प्राणवायू देतात. त्यांनी निसर्गसंवर्धनाबरोबरच मानवतेचे फारच मोठे कार्य केले आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे, जादव मोलाई पायेंग यांच्या कार्याविषयीचा पाठ अमेरिकेतील शालेय पाठ्यपुस्तकांत समाविष्ट करण्यात आला आहे.
एकदा एका पत्रकाराने त्यांना विचारले, 'तुम्ही एकट्याने, एकहाती हे एवढे मोठे जंगल उभे केले आहे. हे तुम्हाला एकट्याला कसे शक्य झाले?'
त्यावर जादव मोलाई पायेंग अतिशय नम्रपणे म्हणाले, 'मी एकटा कुठे आहे? मी एकट्याने काहीच केलेले नाही. मी दुबळा, एकटा काय करू शकलो असतो? सुरुवातीला मी काही झाडे लावली. ती वाढवली. ती झाडे मोठी झाली. त्यांना फुले-फळे आली. त्या झाडांनी मला बिया दिल्या. त्याच बिया मी जमिनीत पुरल्या. त्यांची पुन्हा झाडे झाली. वारा, पक्षी, गायी, हत्ती, वानरे आणि ब्रह्मपुत्रा नदीनेही मला या कामी खूप मदत केली, आणि हे चक्र वाढतच गेले. मला निसर्गाने खूप चांगली साथ दिली. त्यामुळे हे माझ्या एकट्याचे श्रेय नाही. हे सगळे मुके सोबती माझ्या सोबत होते, म्हणूनच मला हे शक्य झाले'.
काही माणसे छोट्याशा कामाचेही श्रेय ओढून घेतात. इथे या माणसाने अभूतपूर्व काम करून दाखवले, तरी त्याचे श्रेय ते घेत नाहीत. केलेल्या कामाचा त्यांना अहंकार नाही. केलेल्या कामाचे श्रेय नाकारण्यासाठी जो मनाचा मोठेपणा असावा लागतो, तो मनाचा मोठेपणा आणि नम्रता जादव मोलाई पायेंग यांच्याकडे आहे.
एकदा 'हत्ती आमची घरे पाडतात, आमच्या शेतीचे नुकसान करतात', म्हणून शेजारच्या गावातील काही लोक मोलाई वनातील झाडे तोडण्यासाठी हातात कु-हाडी घेऊन आले होते. त्यांना हात जोडून नम्रपणे विनंती करत जादव मोलाई पायेंग म्हणाले, 'ह्या जगात जसा आपल्याला राहण्याचा अधिकार आहे, तसाच जंगली प्राण्यांनाही अधिकार आहे. तेही ह्या निसर्गाचे घटक आहेत. झाडांवर कु-हाड चालविण्याआधी तुम्हाला माझ्यावर कु-हाड चालवावी लागेल. ह्या झाडांसाठी, ह्या पशुपक्ष्यांसाठी मी मरायला तयार आहे'.
जादव मोलाई पायेंग यांचे हे शब्द ऐकून आक्रमक लोकही शरमिंदे झाले. त्यांची चूक त्यांच्या लक्षात आली.
जादव म्हणतात, 'मी आयुष्यात कधीच थांबणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत झाडे लावत राहीन. झाडे जगवत राहीन. कारण झाड हाच माझा श्वास आहे'.
'मी एकटा आहे. मी एकटा काय करणार?' असे सांगून काम टाळणा-या चुकार लोकांना जादव मोलाई पायेंग यांनी खणखणीत उत्तर दिले आहे. मनात आणले, तर एकटा माणूसही किती मोठे परिवर्तन घडवू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे जादव मोलाई पायेंग यांनी आपल्या समर्पणातून उभे केलेले 'मोलाई वन' होय.
डॉ. सुरेश सावंत,
मथुरेश
बंगला, क्र. १. १९. २२०, राज मॉलच्या पाठीमागे, आनंदनगरजवळ,
शाहूनगर,
नांदेड ४३१ ६०२.
भ्र.
९४२२१७०६८९, ८८०६३८८५३५.
कथा …
दुधावरची साय!
सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेलं अतिशय सुंदर अस हिरवंगार कृष्णाई गाव. डोंगराच्या कुशीतून ओढे-नाले झुळझुळत त्या गावाच्या चौफेर वाहायचे. सकाळी तांबड्या प्रकाशात गावाचे आकाश सोन्याचं भासत असे, तर संध्याकाळी वारा मातीचा गंध मनसोक्त उधळत असे. या गावाच्या मध्यभागी भलमोठं विठ्ठल मंदिर होतं. त्याच्या उंच कळसावरून उडणाऱ्या पाखरांच्या किलबिलाटात रोज संध्याकाळी घणघणणाऱ्या घंटांचा निनाद पसरायचा.
मंदिराच्या शेजारीच विनायकरावांचे घर होते. त्यांच्या घराचं अंगण खूपच प्रशस्त होतं, जे प्राजक्त, चाफा, मोगरा, जाई, जुई यांनी दाटलं होतं आणि अंगणाच्या मध्यभागी कृष्णतुळशीचं रोप वृंदावनात प्रचंड बहरलेलं होतं.या वृंदावनाशेजारी राधा काकू
नित्यनियमाने सांज दिवा लावायच्या. दिव्याच्या त्या प्रकाशात अंगण आणि घर उजळून निघायचं. विनायकराव गावात कीर्तनकार म्हणून मानले जायचे. देवळातल्या कीर्तनात ते जेव्हा हरिपाठ घेत, तेव्हा मंडळी एवढी तल्लीन व्हायची की, गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी यायचं. त्यांच्या कीर्तनाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ते खूप सुंदर बासरी वाजवीत. त्यांच्या बासुरीच्या सुरामुळे साऱ्या वातावरणात माधुर्य पसरायचं. विनायकराव खूप मोकळ्या स्वभावाचे त्याच्यामुळे त्यांचा गोतावळा ही खूप मोठा होता. त्यांचे काही जिवलग मित्र दर आठवड्याला त्यांच्या घरी जमायचे. कधी कुटुंबाची चौकशी, कधी शेतीची चर्चा, भजनकीर्तन तर कधी बासरीच्या सुरांत न्हाऊन निघायचे.
“विनायकराव, ही बासरी तर देवाचीच देणगी आहे हो,” गणू काका म्हणायचे.
तेव्हा विनायकराव म्हणत, “देणगी तर आहेच, पण या सुरांनी जर एखाद्याच्या मनाला स्पर्श झाला, तर तेच खरं समाधान.”
सुखाचे दिवस होते. राधा काकू सांजदिवा लावून, जरावेळ ओट्यावर विसावा घ्यायच्या तेंव्हा गावातील महिला गप्पा मारायला यायच्या. मुलांच्या गोष्टी, सणवार याबद्दल काकू त्यांना छोट्या छोट्या गोष्टी सांगायच्या.एकमेकींचे सुखदुःख वाटून घ्यायच्या. गावातील महिलांनाही राधाकाकूचे खूप कौतुक, त्यांच्या लेकरावर त्यांनी किती चांगले संस्कार केले म्हणून त्या राधाकाकूंचे कौतुक करायच्या.
विनायकरावांना सुबोध हा एकुलता एक मुलगा. सुबोध हुशार होता. गावातल्या शाळेत तो कायम पहिल्या क्रमांकाने पास होत राहिला. गावकऱ्यांनीचं आग्रह केला, की
“विनायकराव, मुलाला शहरात पाठवा. तो खुप मोठा होईल.” राधा काकूंच्या डोळ्यांत पाणी आलं.
“गाव, आईबाबा, ही जमीन सगळं सोडून जाईल हो तो.” त्या म्हणाल्या.
“अगं, पाखरं पंख पसरली की झाडाच्या फांदीवर किती दिवस बसणार? सुबोधाचं भविष्य शहरात आहे,” विनायकराव शांतपणे म्हणाले.
सुबोध शिक्षणासाठी शहरात गेला. तिथे त्याने दिवसरात्र एक केली, कष्टाने इंजिनियर झाला. तो सुसंस्कारी होता. त्यामुळे लवकरच त्याला नोकरी मिळाली. खर तर कॉलेजमध्ये असताना तो हार्मोनियम शिकायचा, पण नोकरीच्या धावपळीत ते मागे पडलं. कधी कधी ऑफिसमधल्या टेबलावर बोटांचा ठेका धरताना त्याला आठवायचं,
“बाबांनी दिलेली ती बासरी अजून कपाटात ठेवली आहे…”
एक दोन वर्ष पाहता पाहता गेली. विनायकरावाने चांगलं स्थळ पाहून सुबोधच लग्न केलं. सुनबाई देखील संस्कारी मिळाली. दोघांचा मिळून सुखाचा संसार उभा राहिला. पण सुबोधच्या आयुष्यात संगीत मात्र मागे पडलं होत.
गावी आल्यानंतर कधी कधी त्याला खंत वाटायची रात्री उशिरा वडिलांजवळ गप्पा मारताना तो म्हणायचा, “बाबा, मी ज्या गोष्टीला मागे टाकलं, ती तुमची बासरी माझ्या आयुष्यातल्या रिकाम्या जागा खुपदा अलवार भरून काढते.” तेंव्हा विनायकरावांच्या डोळ्यातून फक्त प्रेम ओघळायचे. त्यांना भूतकाळ आठवायचा. आपणच अभ्यासासाठी सुबोधला जेव्हा शहरात पाठवलं, तेव्हा गावभर किती कौतुक झालं. “आपल्या विनायकरावांचा मुलगा शहरात शिकतो!” पण शहराच्या धावपळीत सुबोधचं संगीत मागे पडलं. त्यांना आतून वाटायचं, "माझा गुणी सुबोध एकटा पडला! आणि त्याच्याकडून आपण जरा जास्तच अपेक्षा ठेवतो काय?"
ते मायेने त्याला जवळ घेत, पाठीवरून हात फिरवीत आणि एखादा अभंग म्हणून त्याला थोपटून झोपी घालीत. गावाबद्दलचे आणि वडिलांचे प्रेम कायम सुबोधला गावाकडे ओढी. सणासुदीला न चुकता तो बायको-मुलांना घेऊन गावाला यायचा. तेव्हा आई-वडिलांचे डोळे ही आनंदानं भरून येत. त्यावेळी, राधाकाकू सुबोधला कधीमधी म्हणत, “बाळा, थोडं शिक की बासरी. बघ, थोडा वेळ काढ.”
सुबोध हसून उत्तर द्यायचा, “आई, आता उशीर झालाय ग, वय सुद्धा वाढले माझे, हो... पण बाबाच्या बासरीतला अद्वैत सूर ऐकण्यातच भरभरून समाधान मिळतं मला.”
आणि विषय तिथेच संपायचा.
सुबोधची दोन मुलं. आरव आणि त्याची बहीण आनंदी. यांना आजोबांचा विशेष लळा होता. त्यांना गाव, आजी-आजोबाकडून होणारे लाड , गरम गरम वरण-भातावर पडणारे साजूक तूप आणि डोंगरातली भटकंती खूप आवडायची. नदीमध्ये पोहायला, वाड्यात लपंडाव खेळायला आणि आजोबाच्या मागे मागे करायला आनंदीला तर कायम मज्जा यायची.
आरवच्या मनात मात्र आजोबांच्या बासरीबद्दल एक वेगळीच ओढ होती. तो जेव्हा जेव्हा गावी यायचा तेव्हा तेव्हा अंगणातल्या तुळशीपाशी बसून आजोबांची बासरी शांततेने ऐकायचा. आजोबासोबत तासन् तास बसून अभंग म्हणायचा. त्याचा आवाज सुंदर होता, म्हणून आजोबा त्याला अभंग शिकवायचे.
“आजोबा, मला बासरी शिकवा ना,” तो हट्ट धरायचा.
“अजून थोडं मोठं हो. श्वास आणि सूर यातलं नातं आधी समजलं पाहिजे रे बाळा ”विनायकराव म्हणायचे.
आरव मग आजोबांच्या मांडीवर बसून बासरीकडे डोळे लावून बघायचा आणि पुन्हा म्हणायचा,
“आजोबा, शिकवा ना! मी फुंक मारतो, पण आवाज येत नाही.”
विनायकराव हसून त्याचे केस कुरवाळायचे आणि म्हणायचे,
“ अरे,स्वर असे घाईत मिळत नाहीत बाळा, ते संयमानेच फुलतात.”
आजोबा काहीही म्हणोत, आरव मात्र आजोबाचा हात आणि सूर घट्ट धरून ठेवायचा.
संध्याकाळी अंगणात वडाखाली बसून विनायकराव बासरी वाजवत. त्यावेळी आरव त्यांच्या जवळ बसून चंद्राकडे बघायचा.
“आजोबा, हा सूर चंद्राला ऐकू जातो का?”
“हो रे, आभाळभर पसरतो तो. सूराला कुठं सीमा असते का?”
आरवच्या प्रश्नाची सरबत्ती सुरूच असायची, तो अंगणात काजवे पकडायला धावत सुटायचा आणि पळत पळत विचारायचा,
“आजोबा, हे काजवे तुमच्या बासरीवर का चमकतात?” विनायकराव मायेने म्हणायचे,
“हे सगळं गाणं आहे बाळा. नदीचं गाणं, वाऱ्याचं गाणं, आणि आपल्या मनाचं गाणं.”
आनंदी मात्र आजीसोबत कायम स्वयंपाक घरात असायची. तिला गोडधोड पोटातून आवडे. ती चिमुकली पोर देवघरात, अंगणात बसून मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढायची, देवाला वस्त्र शिवायची, फुलांच्या सुंदर माळा ओवायची. तशीच कीर्तनात ही गुंग व्हायची. “आजोबा, पुन्हा ‘जय हरी विठ्ठल’ म्हणा ना,” ती गोड आवाजात म्हणायची. तेव्हा आजोबा
तिच्या डोक्यावरून हात फिरवून कीर्तन रंगवायचे.काळ पुढे पुढे जात होता.आरव इंजिनियर झाला ,मात्र त्यासोबत त्याने संगीताची गाठ स्वतःच्या पदरी घट्ट बांधली होती. सुबोधही त्याला प्रोत्साहन देई. शहरातल्या नोकरीसोबत तो रात्र-रात्र गाणं, रियाज, शास्त्रीय सुरांचा अभ्यास करु लागला.
जेव्हा रात्री उशिरा नोकरीहून तो परतयाचा तेंव्हा आठवणीने आजोबांना फोन करायचा. रोजच्या रोज गप्पा मारायचा.
“आजोबा, ऐका ना बरं, आज मी नवीन धून तयार केली, ती गातो,” असं म्हणत तो फोनवर गाणं सुरू करायचा. त्या टेलिफोनच्या तारांतून सूर वाहून अंगणातल्या तुळशीपाशी पोचायचे. विनायकराव डोळे मिटून ऐकत बसायचे.
“आरवा, तुझ्या स्वरांत मला माझाच श्वास ऐकू येतो,” ते थरथरत्या आवाजात म्हणायचे. विनायकराव आता थकले होते, पण बासरी आणि भजनाचं त्यांचं नातं कधी तुटलं नाही. कधी आजारपण आलं तरी अंगणातल्या तुळशीपाशी बसून तल्लीन होत ते बासरी वाजवत.
इकडे शहरात आरवने कंपनीत असलेल्या गणपतीच्या कार्यक्रमात सहजच एक गाणं म्हणलं आणि काय आश्चर्य...! त्याला एका चांगल्या कंपनीतर्फे मोठ्या कॉन्सर्टमध्ये गाण्याची संधी मिळाली. तो मनोमन आनंदित झाला. त्याने लगेच आजोबांना फोन लावला,
“आजोबा, लवकरच मी गावाकडे येणार आहे आणि तुम्हाला माझ्या सोबत यायचंय. तयार रहा आजी सोबत. आजोबा, आमच्या कंपनीतर्फे मोठा कॉन्सर्ट आहे. खूप मोठी संधी मिळाली आहे मला, पण यात मी एकटा नाही उभा राहू शकणार, साथीला मला तुमची बासरी हवीच.”
त्या क्षणी विनायकरावांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. ते म्हणाले,
“बाळा, हा विठ्ठलाचा आशीर्वाद आहे. मी नक्की येईन… तुझ्यासोबत.”
हा हा म्हणता ही वार्ता गावकऱ्यांना कळाली. सगळ्यांना आनंद झाला. दुधावरची साय किती गोड असते याची चर्चा आसमंतात होऊ लागली. आरव, सुबोध गावी आले. मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले. आजोबा आजींना घेऊन, गावकऱ्यांचे आशीर्वाद घेऊन ते कॉन्सर्ट साठी शहरात वापस आले.
कॉन्सर्टचा दिवस उजाडला. सभागृह खचाखच भरलेलं होतं. दिव्यांच्या झगमगाटात आरव मंचावर आला.
“आज मी गाणार आहे, पण एकटाच नाही. माझ्या जीवनाचा खरा गुरु माझ्यासोबत आहे.”
साऱ्या सभागृहात आरवचा आवाज घुमला. पुन्हा तो पडद्यामागे गेला. त्याने आजोबांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांचा हात घट्ट धरला.
“आजोबा, माझ्या गाण्याला आज तुमच्या बासरीचे ते अद्वैत स्वर हवे आहेत, आणि तुमची साथ” तो हळूच आजोबांच्या कानात पुन्हा म्हणाला.
मोठा पडदा सरकला. विनायकराव मंचावर आले. पांढऱ्या शुभ्र कपड्यांत ते तेजस्वी दिसत होते. त्यांच्या डोळ्यांत भरगच्च आनंद होता. सुरुवातीला त्यांनी अभंग घेतला.....“विठू माऊली तू..” आणि मग त्यांनी बासरी ओठांशी धरली. आरवने गाणं सुरू केलं. आजोबांची बासरी त्याला सुरेल साथ देऊ लागली. सभागृहात जणू सह्याद्रीचे डोंगर, तुळशीचा दिवा, आणि मंदिराच्या घंटांचा निनाद उतरला. संपूर्ण प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. काही वेळाने प्रचंड रंगलेल्या या कार्यक्रमाची सांगता झाली संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा गडगडाट झाला. या कार्यक्रमाला शहरातले वेगवेगळे नामवंत संगीतकार, गीतकार आणि अभिनेते आवर्जून उपस्थित होते. टाळ्यांचा कडकडाट होत असताना, गर्दीतून रस्ता काढीत एक नामवंत संगीतकार पुढे आले. स्टेजवर येऊन माईक हातात घेत म्हणाले,“ तुमची जोडी अपूर्व आहे. एका पिढीचं परंपरेशी, तर दुसऱ्या पिढीचं नव्या युगाशी अनोखं नातं आहे. तुम्हा दोघांसाठी एक संपूर्ण वेगळा असा अल्बम तयार करण्याची माझी इच्छा आहे. आणि आज भारताला हवी आहे अशीचं ओळख, हाच सूर, हाच वारसा.”
त्याक्षणी विनायकरावांनी हात जोडले. त्यांच्या डोळ्यांत समाधानाचे अश्रू होते. सभागृहात उभे राहून, प्रेक्षकांकडे पाहत त्यांनी हात जोडले. लोकांनी नम्रतेनं त्यांना दाद दिली. सुबोधला परमेश्वराचा साक्षात्कार आजोबा आणि नातवाच्या रुपात झाला. संपूर्ण गाव आरवला आशीर्वाद देत होते.
सह्याद्रीच्या पायथ्याशी उभ असलेले ते घर, अंगणात लावलेला दिवा आणि दूरवर पसरलेले बासरीचे सूर या सगळ्यांनी एकाच वेळी सांगितलं वारसा संपत नाही तो पिढ्यानपिढ्या स्वरांतून वाहत जातो.
सौ. अर्चना गिरीश डावरे, परभणी
"मन्या sss !!ए मन्या, उठ न बाप्पा." यस्वदीनं आपल्या गोड्ड्या आवाजात हाक मारली. "काहो वं तुयी सकारी सकारी खिटखिट.... साजरं झोप लागली होती थंडी थंडीची ..थाम थोडसा येर" पुटपुटत झोपतस मन्या न बोतरी कानावरून बोकारली. दोन तीन वेळा उटवून बी मन्या उठत नाही पावून यस्वदानं सूर बदलला. "आरे घुबडा!!! रात भर मिल मिल डोरे करून
पुस्तकातले चित्र पायत जागत बसतेस. अन ठंडीची झोप लागते म्हणतेस . बायर पाय! ईर कसा डोक्स्यावर आला. आता उटते का वतु पाणी?" "आव आव थाम थाम..च्या मायची खिटखीट.." म्हणत मन्या बोतरी फेकत उठला.तसा तो उटला नसता बरं त्यानं गंगारीत बुडणाऱ्या चिंपटाचा आवाज आयकला होता."बरं झालं उठलास नाही तं आज बाजवरस आंघोर झाली असती." यस्वदा हासत म्हणाली."हं ssss मोठी आली आंघोर करनेवाली.. एक गोष्ट तं लक्षात रायत नाई बरं काहा का भायस.."नाराजीचा सुरात मन्या बोलला. गंगारीतल पाणी भोको-भोको तोंडावर मारून तो साजरा खाकरला. बाजवरच्या दुपट्यानं त्यानं तोंड पुसलं अन आंगणातल्या कडूलिंबाचं डार तोडून त्याची दातवन करत. चिंपट उचललं. मंग यस्वदीकडं फिरून म्हणाला,"आईss च्या मांडून ठेव वं! मी जरा दंडात जाऊन येतो!" "हो जी सायेब या हागुन! ... मोठा लाटसाब हाये झाला. च्या मांडून ठेवतो ,सोबत काई बिस्कीट मिस्किट लागलं का?" यस्वदा मज्ज्याकीच्या स्वरात बोलली. पण उत्तर देणारा मात्र पांदण रस्त्याले कवाच लागला होता.
चांदा प्रांतातील यक लहानचुकसा गाव गडीचूरला.पण गावाचा इतिहास भाय जुना अन मोटा बी.गावाजवर मोटी कारोबाची डोंगरी ,तिच्यावरूनस गावाचा नाव गडचुरला पडला. लोक मनतेत त्या ठिकाणी पयल बाबुराव शेडमाके आले होते इंग्रज लोकायसोबत त्यानं तेत लढाई केली.निस्त्या गोट्यान इंग्रजायले जायबंदी केलं.असा तो ऐतिहासिक गाव.तेतून गावतळा दिसाचा त्याचा बी आकार भारताच्या नकाशावानी. यस्वदा आपल्या लेकरा संग यास गावात राहाची. लग्नानंतर बापाचं घर सोडून आलेल्या यशोदानं सासर व माहेरचा दुजाभाव कवाच केला नाही.घरच्या आड्याची थे मेढ झाली. तिच्या कामात कुचराई कवास दिसली नाही. सासरा वैदकी कराचा. अडल्यानडल्या माणसांले मदत कराचा .झाडपत्ती देवाचा.जागोजागी इलाज करून तजलेले रोगी त्याच्या कडच्या दवाईन बरे होवाचे. रात राहो का इर नारायण वैदू नेमी सेवेत हाजर..पण त्याचा येक नेम होता.दवादारूचे कवा त्यानं पैसे घेतले नाही.तो म्हणाचा, ' भेटलेली इद्या इकाची नाई.. त्यानं अवसदाचा गुन जाते..' त्याच्या या इचारावर मात्र त्याचा एकुलता एक पोरगा सिमना भाय चिडाचा, बापालेकाच फारस पटाच नाही.सिमना यशोदाचा नवरा. अंगापायांन काटक, नाकी-डोरी तरतरीत गडी..कोणतंही काम कराले कवास मागपुढं कराचा नाई.जलमतास माय गेली, माय मुख कवास पायल नाही.…घरचा वैद असून मायेले वाचवू शकला नाही, याची इचणी त्याच्या कारजात सल धरून होती. एक दिवस नदीवर मासऱ्या धराले गेला...थो गंगा मायेचास झाला. यस्वदीच्या कपाराचा कुकु गेला,हातची हिवरी बांगडी टिचकली. पोराच्या अकाली जाण्यानं नारायण वैदू बय्या बय्या कराले लागला. एक दिवस तो आपल्यास धुंदीत गावातून बेपत्ता झाला. यस्वदानं जमल तेवढा त्याचा गावोगावी पत्ता घेतला पण अबारातला पाकरू बनल्या सारखा नारायण वैदू गेला तो कवा दिसलाच नाही.लोक त्याले वैनगंगेनदीकडं पायल्याचे सांगत होते तर कोणी मार्कंड्याच्या रस्त्याले... पण तो मात्र कोटीच दिसला नाही .
नवऱ्या पाठोपाठ बापासमान सासरा गेल्यानं यस्वदा मनातून तुटून गेली पण पोटच्या पोराकडं पायत तिनं डोऱ्यातल्या पाण्याचे खडे केले. पदर कमरेले खोसला अन् तयार झाली जीवनाचे धोड्डे पार कराले. रोवण्याच्या वणी, माती टाकालं जाणं, निंदा,कापणी या सारक्या आंग मेयनतीची कामं करत ती घराचा गाडा वनाडू लागली.
पोराले तिनं गावातल्या ख्रिश्चन मिशनरीच्या शाळेत टाकलं. मनोहर म्हंजे मनू शाळेत जाऊ लागला.'यस्वदे! पोरगं हुशार आहे तुजं. नाव काडलं पाय नारायण वैदाचं.'असं कोणाच्या तोंडून आयकल का यस्वदीचा उर भरून याचा.पदर डोऱ्याले लागून वल्ला होवाचा.
मनोहर पण जिद्दीनं अभ्यास कराचा. त्याले मूर्ती बनवाले, चित्र काडाले आवडाचा येर काढून तो गावाजवरच्या कारोबाच्या डोंगरावर असलेल्या इंग्रजांच्या डाकबंगल्या पुढं बसून चित्र रेखाटाचा. भुताखेताची जागा म्हणून गावात ती जागा कुप्रसिद्धच होती.त्या बद्दल अनेक लोकांच्या तोंडून किस्से सांगितले जावाचे. यस्वदा बी त्या गोष्टी आयकून होती ती मन्याला तितं जाण्याबद्दल हटकाची, रागवाची. पण मन्याला मात्रम ती जागा, डोंगरीवरचा ठंडा वारा, तेतून चवनारं तऱ्याच साजरं रूप,गूढ शांतता या सर्वांची मोयनी पडली होती. यस्वदा कारजीनं म्हणाची,' बाबा!थे काही चांगली जागा नाही.पांढर भूत रायते तेतं..सांजयेरी तेत रायन साजरं नाई.." पण मन्या मात्र आयकल तं शपत.. तो तीच बोलणं उडवून लावाचा. यस्वदा मात्र चिंता कराची. शेवटी तिचं मायेचं मन.
मन्या आता मॅट्रिकमंदी गेला होता.शाळेत दरवर्षी पहिला नंबर काढत वर आला होता.शाळेचा फादर त्याचं कौतिक कराचा, स्पर्धेत बक्षिसं, पुरस्कार भेटाचे. पोराच येस पावून यस्वदा सुकावून जावाची. मधल्या काळात ती एक-दोनदा बिमार पडली होती. तवापासून गोस्टी इसरायला लागली. पुढं तिनं बि गाठीला साठवलेल्या काही पैशातून नवीन धंदा सुरू केला. ती मुरमुरे,फुटाणे,वटाणे,फिंगर विकायची.नगद पैसे मिळाचे. लोकांकडून धान, हरभरे, वाटाणे घ्याची व घरीच फोडून कवा गुजरीत त कवा बाजारात इकाची. मनोहरपण तिला सुट्टीच्या दिवशी,बाजाराच्या दिवशी मदत करायचा.
पण एक चिंता तिला अजूनही भेडसावत होती ती म्हणजे त्याची डाकबंगल्याची ओढ.
रोज संध्याकाळी मन्या त्या बंगल्याच्या पायरीवर एकलास बसाचा. कवा चित्र काडत तर कवा कवा फक्स्त कारोबाच्या मूर्तीवानी. त्याचं वागणं पाहून यस्वदाले भाय कारजी लागाची. तिले कदी सासरा तर कधी नवरा आठवून जायचा.
एक दिवस सांजयेरी मन्याले शोधत यस्वदा कारोबाच्या डोंगरीकड गेली.लेक का हो करते तेती? अज तिले पावाचस होतं. दबक्या पायानं तिनं दरड यंगली. दूर डाक बंगल्याच्या पायरीवर तिले मन्या दिसला.येक पांढरी आकृती तिले त्याच्या मांग दिसली.यस्वदा दचकली. अंधुक प्रकाशात दुरून काही नीट दिसत नव्हतं.ती पुढं पुढं जाऊ लागली.मन्या त्या आकृती सोबत बोलत होता, हासत होता.मनातून यस्वदा हादरून गेली व यका झाडाच्या मागुन ती मन्याला व त्या आकृतीला पाहू लागली. यकायक तिच्या पायाखालचा दगड सरकला व ती झोक जाऊन धडपडली.आवाजाने मन्या व त्याच्या सोबत असलेल्या माणसानं तियाकडे पायलं. त्या व्यक्तीचा चेहरा पाहून तीचे डोरे फिरले, जवरजवर थे किल्लारलीच.. "मामाजी!!!" आणि तियी सुदच गेली.
यस्वदानं डोरे किलकिले केले तवा मन्या तिच्या जवर बसला होता. तिनं आजूबाजूला पाहिलं बाजं भोवताल बाया बसल्या होत्या.तिची नजर ज्या व्यक्तीला शोधत होती, ती मात्र तेत कोटीच दिसत नव्हती. ती उटाले पायत होती पण आंगात ताकतच रायली नोयती. काई येरानं विचारपूस करणारी गर्दी आपापल्या घरी निंगून गेली. मन्यानं तिले बाजवर बसवलं .जवळच्या लवंगाआत्याने दिलेली आंबील प्यायला दिली. वाटाभर आंबील अन् रायत्याची फोड खाऊन बऱ्यापैकी यस्वदेला तरतरी आली. तिनं मन्याकडे पाहिलं आणि प्रश्न केला," मन्या, कोटी गेले आबाजी?" मन्या हासला आणि म्हणाला, "आवं!! कोणता आबाजी?आणि कोट दिसला तुले?" यस्वदेन रागानं मन्याकडं पाहिलं आणि म्हणाली,"तू का मले बय्यी समजते का रे? मी सोताच्या डोऱ्यानं पायल आहे त्यायले? खरं खरं सांग ! त्यायीस होते न?" "आव नाई व ! मायच्यान."मन्या गऱ्याले हात लावून सांगत होता." तेती कोणीस नोयतं मी यकलास तेती होतो.तू पडली तवा मीस तुले उचलून घरी आणलो." यस्वदीचा मात्र त्याच्यावर इसवास बसत नोयता.'अस कसं होऊ शकते? डोऱ्यावर इसवास करू का पोरावर?.' तिले काही समजत नव्हतं. थोड्यावेळाने तिला झोप येऊ लागली व ती सोनेगावाले गेली. यस्वदा झोपतास मन्याने तिच्यावर बोतरी पांघरली, दरवाजा उघडून बाहेरून कडी घातली. मध्यरात्र उलटून गेली होती. त्याची पावलं डाकबंगल्याकडे वळली.सरावाची दरड चढून तो पायरीशी आला तिथे एक आकृती त्याला दिसली ,त्याने हाक मारली,"आबाजी!मी आलो. आईचा आता आता डोरा लागला आहे " त्या आकृतीने त्याला जवळ घेतलं "अरे मनू! तुज्या मायेनं भाय सोसलं आहे पोरा.. बाप गेल्यावर तिचा आधार हरवला..तरी रडली नाही, कुणाजवळ दुःख बोलली नाही.मी सुद्धा पोराच्या दुकात घर सोडून गेलो.. मी म्हातारं पानं पण घरी रायलो असतो तर खाणारं एक तोंड वाहाडल असतं. तिच्यावरचा भार कमी व्हावा म्हणून बाहेर बाहेर हींडत रायलो.. तुजा मूक पावाची इच्चा झाली म्हणून तुले मी या जागी भेटत रायतो. मी बी तिचा गुन्हेगारच हाये ..पण ती तुझ्यासाठी वाघीण झाली. दुनियेसंग झगडली..न थांबता.. ना आराम करता.पण आता.." एव्हढे बोलून बुडग्या आबाजीन थुका गिटकला. बोलण्यात वलावा आला होता. 'पण का आबाजी ?' मन्या पटकन बोलला. "तिला एक आजार झाला आहे..भुलण्याचा, डाक्टर लोक 'स्मृतीभ्रंश' म्हणते त्याले." अनेक दुःख, भावना, इचार जवा आतल्या आत दाबले जातात तवा ह्या प्रकारचा रोग होते.यात माणूस वरवर रोजच्या सारकाच वाटते पण पुढ पुढ मात्र त्याची आठवण ठेवाची शक्ती जाते. थो गोष्टी, नातेवाईक एव्हढंच का आपलं नाव बी इसरतो." पंधरा वर्षाचा मन्या हे सगळं शांतपणे ऐकत होता."मंग तुम्ही तर वैदू आहा यावर काही उपाय सांगा."मन्या बोलला.
"नाही रे! या रोगावर काहीही उपाय नाही.असता त तुले पयलंच सिकवला असता, नाई का? अजवर तुले सर्दी शिरकूम्ब्या पासून जर,कवूर, इच्चू, पान यायच्या पर्यंत सप्पा इलाज, झाडपत्री सांगली पण अजून बी त्या रोगाचा इलाज मले आला नाही " नारायण वैदूच्या सूरात हताशा जाणवत होती. दहा गावात प्रसिद्ध वैदू एका रोगापुढे शरण आला होता."मनू ! फक्त यक कर..तिले नेहमी आनंदी ठेव..या रोगाची तिले अजिबात कल्पना येऊ देऊ नको." "शेवटी कर्ता करविता तो आहे."असं म्हणतांना आबाजीच्या आवाजात अजीबस घोगरेपणा व थरथर वाढली होती.त्याने आभारकड हात उचलले. अभारातली पहाट चालनी आबाजीच्या डोळ्यातुन गालावर उतरत होती. नंतर आबाजींनी मनूच्या खांद्यावर हात थोपटलं व त्याची पावले अंधारात घोडीच्या काडीचा आवाज करत नींगुन गेली. मनू लगीत येर त्या दिसेले पायत रायला,"नामवंत वैदू नारायण! बायकोच्या बारतपणात जीव न वाचवू शकलेला, एकुलत्या यक पोराले मरणापासून अलग न करू शकलेला आणि आपल्या सुनेले असाध्य रोगातून बरं न करू शकणारा..."
शेवटी एकच खरं 'कर्ता करविता तोच, आपण फक्त बाहुले.. पयल्या दमापासून आकरी दमापर्यंत निस्ते धावणारे !!'
प्रशांत भंडारे आमडी, बल्लारपूर
जिल्हा-चंद्रपूर
ललित….
फूल
निसर्गातल्या
सर्व दृश्य अदृश्याची निर्मिती ही खुद्द निसर्गाचीच. कुणी तिला विज्ञानाची निर्मिती
म्हणेल. कुणाला ती देवाची करणीही वाटेल. यात सर्व प्राणीमात्र तर आलेच याशिवाय निर्जीव
वस्तूही आल्या. झाडं, झुडपं,
पाणी, फुलं, फळं यांचाही
समावेश नैसर्गिक निर्मितीतच होतो. आता यापैकी फक्त फूल या एकाच गोष्टीचा विचार केला तरी जे निसर्गानं
दिलय त्याचा उपभोग घेण्याची निसर्गाची वृत्ती नसते.
फुलांचा सुगंध प्राण्यांनाही कळत असावा पण
तो माणसासारखा प्राण्यांना व्यक्त करता येत नाही. फुलझाडांच्या आसपास आपण असलो की त्याचा
सुगंध येतो. अर्थात सर्वच फुलांना सुगंध येईल असं नाही. काही फुलं निर्गंधीही असतात.
या फुलांच्या दिसण्यात त्यांचं सर्व सौंदर्य असतं. त्यांना गंध नसला म्हणून काय झालं ती निरुपयोगी
थोडीच ठरतात?
फूल कोणतंही असो ते झाडापासून हिरावून घेण्याचा
अधिकार माणसाला नाही. एखाद्या झाडापासून फूल तोडून घेणं म्हणजे झाडाचं नवजात अर्भक
त्याच्यापासून हिरावून घेण्यासारखंच समजलं पाहिजे.
त्याऐवजी या फुलांचा सुगंध आसपास दरवळू द्यावा.
हा नैसर्गिक आनंद कुणापर्यंत तरी पोहोचू द्यावा. त्या फुलांना उगाच हार- तुऱ्यांमध्ये
सजवणे किती योग्य आहे? या हारांचं, तुऱ्यांचं होतं तरी काय?
देवादिकांच्या प्रतिमांवर मोठ्या श्रद्धेने
अर्पण केले जाणारे हार दुसऱ्या दिवशी सकाळी बघावेत. हे हार कुठेतरी रस्त्याकडेला पडलेले
दिसतात. कधीकधी हे हार एखाद्या गलिच्छ कचराकुंडीतही दिसतील. बऱ्याच वेळा हे हार नदी
कालव्यांमध्ये वाहून दिले जातात. या निर्माल्यामुळे पाणी प्रदूषित होतं तो भाग वेगळाच.
सत्कार समारंभामधले हार - तुरे तर कार्यक्रमानंतर तास दोन तासात फेकून
दिले जातात. सुगंध वाटणाऱ्या फुलांच्या पदरी असं दुर्दैव पडतं. अर्थात सगळीच फुलं दुर्दैवी
ठरतील असं नाही.
सगळीच फुलं झाडांवर लगटूनच राहतील असं नाही.
प्राजक्तांच्या फुलाचा
तर पहाटे पहाटे घराच्या अंगणात सडा पडतो. ही फुलं आपसूक झाडाचा हात सोडतात आणि सुगंधाचा
प्रसाद वाटप सुटतात.
फुलं मूर्तींच्या चरणी अर्पण केली जातात तर
कधी या फुलांचा गजराही केला जातो. आता इथं फुलं हिरावून घेणं येत नाही तर या फुलांचा
असा उपयोग सार्थ म्हणावा लागेल.
फुलांचं जीवन अगदी काही तासांचं असतं तरीही
फुल माणसाच्या मधमाशांच्या आणि फुलपाखरांच्या जीवनात आनंदाची पेरणी करून जातं. या तुलनेत
माणसाला कितीतरी वर्षांचं आयुष्य मिळतं. या दरम्यान माणूस माणसाच्या सुखासाठी आनंदासाठी
काही करतो का? तो कुणाचं दुःख, वेदना, एकाकीपण कमी करतो का?
सतीश पुंडलिक नवघरे,
मु. पो. कोळपेवाडी,ता. कोपरगाव,
जि. अहिल्यानगर पिन. मो. नंबर : 8308033705
मोकळा घसाटा ..
हल्ली लोडशेडिंग प्रॉब्लेम नित्याचे झाले आहे म्हणून अनेक इलेक्ट्रिक गॅजेट्स असूनही उपयोगात आणता येत नाहीत .त्यापैकीच एक म्हणजे वॉशिंग मशीन. कपडे धुणे ही
संकल्पना अगदीच कालबाह्य ठरलेली आहे .त्यातल्या त्यात ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन, डिजिटल बटन्स आणि बझर
यामुळे मशीन मध्ये कपडे टाकल्यानंतर अर्ध्या एक तासाने बझर आपल्याला बोलवतो कपडे धुऊन तयार आहेत मॅडम आता फक्त वाळत घाला. असेच जणू सांगतो.
आज नेमकी लोडशेडिंग पाच तास लाईट येणार नाहीत असा मेसेज वाचला आता मात्र हाताने कपडे धुण्याची वेळ माझ्यावर आली . जरा नाराजीनेच मी कपडे धुवायला गेले. आधी पांढ-या रंगाचे कपडे धुणे, मग
घरातील समस्त पुरुष मंडळींचे कपडे धुणे ,त्यानंतर सर्व स्त्री वर्गाचे कपडे ही क्रमवारी शिस्त पूर्वीपासून आमच्याकडे होती जशीच्या तशी माझ्या लक्षात होती त्याचप्रमाणे मी काही कपडे घसाटा लावून ,काही थोडे ब्रश करून काही थोडेसे आपटून धुवत होते शेवटी एक कॉटनची साडी धुवायला घेतली आणि मन भूतकाळात गेले.
मी नवीन लग्न करून सासरी आल्यावर माझ्या कामाच्या पद्धतीचे अगदी बारकाईने निरीक्षण चाललेले असायचे. मला जरा संकोच वाटायचा पण नंतर हे निरीक्षण माझ्या चुका काढण्यासाठी नाही तर चुका दुरुस्त करण्यासाठी आहे हे हळूहळू माझ्याही लक्षात आले. आणि मी बरीच मोकळी झाले.
सहा महिन्यानंतर मी धुणे धुताना सासुबाईंचे सतत निरीक्षण चालू होते. कॉटन ची साडी धुवायला घेतली होती. स्वच्छ धुऊन झाली आणि आता मी वाळत टाकणार,तोच त्या म्हणाल्या अगं मोकळा कसाटा लाव की त्याला. मला काहीच कळले नाही
मग त्यांनीच साडी संपूर्ण पाण्यात बुडवून साडीच्या एका टोकाकडून पकडून पाण्यात बुडवून तिरपे तिरपे घसाटे द्यायला सुरुवात केली .परत पाण्यात बुडवायचे आणि परत घसाटे लावायचे या पद्धतीने साडी दगडाच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत नेली आता ही साडी टब मधून जाऊन दुसऱ्या बाजूला बसली.स्वच्छ पाण्यामध्ये साडी पिऊन वाळत टाकली.क्षणार्धात मी भानावर आले आणि सराईतपणे साडीला मोकळा घसाटा लावला धुण्या सोबत नकळतच कपालभातीचाही अभ्यास झाल्याचे मला जाणवले आणि माझाच मला निर्मळतेचा अनुभव आला.
श्रीमती सविता देशपांडे परभणी
नदीच्या कविता.. नदीची गाणी
मला कविता गायला आवडतं.
लहानपणापासूनचा छंद. माझे शिंदे गुरुजी,वाडेवाले गुरुजी मला कविता म्हणण्यासाठी पुढं
उभं करायचे. मग सारा वर्ग माझ्या मागे कविता म्हणायचा. तसं करता करता शब्दांची आवड
माझ्यात रूजली.आता मला कविता लिहायलाही आवडतं. प्रेम, भक्ती, विरह या भावनांसह निसर्गावर,पानाफुलांवर,नात्यांवर,स्त्रीवर
लिहिता लिहिता कित्येक वेळा या शब्दांमधून नदी वाहत असते. मग या नदीला इतर कवी कवयित्रींच्या
शब्दनद्याही येऊन मिळतात. त्यांचा सुरेख संगम बनतो. मग गोदेकाठची ही कन्या या कवितांचं,गाण्याचं
गायन अन् पारायण बसते.
नदी मिळता सागरा पुन्हा येईना
बाहेर
अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला
माहेर..
शब्दप्रभू
माडगूळकरांची 'नदीचं माहेर' ही सुंदर रचना. एकदा नदी सागराला जाऊन मिळाली की ती पुन्हा
पर्वताकडं जात नाही असं म्हणतात. परंतू ग. दि. मा. यांनी या म्हणीला या समजुतीला खोडून
काढलं आहे.
सारे
जीवन नदीचे घेतो पोटात सागर
तरी
तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर..
अशा
आशयघन ओळीतून त्यांनी नदीच्या माहेरप्रेमाचं वर्णन केलं आहे. स्त्रियांना जसं माहेरचं
प्रेम, माहेराची ओढ अगदी तशी नदीला डोंगराची ओढ.
नदीबाई माय माझी डोंगरात घर
लेकरांच्या मायेपोटी येते भुमीवर
नदीमाय जल साऱ्या तान्हेल्याला देई
कोणी असो कसा असो भेदभाव नाही..
कुसुमाग्रजांची
ही कविता. नदीला आई,बाई अशी उपमा देणारी ही कविता मला फार आवडते.नदीचं पाणी साऱ्यांसाठी.तिला
कोणी स्पर्श करू नये,कुणी तिला प्राशू नये असा भेद ती करत नाही.कवितेच्या शेवटीही यात
जो संदेश दिला आहे तो मला फार मोलाचा वाटतो.
माय सांगे थांबू नका पुढे पुढे चला
थांबत्याला पराजय, जय चालत्याला..
नदी
आणि आई..सतत प्रवाही! सतत प्रवाही राहणं हा नदीचा गुणधर्म! तसंच माणसानंही थांबू नये,
पुढं पुढं जावं, प्रगती करावी अशी नदीची शिकवण!
मी कोणाची? मी सर्वांची बांधुनीही मज नेणाऱ्यांची
जेथे जाईन तेथे फुलवीन बाग मनोहर आनंदाची..
वि.म.
कुलकर्णी यांची ही सुंदरशी कविता. नदी ही सर्वांची असते. ती सर्वांना पाणी देते. तिच्यावर
कुणा एकाचा अधिकार नाही. ज्यांनी तिला बांध घातलाय ती त्यांचीही आहे. पण ती कुठेही
जावो तिथं आनंदाची बाग ती फुलवत जाते. अशा अर्थाची ही ही कविता.
दरीदरीतुन,वनावनातुन झुळझुळ मी वाहत जाते
मी मंजुळ गाणी गाते मी पुढेच धावत जाते..
कवी
वि.म.कुलकर्णी यांची 'नदीचे गाणे' ही छानशी कविता.नदी सर्वांना पाणी देण्यासाठी दऱ्या
डोंगरातून येते. वाहताना तिचा झुळझुळ असा मंजुळ आवाज येतो. पुढं पुढं जाणं.. सतत वाहणं
हा छानसा संदेश देणारी ही कविता.
मला वाटते नदीकाठच्या वाळूवरती जावे
धावत
धावत पाण्यासोबत वाळूमधून यावे
पायावरती
ओढत वाळू खुशाल ढिग चढवावे
पाय काढता वाळूचे मग खोपे सुंदर व्हावे..
कवी
संतोष सेलूकर यांच्या कवितेतील वरील ओळीमधून बालपणीचा नदीकाठी घालवलेला रम्य काळ कवीला
आठवतोय. नदीच्या पाण्यात पोहणं,तिच्याकाठच्या वाळू चा खोपा करणं ह्या सुखावणाऱ्या गोष्टी.
मोठं झालं तरी पुन्हा परतून या साऱ्या गोष्टींचं सुख अनुभवावं असं कवीला वाटतं. बालपण
सुटत गेलं तरी नदीशी नाळ तुटू नये.. एवढंच!
असो कवीचे कूळ अप्रसिद्ध होई कवीच्या कवणे
प्रसिद्ध
तसा नदीच्या उगमस्थलाला नदीमुळे गौरवला
भजाला..
कवी
विनायक यांनी त्यांच्या 'नदी आणि कवी' या कवितेतून असं सांगितलंय की कवीचं कूळ कसंही
असो प्रसिद्ध किंवा अप्रसिद्ध पण त्याच्या शब्दांनी ते प्रसिद्ध बनतं. त्याचप्रमाणे
नदीच्या उगमस्थळास नदीमुळं गौरव प्राप्त होतो. म्हणूनच कवीचं कूळ आणि नदीचं मूळ विचारू
नये असं म्हणत असतील का?
कवी
संजय गोरडे यांच्या गझलेतील एक जबरदस्त शेर आहे. तो असा-
तुझ्या माझ्यातल्या श्रावणसरी
गझल म्हणजे जणू गोदावरी..
अहाहा!
गझल ही एक कविताच.प्रियकर प्रेयसी यांच्यातील पवित्र नात्याला गुंफणारी गझल ही भव्य,विशाल
अन पवित्र अशा गोदावरीसारखी असं कवीला वाटतं. गोदावरी एक प्रेमधारा.!
काल
चार कविता नदीवर
आल्या
होत्या काळीज धुवायला..
कवयित्री
मधुरा उमरीकर यांच्या कवितेतील या चार कविता म्हणजे स्त्री प्रतिमा. प्रत्येक बाईला
सुख दुःख वाटायला हक्काची जागा म्हणजे नदीचा काठ!धुणं धुवायला जाणं गरज अन निमित्त.पण
तिला मनातील भाव भावनांचं गाठोडं नदीजवळ उकलायचं असतं. जणू तिच्या प्रेमाच्या सरीत
काळीजच धुवून घ्यायचं असतं.किती आशयघन कविता!
कवितेप्रमाणंच
नदीवर कित्येक गाणीही आहेत. हिंदी असो वा मराठी रचना विषय महत्त्वाचा नाही. पण नदी
ही मानवी जीवनाचा मूळ आधार असल्यानं,आपल्या जाणिवा नदीभोवती फिरत असतात.भारत हा संस्कृतीप्रधान
देश. इथं निसर्गाचीही देवता समजून पूजा बांधली जाते. नदीचीही पूजा करतात.तिला देवी
समजतात. माय समजतात. तिची ओटी भरतात. अपल्या महाराष्ट्र राज्यातही गोदावरी, चंद्रभागा,
इंदायणी, कृष्णा या नद्यांना पवित्र मानतात. यावेळी एक प्रसिद्ध गीत ओठावर येतंय-
संथ वाहते कृष्णामाई संथ वाहते
कृष्णामाई
तीरावरल्या
सुखदुःखाची जाणीव तिजला नाही
बालपणी
ऐकलेलं हे कृष्णधवल गीत मला अजूनही आठवतं.हे गीतही ग. दि. मा. यांचंच!कृष्णामाई म्हणजे
कृष्णा नदी. काठावर राहणाऱ्या लोकांच्या जीवनात किती व्यथा, वेदना आहेत.नदीला त्याचं
काही वाटत नाही. ती शांत बसून राहते. अशा आशयाच्या या ओळी.
झुळझुळे
ही नदीबाई नदीबाई
देहलतेला
शीतल करूनी आनंदाने गाई
कृष्ण गंगाधर दिक्षीत यांनी
लिहिलेलं हे गीत. या नदीतही तिला बाई संबोधलं आहे. खरंच बाई आणि नदी किती एकरूप.देहलतेला
शीतल करणं किती उदात्त भावना.शिवाय नदी आणि बाई.. दोघीही प्रवाही! राम तेरी गंगा मैली हो गयी
पापीयों
के पाप धोते धोते..
मराठी गीताप्रमाणेच नदीवर काही
हिंदी गीतेही आहेत.रवींद्र जैन यांनी साकारलेलं स्वरसम्राज्ञी लता दिदीच्या सुरांनी
अमर झालेल्या या गीतातून माणूस नदीला कशाप्रकारे नदीला अस्वच्छ करत आहे याचं वर्णन
केलं आहे. या अस्वच्छतेमुळं तिचं सौंदर्य,पावित्र्य नष्ट होत चाललं आहे. म्हणून आता
गरज आहे नदी स्वच्छ करण्याची. स्वतःची पापं धुवायला गंगेत स्नान करताना तिचं पावित्र्य
ही अबाधित राहावं हा विचार करावा.
अशा कितीतरी कवितांमधून,गीतांमधून
कवींनी, गीतकारांनी नदीबद्दल लिहलं आहे. जन्माआधी आपण आईच्या उदारातील नदीत मुक्त विरहत
असतो.आपल्या आतही एक नदी झुळझुळ वाहत असते.नदी आपली जीवनदायिनी!तिच्या पाण्यानं इथली
शेती फुलली.जीवन समृद्ध झालं.तिच्या कवितां ची तिच्या गीतांची अशी उजळणी करून आतल्या
नितळ नदीला प्रवाही ठेवण्यासाठी हा शब्दप्रपंच!आता माझ्याच एका कवितेच्या काही ओळी
ओठावर रूंजी घालत आहेत..
माझ्या
माहेरची गोदा
सदा
वाहे खळखळ
तिचं
निळंशार पाणी
देई
जगण्याला बळ..
मनिषा कुलकर्णी-आष्टीकर, परभणी
मो.-9511875353
शेतकऱ्यांच्या जेंव्हा स्वप्नांचा चिखल होतो !
जगाचा पोशिंदा अशी बिरुदावली घेऊन जगणारा आणि
जगविणारा शेतकरी आज हवालदिल झाला आहे. त्याची दर्दनाक कहाणी कधी नव्हें एवढी विदारक झाली आहे ; नव्हें तो पुरता कोसळला आहे. काही क्षणापुरता तो काळाच्या छाताडावर गच्च पाय रोवून .. पुन्हा उभा राहणार आहेच पण तो आपल्या सर्वांच्या समर्थ साथीने..तेव्हा त्याला मदतीसाठी संकटमोचक म्हणून आपल्या सर्वांना साथ द्यावी लागणार आहे. कारण अस्मानी आणि सुलतानी संकटाच्या घोडखिंडित सापडलेल्या बळीराजाची कोंडी आपल्याला फोडावी लागणार आहे . अतिवृष्टी .. ढगफुटी .. महापूर या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांची दैन्यावस्था न पाहवणारी आहे .अतिवृष्टी आणि ढगफुटीने झालेल्या महापुरात शेतकऱ्यांची हाताला आलेली पिके अक्षरशः वाहून गेली .. घरादारात चिखलाने थैमान घातले .. पशुधनाची वाट लागली .. दुभती आणि कामाची जनावरे अक्षरशः वाहून गेली ..चोहू बाजूने शेतकऱ्याला परिस्थितीने घेरले आहे . तेव्हा अशा दोलायमान परिस्थितीत बळीराजा एकटा दुकटा सापडला आहे तेव्हा सरकार दुतोंडी बोलत आहेत..सरसकट
दुष्काळ ही जी शेतकऱ्यांची एकमुखी मागणी आहे ती मान्य करायला सरकारची पावले काही उचलत नाहीत .
दसरा झाला; दिवाळी तोंडावर आली आहे बाईलेकी दिवाळी सण म्हणून माहेर म्हणून येण्याचा प्रघात आहे नव्हे ती हजारो वर्षापासूनची पारंपारिक पद्धत आहे . सणवार साजरे तर
करावेच लागतात . दुष्काळाचे संकट तर डोक्यावर घोंगावत आहे . घरात श्रीमंती नांदलेल्या ठिकाणी आज अठराविश्व दारिद्र्याने ताबा घेतला आहे . लेकरांच्या
दप्तरापासून ते आजी आजोबांच्या काठीपर्यंत सर्व काही वाहून गेले आहे भांडीकुंडी स्वयंसेवी संस्था यांनी पुरवठा करीत आहेत पण ती मदत पोकळी भरून काढू शकणार नाही . स्वयंसेवी संस्था पुण्याचे काम करीत आहेत . संकट मोठे आहे ...संकटग्रस्तांची संख्या देखील मोठी आहे .. जणू आभाळच फाटले ! ठिगळ कुठे कुठे लावणार !! अशी परिस्थिती झाली आहे . अशा बिकट दुरावस्थेत सापडलेल्या शेतकरी राजाला आपण वाचवले पाहिजे .
संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आपण एक मदतीचा हात द्यायचा आहे . तेव्हा पुरोगामीत्वाचा नुसता टेंभा
मिरवणाऱ्यांनी आणि दिवस रात्र ओबीसी ओबीसी राजकारण खेळणाऱ्यांनी भानावर येऊन आभाळाएवढ्या संकटाला दोन हात करण्यासाठी शेतकऱ्यांना शक्ती , दहा हत्तीचे बळ प्राप्त
बळीराजाच्या अंगी येण्याकरिता चार पावले पुढे येण्याची गरज आहे कारण रात्रं दिन कष्ट करणाऱ्यांच्या हातांना बळकटी येण्याकरिता ,त्यांचे मनोबल वाढवण्याकरिता "एक हात मदतीचा " दिला पाहिजे . शासन -प्रशासन आपल्या पातळीवर प्रयत्न करेलच , पण आपण सुजाण नागरिक म्हणून काय करू शकतो ?खारीचा वाटा म्हणून आपली
एक कृती देखील शेतकऱ्याला थेट मदत म्हणून होऊ शकते .. त्याकरिता आपण पण काही गोष्टी करायला पाहिजेत त्या अशा ;शेतकऱ्यांच्या दुग्धजन्य पदार्थांचे भाव न करता शेतकरी जो भाव लावीन त्या भावाला खरेदी करावे त्याचप्रमाणे भाजीपाला खरेदी करताना आपण देखील भाव पाडून मागणी न करता त्यांच्या भाजीपाल्याची खरेदी त्यांनी लावलेल्या भावाप्रमाणे खरेदी करावी, त्याचबरोबर फुलांची आणि फळांची देखील किंमत न करता त्या ज्या भावाला फुले आणि फळे विक्रीकरिता ठेवले आहेत त्याप्रमाणे आपण किंमत कमी न करता खरेदी करावे त्याचबरोबर जर शेतकरी कापड , चपला , किराणा , भुसार इत्यादी संसार उपयोगी साहित्य खरेदी करायला जर आपल्या दुकानात आला तर त्याला आव्वाच्या सव्वा भावाने विक्री न करता "ना नफा ना तोटा " या तत्त्वानुसार त्याच्याशी आर्थिक व्यवहार केल्यास त्याच्या अंगणी निश्चितच दहा हत्तीचे बळ आल्याशिवाय राहणार नाही . कारण संकटाने खूप काही हिरावले आहे मुलाबाळांच्या शिक्षणाचा , वयात आलेल्या बाईलेकींच्या लग्नांचा , कुटुंबात असलेल्या आजारी आजी आजोबांच्या औषध पाण्याचा , अर्धवर्ट असलेल्या बांधकामाचा , नवीन दुभती जनावरे घेण्याचा अशा कितीतरी अगणित स्वप्नांचा नियतीने अक्षरशः 'चिखल '
केला आहे . तेंव्हा संकटग्रस्तांच्या पाठीशी कृतीने आपण साथ देऊया ...देणार ना मग ?
मारोती भु . कदम
(लेखक सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक आहेत )
संपर्क :९०४९०२५३५१
तिचं माहेरपण...
वसुधाला शाळेत जायची घाई होती.. गावातल्याच जि.प.च्या शाळेत ती प्राथमिक शिक्षिका म्हणून काम करत होती.घरात ती ,तिचा पती महेश व एक पाच वर्षांचा मुलगा आयुष अशी तीनच माणसं..तिच्या सासूबाई तिच्या
जावेचे बाळ छोटं असल्याने तिच्या कडे गेल्या होत्या.एकेक कामं ती पटापटा आवरत होती. एवढ्यात दाराची बेल वाजली.. तीने घाईने दरवाजा उघडला; तो समोर तिला रखमाबाई दिसल्या. त्यांना पाहून ती म्हणाली,
"काय काकू आज एवढ्या लवकर?"रखमाबाई म्हणाल्या,
"हो ताई आज मला जरा घाई हाय म्हणून सगळे काम बिगिन उरकावं म्हणलं." यावर वसुधा म्हणाली,"कशाची हो एवढी घाई? रखमाबाई म्हणाल्या,
"ताई मी आता दोन-तीन दिवस कामाला येणार नाही., वसुधा म्हणाली,"का कुठे जाणार आहात? की तब्येत ठीक नाही तुमची!
"नाही ताई तब्येत चांगली हाय माजी. पण पोरीने लय नाद लावलाय चार दिवस तिच्याकडे जाऊन येते. वसुधाला मात्र समोर संकट उभा राहिल्या सारखं वाटलं. गेल्या चार-पाच वर्षापासून रखमाबाई तिच्याकडे कामाला येत होत्या. कपडे भांडे व
साफसफाई सगळं काही त्याच करायचा. त्यामुळे त्यांचा तिला मोठाच आधार वाटायचा. रखमाबाईंना एक मुलगी व एकच मुलगा दोघांचेही लग्न झाले. मुलगी सासरी सुखात. मुलगाही आपल्या बायकोला घेऊन दुसरीकडे राहतो. त्याच्या बायकोचे व आईचे पटत नाही. त्यामुळे रखमाबाई एकट्याच राहायच्या. स्वतःचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी अनेक घरची कामं करायच्या. एका अपघातात मुलं लहान असतानाच त्यांच्या पतीचे निधन झालेले असल्याने खूप कष्टाने त्यांनी मुलांचा सांभाळ केला. वसुधाला एका क्षणात सारं काही डोळ्यांसमोर आलं..विचाराच्या तंद्रीतच ती भानावर आली.
रखमाबाईनी आपले काम करायला सुरुवात केली. कपडे भिजवून ठेवले व भांडी घासायला घेतली.भांडे घासतच त्या बोलू लागल्या,
"काय माहित ताई नेमकं पोरीच्या काय मनात हाय त्या दिवशी फोन आला होता तिचा.लईच नाद लावलाय बघा ये म्हणून...मला तर भ्या वाटायलयं जावयाचं अन् तिचं काही बिनसलं तर नसेल...?"वसुधा म्हणाली,
"नाही हो काकू असा काही वाईट विचार मनात आणू नका. चांगलं चाललंय तुमच्या राधाचं...सहजच तुमच्या भेटीसाठी बोलावलं असेल तिनं."
रखमाबाईं त्यांची काम करून निघून गेल्या. वसुधाही ऑफिसला गेली. रखमाबाई गेल्यावर तशी तिची दोन-चार दिवस बरीच धावपळ झाली.
मुलाचा डब्बा ,नवऱ्याचा डब्बा ... घरातील सगळी काम करता -करता तिची पुरे दम छाक झाली. तिच्या सासुबाईं तिच्याकडे होत्या तोपर्यंत त्यांचा खूप आधार वाटायचा. आता त्या जावेकडे गेल्यामुळे घरात कोणाचाच आधार नव्हता.तीन-चार दिवसाच्या सुट्टीनंतर रखमाबाईं सकाळी पुन्हा कामावर हजर झाल्या. आल्या तशा त्यांच्या कामाला लागल्या. वसुधाने विचारलं,
"काय झालं काकू कशाला बोलावलं होतं राधाने तुम्हाला? यावर रखमाबाई म्हणाल्या,"काय सांगू ताई मला वाटलं तसं काय बी नव्हतं. तिचा संसार लई सुखाचा झालाय. तिनं मला माहेरपणासाठी बोलावलं होतं," हे शब्द ऐकून वसुधाला आश्चर्यच वाटलं. रखमाई सांगत होत्या,"मी तिच्या दारात जातात तिने भाकरीचा तुकडा माझ्यावरून ओवाळून टाकला. पाय धुवायला पाणी दिलं .
चार दिवसात वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घातले. मायेने न्हाऊ- माखू घातलं. एखाद्या पोरीचे माहेरी व्हावे तसेच सारे लाड तिने माझे केले. जीवाला लई बरं वाटलं. अन् पोरीचं कौतुक बी वाटलं, जावयानं बी मला आईसारखी माया लावली. तिच्या सासूबाई बी माज्या राधीचं लय कौतुक करू लागल्या. दोन सोन्यासारखे नातवंड
आजी -आजी म्हणून जवळ येऊ लागले. जावयाने भारीची साडी घेतली.माझ्या जन्माचे सार्थक झाल्यासारखं वाटलं." सखमाबाईच्या लेकीने त्यांचे केलेले माहेरपण ऐकून वसुधाचे डोळे भरून आले. तिलाही तिच्या आईची खूप आठवण आली. भाऊ नोकरीसाठी पुण्याला होता. रखमाबाईंची आणि तिच्या आईची कथा थोडीशी सारखीच होती. तिच्या बाबांचेही असेच ती लहान असतानाच अल्पशा आजाराने निधन झालेले होते.आईने शाळेत सेविकेची नोकरी केली होती.मोठ्या धीराने दोन्ही मुलांना शिकवले व त्यांची लग्न करून दिली होती.त्यामुळे वसुधाला रखमाबाईंमध्ये आईच दिसायची. रखमाबाई त्यांचे काम करून निघून गेल्या.
वसुधाचे चित्त मात्र आज थार्यावर नव्हते. तिच्याही मनात सारखा आईच्या माहेरपणाचाच विचार येत होता. तिलाही वाटत होते आईला चार दिवस आपल्या घरी आणावं. आपण माहेरी गेल्यावर आई आपल्यासाठी जे जे करते ते ते सारं काही तिच्यासाठी करावं. तिला कितीं -कितीं आनंद होईल. आईच्या माहेरपणाच्या विचारातच ती आज घरी आली.
घरी आल्यावर आपल्या मनातला विचार तिने आपल्या पतीला महेशला बोलून दाखवला... त्यालाही तिची ही कल्पना खूप आवडली.आपल्या सासूच्या कष्टांची त्याला चांगलीच जाणीव होती.तो वसुधाला म्हणाला,"वसु खूप छान कल्पना आहे तुझी.. आपण आईंना थोडा जरी आनंद देऊ शकलो तर मलाही खूप छान वाटेल.आता सात -आठ दिवसात दिवाळीच्या सुट्ट्या येत आहेत. दरवर्षी तू आईकडे दिवाळीला जातेस यावर्षी त्यांनाच आपल्या घरी बोलवू. यावर्षीची दिवाळी आपण त्यांच्यासोबत आपल्या घरीच साजरी करु.काय कशी काय वाटली माझी कल्पना?"यावर वसुधा काय म्हणणार ती आनंदाने भारावून गेली.कधी एकदा दिवाळीच्या सुट्ट्या लागतात व कधी आई आपल्या घरी येते असे तिला झाले.
सात -आठ दिवस निघून गेले. सुट्ट्यांमध्ये आठ दिवस आईसाठी काय- काय करायचे याचे नियोजन वसुधा करू लागली.आईला तिने काहीच कल्पना दिली नव्हती. तिने आईला फोन करून ,"उद्या तुला घेण्यासाठी तुझे जावाई येणार आहेत असं सांगितलं. आईला म्हणाली," आई आम्ही या सुट्ट्यांमध्ये देवदर्शनासाठी जाणार आहोत.तुला सोबत घेऊन जायचे आहे त्यामुळे तू त्यांच्यासोबत उद्या ये. लेकीचे हे शब्द ऐकून मंदाबाईंना अवघडल्यासारखं वाटलं. हो नाही म्हणत त्या जावयासोबत यायला तयार झाल्या.
महेश तिच्या आईला आणण्यासाठी तिच्या माहेरी गेला .जावयाला अंगणात पाहून वसुधाच्या आई स्वागतासाठी पुढे आल्या. हात -पाय धुवायला पाणी दिले.चहा- पाणी झाल्यावर थोड्या विश्रांतीनंतर जेवायला वाढले. जावयाच्या आवडीचे चिंचगुळाचे वरण ,अळुच्या वड्या, मुगाचा शिरा, भात ,भजे ,पापड कोशिंबीर असे सारे पदार्थ त्यांनी केले होते. महेशचे जेवण झाल्यावर. मंदाबाईंनी जेवण केले सगळी आवरा आवर केली व थोडा वेळ आराम करून दोघेही निघाले.
इकडे आई येणार म्हणून वसुधा आतूर झाली होती.दोन- चार दिवसांवर दिवाळी आली होती. तिने आई येण्याआधीच बरेचसे फराळाचे पदार्थ करून ठेवले होते. स्वयंपाकाची सर्व तयारी झाली होती.एवढ्यात दारात गाडी आल्याचा आवाज आला.
वसुधा लगबगीने बाहेर आली.तिने सकाळीच दारात छानशी रांगोळी काढली होती.हातात औक्षणाचे ताट होते. तिने आधी आईवरुन भाकरीचा तुकडा ओवाळून टाकला व नंतर पाय धुऊन औक्षण केले. हे सर्व करत असतानाचा व्हिडिओ आयुष बनवतच होता.
हे सर्व पाहून मंदाबाईंचे मन भरून आले. वसुधा लगेच आईच्या कुशीत शिरली. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले.
थोडा वेळ चहा- पाणी इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर वसुधाने गरम गरम पोळ्या टाकल्या व जेवायला वाढून घेतले. वसुधाच्या आईने तिच्यासाठी आणलेले एक -एक पदार्थ पिशवीतून बाहेर काढले. आंबा, लिंबू ,मिरची असे वेगवेगळे लोणचे ,पापड, कुरडया, शेवया ,काळा मसाला असं बरंच काही त्यांनी आणलं होतं. सारे सामान त्यांनी वेगवेगळ्या डब्यांमध्ये, बरण्यामध्ये भरुन ठेवलं. सगळ्यांची जेवण झाली. आजी आल्याने आयुष खूप आनंदी झाला होता. सारखा आजीच्या अवतीभोवती फिरायचा ,मांडीवर बसायचा आजी कडून कोड कौतुक करून घ्यायचा, हे पाहून वसुधाला खूप आनंद वाटायचा.
दुसऱ्या दिवशी पहाटेच तुळजापूर, पंढरपूर व इतर ठिकाणी फिरायला जाण्याचा बेत ठरला. वसुधाने सगळी तयारी आधीपासूनच करून ठेवलेली होती आईच सामान तेवढे घेणे बाकी होतं. दोन दिवस बाहेर फिरून नंतर घरीच दिवाळी साजरी करायची असा विचार वसुधा व महेशचा होता. त्याप्रमाणे ते दोन दिवसात खूप छान सगळीकडे फिरून आले. दोन दिवसांची ही यात्रा संस्मरणीय झाली होती. आईंनाही एकटे एकटे राहून खूप कंटाळावानं वाटत होतं या दोन दिवसात तिला जणू भरभरून जगायला मिळालं. याचं मनस्वी समाधान वसुधाला वाटत होतं.
आता दिवाळी सुरू झाली होती.
वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन ,बलिप्रतिपदा , पाडवा व भाऊबीज दिवाळीचे सर्वच दिवस खूप आनंदात गेले. वसुधाने आईला आवडणारे एकेक पदार्थ दररोज तिला करून खाऊ घातले. मंदाबाईंना लेकीची माया पाहून डोळे भरून यायचे. क्षणोक्षणी तिच्या बाबांची आठवण यायची. पण लेकीचा सुखाचा संसार पाहून त्या समाधान मानत. असेच पाहता पाहता आठ दिवस निघून गेले.दिवाळीचे दिवस संपून गेले.वसुधाने आईचे माहेरपण करण्यात कोणतीही उणीव ठेवली नाही.लेकीच्या घरचे हे माहेरपण पाहून मंदाबाईना त्यांच्या आईची आठवण झाली.त्या वसुधाला म्हणाल्या,
"वसु खूप छान वाटलं गं तुझ्या घरचं हे माहेरपण. मला तर वाटतं प्रत्येक मुलींनी असं आईचं माहेर पण केलं पाहिजे. तेवढेच चार दिवस आनंदात जगता येतं."यावर वसुधा आईला म्हणाली,"हो आई अगदी खरं आहे तुझं. प्रत्येक आई आपल्या मुलींसाठी किती करत असते. पण उतारवयात तिलाही मायेची गरज असतेच की गं . मी यापुढे नेहमीच तुला असं माहेर पणाला माझ्याकडे घेऊन येईन. खूप छान वाटलं.. आईची आई होण्याचं
वेगळेच समाधान मिळालं मला. आता आईची गावी जायची वेळ झाली होती. वसुधाने त्यांची बॅग भरून दिली व आईसाठी आणलेली छानशी साडी त्यांना ती नेसायला दिली. आईच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून वसुधाला खूप छान वाटलं. महेश ने आईची बॅग गाडीमध्ये ठेवली.. आयुष ला एकदा जवळ घेऊन मंदाबाईंनी त्याचा
पापा घेतला. वसुधाच्या पाठीवरून, डोक्यावरून मायेने हात फिरवून तिला कुशीत घेतलं. त्यांचे डोळे भरून आले होते वसुधाच्याही डोळ्यात नकळत पाणी आलं... मंदाबाई गाडीत बसल्या...
नजर जाईल तोपर्यंत हात हलवून टाटा करत होत्या. पदराने डोळे पुसत होत्या... लेकीच्या माहेरपणाच्या सुंदर आठवणी सोबत घेऊन त्या पुन्हा नव्या उमेदीने जगण्यासाठी निघाल्या होत्या...
सौ.शारदा श्रीकृष्ण वानखेडे-चोपडे,
परभणी ९८२३०६६६०६
(नाटिका)
जीवन:
“आजोबा..आजोबा पाराजवळ
पाण्याचा टँकर आलाय ना तिथे पोलिसांची गाडी आणि ॲम्बुलन्स पण आली. नुसता आरडा ओरडा
ऐकू येत होता.काय झाले असेल? मला तर खूप भीती वाटली म्हणून मी पळत घरी आलो..”
आजोबा:
“युद्ध! युद्ध सुरू होईल पुन्हा..”
जीवन: “युद्ध! युद्धात तर बंदुकी तोफा शिपाई विमान
असतात ना!”
मित्र: “जीवन..आपण खेळू चल..”
जीवन: “घरात या.. नंतर खेळू आपण.”
आजी: “जीवन आलास का शाळेतून हातपाय धू.. तांब्या भरून पाणी
ठेवलेलं आहे.”
जीवन: “हो आजी धुतो. आजोबा,पाण्याच्या टँकर
जवळ भांडण म्हणजे युद्धाची सुरुवात ती कशी काय?
(सर्व
मुले) हो आजोबा टँकर वरचे
भांडण म्हणजे युद्ध असं कसं?”
आजोबा:
“त्याचं अस आहे..मुलांनो जगण्यासाठी सजीवांची
प्राथमिक गरज म्हंजे शुद्ध हवा पाणी अन्न आहे की नाही. हे जर नसेल तर जगणे अशक्य. पाणी
हा त्यातलाच घटक. बघ जीवन आज तुला हातपाय धुवायला आजीने फक्त एक तांब्या पाणी भरून
ठेवलं.. का बर असं केलं असेल,?”
जीवन: “आजोबा आपल्याकडे पाणीटंचाई आहे.दहा दिवसाला
एकदा टँकर येतो..”
आजोबा: “पाणी सर्वांना हव आहे की नाही. त्यासाठी लोक
भांडण करतात.अशीच परिस्थिती राहिली तर पाण्यासाठी युद्धच होतील.. म्हणून जमिनीवरचा
पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल आहे.त्याची जपणूक करणे काळाची गरज आहे..”
आजी: “पूर्वी असं नव्हतं दररोज नळाला पाणी येत
होतं..आता रोज येणारे पाणी जाऊन दहा दिवसाला टँकर येतो अशी स्थिती झाली…”
जीवन
आणि मित्र: “आजोबा जमिनीवरचे पाणी
संपतं का?”
आजोबा: “पाण्याचा योग्य वापर,जपणूक केली नाही तर एक
दिवस जमिनीवरचे पाणी संपून वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही…”
मुले: “बापरे
पृथ्वीवर वाळवंट सगळीकडे वाळू पाणीच नाहीच..! मग जगायचं कसं?”
आजोबा: “म्हणून तर काळजी घ्यायला हवी.जमिनीतून पाण्याचा
उपसा अफाट वाढलाय. त्यामुळे भूजल पातळी खालावत चालली आहे.वाढते शहरीकरण औद्योगीकरण
यामुळे पाण्याचा वापर असाच राहिला तर भूजल पातळी खालावत जाईल पिण्याच्या पाण्याची टंचाई
भासेल..”
आजी: “मुलांनो पूर्वी नदीचे पाणी आटायचं नाही
पुन्हा पावसाळा सुरू होईपर्यंत वाहती धार असायचीच..”
जीवन: “आता तर पावसाळ्यात चार महिनेच नदीला पाणी दिसतं..असं
का?”
आजी: “माणसांची करणी दुसरं काय?
आजोबा: देणाऱ्याने देत जावे,घेणाऱ्याने घेत जावे, घेता
घेता घेणाऱ्याने, देणाऱ्याचे हात घ्यावे हे विसरला माणूस..”
सर्व
मुले:
“म्हणजे?” (आई बाबा बाहेरून घरी येतात.)
जीवन: “आई, बाबा आले ऑफिसमधून हे…”
आजोबा: “मुलांनो तुम्ही खेळा आता नंतर सांगेन मी तुम्हाला.”
वडील: “बाबा पाणी पुनर्भरण करण्यासाठी कामगारांना
बोलावलं आहे. ते करतील पाणी पुनर्भरणाचं काम.”
आजोबा: “खूप चांगलं केलंस,आपल्या घराच्या गच्चीत
पडणारं पाणी त्याच जागेवर पडलं पाहिजे आणि तिथे जमिनीत मुरलं पाहिजे..”
बाबा: “हो बाबा..पाण्याचा विचार करणे आणि त्यासाठी
प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे.पाण्याची बचत,
प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर, पाण्याचं जमिनीवर अस्तित्व टिकवण्यासाठी..”
(मुले खेळून परतली.)
जीवन
व मुले:
“आई.. अंगणात पाईप,भिंतीवर पाईप हे काय?आणि कशासाठी?”
आई: “मुलांनो आपण सर्व पर्यावरणाचे मित्र
आहोत. म्हणून त्याची काळजी करणे आपणा सर्वांची गरज आहे.सांग बरं पावसाळ्यात पाऊस पडल्यावर
गच्चीवर पडणारं पाणी कुठे जात?”
जीवन: “ते असं गच्चीतून खाली येतं आणि फरशीवरून
वाहत जातं असं बाहेरच्या नाली मध्ये.”
आई: “म्हणजे वाहून जात की नाही ह्या वाहून
जाणाऱ्या पाण्याला आपण थांबवलं. थांबवलेल्या पाण्याला जमिनीत मुरवले हे बघ आता पाऊस
पडल्यानंतर गच्चीवरून पावसाचं पाणी पाईप द्वारे खाली येईल.ते इथे खाली केलेल्या शोष
खड्ड्यात जाईल आणि इथून ते पाणी जमिनीत मुरेल..”
जीवन: “आपल्याला त्याचा काय उपयोग ते तर जमिनीत गेलं.”
आई: “जीवन..अरे तेच पाणी जमिनीत साठेल आणि
जमिनी खालच्या पाणगुहा भरतील. अन् हेच भूजल पुन्हा कूप नलिका,विहीर यातून हे पाणी मानवाला
वापरता येईल.. मुलांनो एक प्रकारे जमीन ही पाण्याची बँक आहे. पाणी ही संपत्ती या बँकेत
भरून बचत केली तरच भविष्यात पाण्याचा पुरेसा पुरवठा होईल.जर सर्वांनी असं केलं तर पाण्याचे
दुर्भिक्ष कमी होईल..”
बाबा: “मुलांनो पाण्याच्या बचतीबरोबरच पाण्याचा
काटकसरीने वापर हे खूप महत्त्वाचा आहे सांगा बरं पाण्याची काटकसर आपण कुठे कुठे करू
शकतो?”
मुले: “कपडे धुणे,भांडी घासणे,आंघोळ करणे,
सडा टाकने व इतर घरगुती कामात आपण बचत करू शकतो.”
बाबा: “मुलांनो घरातील प्रत्येकाने एक एक तांब्या
बचत केली. तर सर्वांची मिळून रोज एक बादली. असं प्रत्येक कुटुंबाने केलं तर पाण्याची
कितीतरी बचत होईल.”
आजोबा: “हो मग पाण्यासाठी भांडण होणार नाहीत,युद्ध
होणार नाहीत.”
बाबा: “हो तर, मुलांनो पृथ्वीवर असलेल्या पिण्यायोग्य
3 % पाण्याचा योग्य वापर होईल.”
आई: “मुलांनो जमिनीवर पाण्याचे प्रमाण वाढवायचं,
टिकवायचं असेल तर भरपूर झाडेही लावावे लागतील. झाडेही पर्जन्यमान वाढवण्यासाठी उपयुक्त
असतात.मुलांनो आपण पर्यावरणाचे मित्र आहोत
पर्यावरणातील हवा,पाणी,झाडे,धरती. हे सर्व सजीवांसाठी उपयुक्त आहे हे सर्वजण
निस्वार्थपणे सजीवांसाठी देत असतात..”
जीवन,मित्र: “हं..आत्ता कळलं मगाशी
आजोबा असं का म्हणाले ते?”
आई: “काय म्हणाले आजोबा?”
मुले:
“देणाऱ्याने देत जावे,घेणाऱ्याने घेत
जावे ,
घेता घेता घेणाऱ्याने,देणाऱ्याचे हात घ्यावे..”
आई: “अगदी बरोबर..भरभरून देणाऱ्या निसर्गाची
जपणूक आपण करूया..
सारे मिळून हवा पाणी जमीन यांची शुद्धता टिकवू
या..”
सुप्रिया विजयराव श्रीमाळी
जि.
प. शाळा मिरखेल.
परिपाठ
परवा आमच्या शेजारच्या काकूंच्या मुलाची 'assembly' होती त्याच्या
'School' मध्ये. त्यासाठी अगदी रट्टा मारून मारून एका Moral Story' ची तयारी केली होती
म्हणे. सूटबूट घातलेला 'uniform' वेळ कळत नसली तरी हातात महागडं 'Watch', गळ्याला आवळून
बांधलेला टाय, खिशाला लटकणारा पांढराशुभ्र रुमाल अशा सगळ्या थाटात तो 'Simplicity
is the best policy' अशा आशयाची एक 'Moral Story' सांगणार होता.
त्याची
एवढी तयारी पाहून मला माझ्या शाळेतल्या परिपाठाचीच आठवण आली. १० वाजायच्या आत सगळ्यांनी
मैदानावर उभं असलं पाहिजे असा नियम होता. कारण १० च्या ठोक्याला राष्ट्रगीत सुरू व्हायचं.
सगळेजण आपापल्या उंचीनुसार एका रांगेत थांबलेले असायचे. अशी प्रत्येक वर्गाची मुलींची
आणि मुलांची वेगवेगळी रांग असायची. त्यात जर कोणी मधेच रांगेच्या एका बाजूला झुकलेला
असेल तर मागची पूर्ण रांगच वाकडी दिसायची. अशावेळी वर्गाच्या मॉनिटरची खरी कसरत असायची.
कारण एका बाजूला शिक्षकांचा दबाव आणि दुसरीकडे त्याचं कधीही न ऐकणारी मूलं !
राष्ट्रगीतानंतर 'भारत माता की जय' आणि
'वन्दे मातरम्' या घोषणा म्हणजे दिवसाची उत्तम सुरुवात असायची. त्यानंतर प्रतिज्ञेसाठी
उजवा हात एका हाताच्या अंतराने पुढे करायचा, पण हे अंतर कमी कमी होत तो हात समोरच्याच्या
खांदयावर कधी जायचा कळायचंच नाही. हाताला कळ लागते म्हणून हाताचा सगळा भार समोरचा झेलायचा.
मग संविधान होऊन खाली बसण्याची सूचना मिळायची आणि
मुख्य परिपाठाला सुरुवात व्हायची. दररोज एका वर्गाकडे परिपाठाची संपूर्ण जबाबदारी असायची.
परिपाठ घेणारी मुलं 'नवरी मंडपात' यावी तशी हळूहळू, रांगांमधून रस्ता काढत समोर यायची.
मग सूत्रसंचालकाच्या हातात माईक दिला जायचा. स्वतःचं नाव,वर्ग वगैरे सांगून सूत्रसंचालक
पहिल्यांदा सुविचार सांगणाऱ्याला विनंती करायचा. ही 'विनंती' म्हणजे अगदीच आदरानं बोलल्यासारखं
वाटायचं.
'अपयश ही यशाची पहिली पायरी आहे' 'हसा खेळा
पण शिस्त पाळा,'नेहमी खरे बोलावे' यापेक्षा जर वेगळा सुविचार असेल तर कान लगेच टवकारले
जायचे. सुविचार कितीही लांबलचक असला तरीही तो सांगणारा मात्र श्वासाशी युद्ध करून एका
दमात कसा बोलता येईल याचा विचार करायचा.एकदा का सुविचार सांगून झाला की तो सांगणारा
भल्यामोठ्या जबाबदारीतून मोकळं झाल्यासारखा आनंदून जायचा. 'आपलं झालं' हया आनंदात देणारा
शक्य तितक्या घाईत तो माईक दुसऱ्याकडे द्यायचा.
परिपाठाची यानंतरची पायरी म्हणजे 'दिनविशेष.
ही पायरी ऐकणं अत्यंत कंटाळवाणं काम. खरंतर इतका माहितीपर हा दिनविशेष पण ती सांगण्याची
पद्धत कदाचित रटाळ असल्याने बहुतेक जण खाली 'माना' घालत मातीत काहीतरी रेघोट्या मारायचे.
त्यांची तंद्री भंग व्हायची ती 'आजच्या ठळक बातम्या' अशा खड्या आवाजाने. मुख्यतः शैक्षणिक
क्षेत्रातील किंवा क्रीडाविषयक बातम्या सांगितल्या जायच्या. आजकालच्या टी.व्ही. वरच्या
बातम्यांपेक्षा परिपाठातल्या बातम्या नक्कीच श्रवणीय होत्या...
त्यानंतर परिपाठाला 'बोधकथेमुळे' एक रंजक वळण
यायचं.एखादा विचार गोष्टीच्या स्वरूपात ऐकायला कोणाला नाही आवडणार ? पण या बोधकथेच्या
वेळीच फार गमतीजमती व्हायच्या. कारण आमच्या शाळेच्या चहूबाजूंनी झाडंच झाडं होती. इतकंच
काय, आमचा परिपाठसुद्धा कितीतरी वर्ष जुन्या असलेल्या वडाच्या झाडाखाली व्हायचा. बोधकथा
ही कागदावर न बघता समोर मुलांकडे बघून सांगावी लागे. पण एवढ्या मुलांसमोर बघून बोलायची
भीती वाटल्यामुळे आपलं लक्ष अशा ठिकाणी ठेवायचं की भीती निघून जाईल आणि गोष्टही विसरणार
नाही. मग अशावेळी दिसायची ही सगळी झाडं, वडाच्या लोंबकळणाऱ्या पारंब्या, थोडी वर नजर
टाकली की दिसणारं निरभ्र आकाश, त्यात मुक्त विहरणारा पक्ष्यांचा थवा आणि हळूच समोर मुलांकडे बघत गोष्ट पूर्ण व्हायची.
' सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा' हा हसत-खेळत प्रश्नोत्तरांचा
खेळ! प्रत्येक वर्गाला त्याच्या पातळीनुसार एक प्रश्न विचारायचा आणि ज्याला उत्तर येईल
त्याला चोकलेटही मिळायचं. शेवटचा प्रश्न शिक्षकांसाठीही असायचा. शिक्षकांसहीत सगळ्या
विदयार्थ्यांमध्ये या फेरीत भारीच चढाओढ लागायची.
मोठ्या वर्गापेक्षा छोटया वर्गातल्या मुलांचा
परिपाठ आणखी पाहण्याजोगा असायचा. नुकतंच बोलणं आलेल्या बाळाचे शब्द आई जसे लडिवाळपणे
ऐकते, त्यात त्या बाळाचे शब्द सुधारण्याचा तिचा अट्टाहास नसतो, फक्त ती मनापासून त्याचं
कौतुक बघत असते, तशी ही छोटी मुलं समोर धीटपणे बोलायची, अगदी निरागसपणे !
आता परिपाठ शेवटच्या टप्यात आलेला असायचा. पसायदानासाठी
डोळे मिटून हात जोडण्याची सूचना मिळायची. सकाळच्या इतक्या प्रसन्न वातावरणात पसायदानाचा
एकच आवाज घुमायचा. डोळे उघडल्यानंतर सारा परिसर कसा सकारात्मक ऊर्जेनं भरलेला आणि प्रफुल्लित
व्हायचा. जणुकाही आपल्यासोबत पानाफुलांसकट झाडंवेलीही पसायदान म्हणतायत की काय असं
वाटायचं!
परिपाठ घेणाऱ्यांवरचं ओझं आता पूर्णपणे उतरलेलं
असायचं. उठण्याची सूचना मिळाली की आपल्या ड्रेसवरची धूळ मागच्यावर झटकत उठून उभं राहायचं.
"ज्या मुलांनी शाळेचा ड्रेस घातला नाहीये, सॉक्स-बूट घातले नाहीयेत किंवा मुलींनी
केस बांधले नाहीयेत, त्यांनी एक वेगळी रांग तयार करा "असं म्हणलं की मला Mini
Heart Attack आल्यासारखं वाटायचं. पण आता हे सगळं आठवून हसू आवरता येत नाही.
असा हा परिपाठ काही मजेच्या गोष्टी बाजूला सारल्या
तर सर्वांगाने किती सुंदर संस्कार करतो नं आपल्या मनावर !याच परिपाठात आपण 'या कुन्देन्दुतुषारहारधवला'म्हणत
शारदेला नमस्कार करतो किंवा 'गगन सदन तेजोमय'
गात त्या सर्वात्मक ईश्वराची आळवणी करतो. आत्मविश्वास, व्यक्तिमत्व विकास परिपाठानेच
वाढतो.
परिपाठ
कळत-नकळत व्यक्त व्हायला शिकवतो.परिपाठ निखळ आनंद देतो. हा आनंद शब्दात नाही मांडता
येत. किंबहुना त्या आनंदाला शब्दरूपात आणून मी तो सीमित तर करत नाहीये ना अशी भीती
वाटते. पण असो, ती एक केवळ आठवण असण्यापेक्षा कधीही वाचेल आणि मला पुन्हा परिपाठात
घेऊन जाईल, म्हणून हा छोटासा प्रयत्न !!
-श्रुती संतोष सेलूकर
पुस्तक परिचय ….
आजचे टोकदार वर्तमान.. पाणीबाणी नंतरच्या कविता
आज रासायनिक खताचा प्रचंड
मारा होत आहे.रासायनिक खताचा मारा झाल्याने मातीचा पोत बिघडत चालला आहे. तसे अलीकडच्या
काळात कवितेचे पीक जोरात येत आहे.पण गंभीर, चिंतनशील वास्तव अनुभूतीच देणे हे महत्त्वाचे
असते. यातूनच कवितेचाही पोत कसदार असणे गरजेचे आहे. पण हे तितकंसं फारसं दिसत नाही,दरम्यानच्या
काळात म्हणजे आता आली ती पण फारशी टिकत नाही. त्याच त्याच कविता तेच तेच.. पुन्हा पुन्हा
तेच असे झाल्याने रिमिक्स पणा वाढला आहे .हे जरी खरे असले तरी ज्यांचा गाभा घटकच कविता
आहे. असेदमदार कवी गंभीरपणे दमदारपणे आपल्या अनुभूती मांडणारे मात्र आजच्या स्पर्धेत
टिकून आहेत. १९८० नंतरची पिढी अतिशय सकस कविता लिहिणारी आली आहे. वाचन, चिंतन, मनन
झाल्यावर कविता तिफणीच्या तीनही तासोट्या तीर्र दिसाव्यात तशी कविता अंकुर अशा सकस
बियाण्यावाणी आली.तेही अनुभूतीचे चटके घेऊन आली. पुढे १९९० नंतर या कालखंडा पासून लिहिणारे
प्रसिद्धीपासून दूर असणारे , दर दहावर्षाला एकापेक्षा एक सकस कविता लिहिणारे, ‘ओस झाल्या दिशा‘ म्हणणारे , शिकलेल्या पिढीला ‘नांगरून
पडलेलं शतक ‘ ...असं वेगळं शीर्षक देणारे , ज्या मातीने भरभरून दिले त्या मायला
मातीवरची लिपी मातीला पाठी करून सुखदुःख जीवनात येऊन माती आणि पोळी हा समवाय धरून आपल्या
अनुभूतीतून कसदार लिहिणारे ,आपल्यासाठी पाणीबाणी नंतरच्या कविता लिहिणारे कवी रमेश
चिल्ले होत.आज मराठी वाङमयात खऱ्या अर्थाने कथा कवितेने मोलाची भर घातली .ज्यांनी कवितेला
जीव लावला आपल्या आयुष्यात कवितेवर,मातीवर,नितांत प्रेम केलं असे कवी रमेश चिल्ले यांचा
पाणीबाणी नंतरच्या कविता हा संग्रह हाती आला.अगदी आठ दिवस या संग्रहात रमलो . काही
कविता पुन्हा पुन्हा वाचल्या खऱ्या मीठ भाकरीची जाणीव झाली. एक तर कवी रमेश चिल्ले
यांचे प्रचंड चिंतन ,अफाट वाचन त्यांच्या लेखनातील सकसता,यामुळे कवीने बरेच काही नवीन
दिले आहे. या संग्रहात काही भाग केले आहेत. पहिला भाग आहे पाणी पाणी ..दुसरा भाग आहे
कष्टवंत...नांगर,करोनाष्टक असा हा आलेख उंचावत गेलेला आहे. कवी रमेश चिल्ले यांना पाऊस
घेरतो यांच्या पहिल्या भागात पाऊस आहे.खरे तर हे स्पष्टपणे म्हणतात. पावसाचे वेळापत्रक
हरवले आहे. "वेळापत्रक हरवलेला पाऊस”
मुक्तछंदातील
ही कविता इतकी सहज लय घेऊन येते. ही कविता अतिशय चपखल आहे
"पाऊस
परतुन बरसतो
शेतकऱ्याच्या कोरड्या ठक्क डोळ्यात
आज-काल
खोटेच ठरवतोय पाऊस
चक्कं
हवामानाचा अंदाज
हल्ली
त्याला हंगाम सोडून
बरसायला
बरे वाटायला लागलेय..
म्हणे
नको तेव्हा नको तेवढे
कोसळून
सरासरी
भरून
काढतो वर्षाची..."
आज अलीकडच्या काळात खरोखरच पावसाचे वेळापत्रक बिघडले आहे.
भर उन्हाळ्यात प्रचंड पाऊस पडतो .त्यामुळे नांगरून टाकलेल्या जमिनीची बरोबर धूप होत
नाही.जमीन प्रचंड तापली तरच पीक जोमात येऊ शकते. जमिनीची मशागत केल्यावर खऱ्या अर्थाने
नांगरणी झाल्यावर जमीन तापणे आवश्यक आहे. पण अलीकडच्या काळात निसर्गचक्र बदलत चालले
आहे म्हणून कवी प्रकर्षाने लिहितो, शाळा कॉलेजचे वेळापत्रक..अन अभ्यासक्रमही दुरुस्त
करावा लागेल.. सगळ्या पंचांगाचा अन तिथीचा
फेरफार
करावा लागेल..
मोसमी
वा-याचे लेखी आश्वासन घेऊन
कमी
दाबाच्या पट्ट्याची वाट पहावी लागेल...."
कवी रमेश चिल्ले यांनी आजचे टोकदार वर्तमान टिपले आहे.पावसाचा
काहीच अंदाज खरा ठरत नाही. कवी म्हणतो अभ्यासक्रमही दुरुस्त करावा लागेल.पंचागांच्या
तिथीवरचा फेरफार करायला कवी सांगतो. या कवितेतील फेरफार सारखी प्रतिमा किती बोलकी आहे.
खरे तर ग्रामीण जीवन या ग्रामीण जीवनातील सुखदुःख शेतकऱ्यांच्या व्यथा, वेदना सारखा
पाऊसच पडत गेला..तर ओला दुष्काळ हा शेतकऱ्याला किती घातक ठरतो. कधी कधी पाऊस पडतच नाही.तेव्हा
कोरडा दुष्काळ पडतो हजारो रुपये खर्च करून बियाला बी जेव्हा निघत नसेल,तर शेती किती
तोट्यात आहे.हेही प्रकर्षाने दिसते.या संग्रहात एकापेक्षा एक सकस कविता कवीच्या लेखणीतून
तरारून आलेल्या आहेत.
"बिन पावसाचे
ढग ". ही कविता वाचकांच्या हृदयात घर करून बसते. प्रत्येकाला अंतर्मुख करते.
“ बॅलेन्स संपल्या सिमकार्ड गत
पावसाची
अवस्था सर्व दूर...
ऐन
हंगामातही किती वाट पहावे
तो
हमखास रेंज बाहेर गेलेला..
धरणं
सारी ड्राय होत गेली..
जिवंत
नद्यांचे डस्टबिन झालेले..
शिवार
सारे व्हायरलगस्त...
सबसिडी
पॅकेजच्या यादीत..." काय असते कविता.. ते कवी रमेश चिल्ले यांचा
संग्रह वाचल्यावर त्यांच्यातील दमदारपणा..त्यातील प्रतिमा,प्रतिक कसे चपखल येऊन बसतात
..खरे तर नव्या पिढीतील कवींनी ही कविता वाचावी ..त्यातून त्यांना वेगळेपण सुचेल..
कवी रमेश चिल्ले हा कवितेची कार्यशाळा घेणारा कवी ..नव्या पिढीला कवितासंग्रहाच्या
रूपाने कार्यशाळा देतो...निसर्गही शेतकऱ्यांना साथ देत नाही.त्याचबरोबर आजची व्यवस्था
ही शेतकऱ्यांच्या बाजूने नाही. म्हणून कवी शेवटी म्हणतो,आश्वासने देणारे बिन पावसाचे
ढग पाचवर्षा शिवाय येणार नसतात.. निसर्ग चक्रासोबत आजची अवस्था कुणब्यांच्या कष्टकऱ्यांच्या
मालाला योग्य भाव देत नाही.हमीभावही पिकाला मिळत नाही. तो मिळाला पाहिजे अशी मागणी
आहे. पण तसे घडून येत नाही. बळीवंत सारख्या कवितेत कवी लिहितो.
"आम्ही वंशज बळीचे
नाही पाताळाची भीती
करू रक्षण मातीचे
ढाल आमुची ही छाती"
कवी
रमेश चिल्ले यांच्या काही अष्टबंधातील कविता अतिशय सहज आहेत. ओठावर खेळणारी ही कविता..आहे
ती वाचकाला खिळवून ठेवते.शेतकऱ्याच्या पिढ्यान पिढ्या अनेक पिढ्या मातीत खपल्या..घामाच्या
धारीतून शेती फुलवणारा बळीराजा.त्याची व्यथा कवीने प्रकर्षाने मांडली.
"जलसंकट
" सारख्या कवितेत कवी लिहितो...
पाण्यापावसाने
जीव, चोळामोळा
दुष्काळच्या
झळा, पिका पाखरांना
आला आला म्हणताना, देतो हुलकावणी
जीव लागे टांगणी, जितराबांचा..
पावसाचं
संकट किती भयानक असते. ते या कवितेतून कवीने प्रकर्षाने मांडले आहे. शेतकऱ्याला कधी
कोरडा दुष्काळ कधी ओला दुष्काळ यातच कुणबी भरडून निघत आहे.सोन्याचा "नांगर
" सारख्या कवितेत कवी सहज व्यक्त होतो.
"सर्वोत्तम
भूमिपुत्र गौतमाने हाकलेल्या..
सोन्याच्या नांगराचा इतिहास आम्ही कसा विसरावा
..”
इथल्या कोट्यावधी कष्टवंताना
जगण्याची प्रेरणा देणारा राजा आमच्याच तर कुळातला होता.ही कविता वाचनीय आहे. एकेकाळी
जगाचा पोशिंदा शेतकरी राजा होता . तो सर्वांना
अन्नपुरिवणारा.. त्याचे वैभव काय होते .आज त्यांच्या वैभवाला कोणाची दृष्ट लागली. सोन्याचा
नांगर तर सोडाच आज लोखंडी नांगरही अडगळीला पडला आहे. आता झाड दिसत नाही.बैलही दिसत
नाहीत.गाई,ढोर हेही गोठ्यात दिसत नाहीत.गावाकडे अंगणालाही सेना मातीचा गंध राहिला नाही.
आज ग्रामीण भागातील अस्सल मराठी शब्द बाद झाले आहेत .खळं, बैलखळं,तिव्हाळा, पाचुंदा
,मेड, हातनी.. रास बैल
खळं,
गौ-या, हुडवा,दुरडी आता नवी पिढी असे शब्द गुगलवर सर्च करीत आहेत.नवी पिढी या गोष्टी
पासून खूप दूर गेली आहे. आपली संस्कृती टिकून राहिली पाहिजे म्हणून प्रत्येकाला भाषाभान
असणे महत्त्वाचे आहे ही कविता ग्रामीण अस्सल बोलीची असल्याने कवितेचा साज आणि बाज ग्रामीण
आहे. हे शब्द संस्कृतीतून येत आहेत . नवी पिढी शेती मातीपासून आम्ही दूर जात आहे .आजअलीकडच्या
काळात अनेक रोग येत आहेत. काही वर्षांपूर्वी कोरोना सारखा भयानक रोग आला होता. तो जगभर
पसरला. आनेकांना.. कोरोना रोगाची लागण झाली..हा कवीही कोरोना योद्धा आहे.. म्हणून कवी
सहज लिहून जातो .
"असा कसा रोग,धास्तावले जग
आपलाची भोग,आपणाशी.."
अशी कोरोना काळात हजारो माणसं
बळी गेली. जगभर भीतीदायक वातावरण तयार झाले. सर्व जग हादरले..खरोखरच कोरोना काळातील
वास्तव हे कोणीही नाकारू शकत नाही .कोरोना काळातील अनुभूती कविने वस्तुनिष्ठ टिपल्या.
कोरोना काळात सर सर्व जग घायाळ झालं होतं. लाट सर्व दूर पसरली होती.खरोखरच कोरोना काळातील
वास्तव हे कोणीही नाकारू शकत नाही. "अंधाराचे ढग”
सारख्या
कवितेत कवी लिहितो,अरे विठ्ठला पांडुरंगा, म्हणून कोरोनाच्या रांगाच रांगा दर्शवतो.
कवी प्रकर्षाने लिहून जातो.
“बा विठ्ठला तू तर
जगाची माऊली
कृपेची सावली ..
दुनियवर दाटलेले
गर्द काळोखी
अंधाराचे ढग...”
आता
तरी चेतनाच्या प्रकाशाने अवघे आसमंत उजळून टाक..सुरजनाच्या वेलीवर मांगल्याची फुले
..उमलु दे रे बा पांडुरंगा.. हरी पांडुरंगा ...खरोखरच असे अंधाराचे ढग दाटून आले होते
.कोरोना काळात अनेक दिग्गज प्रतिभावंत लेखक, कवी,इंजिनियर, अधिकारी,प्राध्यापक आम्हाला सोडून गेले.शेवटी कवी विठ्ठलालाच प्रार्थना करतो आता तरी असे संकट आणू नको हे अंधाराचे ढग आता दूर कर. इथल्या सृष्टीला इथल्या शेतीमातीला काबाडकष्ट करणाऱ्या कुणब्याला तू आत्मबळ दे. सर्व दूर पसरलेला अंधार दूर हो उद्याचा सूर्य लाखाखत येवो.आता कुठलाच रोग येऊ नये अशी महामारी आली तर प्रत्येक देशाची फार मोठी हानी होते.शेतात राबणाऱ्या कुंणब्याचे बेहाल झाले.शेतात पिकलेले टरबूज, टमाटे अक्षरशा रस्त्यावर फेकून द्यावे लागले.सर्व यंत्रणा बंद झाली होती. सर्व दूर लॉकडाऊन लागला होता. अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झाली होती. कितीतरी माणसांचे बळी गेले.घरच्या घरी माणसे बिमार पडली होती. दवाखाने फूल्लं भरले होते. फक्त मेडिकल, किराणा दुकान एवढेच चालू होते.सर्व मंदिरे बंद होती. रस्त्यात कोणीच दिसत नव्हते कुणाचा अंत्यविधी कोण करत आहे. काहीच माहित नव्हते. अनेकांच्या अंत्यविधीला घरातील माणसंही नव्हती. किती भयानक दुःख व्यथा, वेदना कोरोना काळात होत्या.याचं विलोभनीय चित्र कवी रमेश चिल्ले यांनी टिपले आहे. व्यापारही बंद होता. लॉकडाउनच्या काळात कुणब्याची झालेली गोची..बळीराजा यांची व्यथा....शेतकऱ्याचे दैनंदिन दुःख कवीने बारकाईने जवळून पाहिलेलीच नव्हे तर अनुभवलेली आहेत.कोरोना काळातील कवीने अतिशय अनुभवलेले चित्र रेखाटले आहे.
टाळ्या वाजवल्या, दिवे पाजळले. कुणा कळले,महामारीचे
घरीदारी लहानथोर ,स्क्रीनला चिटकली जगण्याला लागली..
टाळे बंदी चोहीकडून सूचनाच चोहीकडून सूचनाच सूचना,
धो धो भडीमार.. भयाची ही तार थरथरे सर्दी..खोकल्याचा म्हणे
घेतलेला धसका, बार हो फुसका चाचण्याचा
डोळ्यादेखत हजारोंनी करते धरते गेले.. बेवारस राहिले निष्पाप मागे...
असं कोरोना काळातलं वस्तुनिष्ठ चित्रण कवी रमेश चिल्ले यांनी आपल्या ओघवत्या शैलीत प्रकर्षाने टिपले आहे. कोरोनाष्टक हे शीर्षक या कवितेला अतिशय समर्पकपणे त्यांनी माणलेले आहे.इथला कुणबी आबादी आबाद होऊ दे. या सुर्जनाच्या वेलीवर मांगल्याचे फुले.. फुले बहुरूदे..सुगंध परत येऊ दे ..इथल्या तळ भारतीय समाजाला सुखी ठेवून त्यांच्या जगण्याला नवी दिशा मिळो.. अशी भावभावना पसायदानाची प्रार्थना ..कवी रमेश चिल्ले यांनी मुक्तछंदातून सहजपणे टिपली आहे. कवी रमेश चिल्ले यांनी जे जे भोगले, अनुभवले ,अस्सल ग्रामीण भाषाशैली ,सूक्ष्म निरीक्षक, ग्रामीण साज व बाज साधी, सोपी, भाषा शैली कुठेही ओढून, तोडून न आलेले शब्द.. असे नाही ही कविता सहज तरारून आली आहे. सर्वसामान्य वाचकाला समजणारी अशी आहे. कवी रमेश चिल्ले यांच्या कवितेची विशिष्ट ग्रामीण बोली सूक्ष्म निरीक्षण ग्रामीण साज आणि बाद अशीही वैशिष्ट्ये आहेत.. इसाप प्रकाशनचे मालक दत्ता डांगे यांची सुंदर मांडणी व बांधणी. सरदार जाधव यांचे अप्रतिम असे मुखपृष्ठ आहे.कवी लेखक शंकर वाडेवाले यांनी या कवितासंग्रहाची पाठराखण अप्रतिम केली आहे.त्यामूळे हा संग्रह वाचनीय झाला आहे.कवी रमेश चिल्ले यांना पुढील लेखणीस मनःपूर्वक शुभेच्छा...
प्रा. महेश मोरे,नांदेड
"पाणी पाणी नंतरच्या कविता"
कवी रमेश चिल्ले
इसाप प्रकाशन
सहयोग नगर, नांदेड
भानुदास धोत्रे यांचा
कवितासंग्रह : आभाळाच्या मुली
परभणी जिल्ह्यातील बालकवी
भानुदास धोत्रे यांचा ' आभाळाच्या मुली ' हा पहिलाच कवितासंग्रह ' समग्र शिक्षा अंतर्गत
' चौथी व पाचवी या स्तरासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे
यांच्यामार्फत प्रकाशित झालेला आहे.
भानुदास धोत्रे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत
उपशिक्षक आहेत. लहान मुलांच्या सानिध्यात राहिल्यामुळे त्यांना सुरम्य आणि आकर्षक मुलांची
दुनिया अनुभवायला मिळाली आहे. मुलांची ही इंद्रधनुषी रंगाची दुनिया जितकी अद्भुत आणि
सुखमय आहे, तितकीच त्यांची कविता सुखद आणि रसयुक्त उतरलेली आहे.
आपल्या कवितासंग्रहाच्या मनोगतात ते मुलांना
उद्देशून म्हणतात की,
" तुमच्या वयोगटासाठी लिहिलेल्या, तुम्हाला
मनमुराद आनंद देणाऱ्या, तुमचे भरपूर मनोरंजन करणाऱ्या, तुमच्या ज्ञानात भर घालणाऱ्या,
तुमच्याच परिचयातील, तुमच्या अवतीभवती असणाऱ्या वस्तू, परिसरातील प्राणी,पक्षी, जमीन,
जंगल, पाऊस, ढगोबा, चांदोमामा, लुकलुकणारे तारे, तुमचे नातलग, तुम्हाला पडलेले प्रश्न,
कुतूहल ,या सर्वांची सहजपणे उकल व्हावी म्हणून ' आभाळाच्या मुली ' नावाचा माझा एक छोटे
खाणी बालकविता संग्रह तुमच्या हाती देत आहे "
त्यांचे हे मनोगत मुलांसाठी उपयुक्तिसंगत आणि
अर्थपूर्ण आहे. हिंदी बालकवी निरंकार देव सेवक म्हणतात की,
"
बच्चों का मन इतना चंचल, और कल्पनाए इतनी तेज होती है कि, किन्ही निश्चित नियमसे बंधा
हुआ साहित्य उनके लिये लिखा ही नही जा सकता. "
पण
भानुदास धोत्रे यांनी लिहिलेल्या कविता याला अपवाद आहेत. या कविता जणू दुसऱ्या दुनियेतून
लहान मुलांसाठी परी सारख्या पंख लावून उतरल्या आहेत. इतक्या त्या सरळ कुतूहलपूर्ण आणि
जिज्ञासायुक्त आहेत.
आभाळीच्या तारकांशी
पाहू जरा बोलून
उंच उंच किती त्यांना
कोण धरतंय तोलून
मुलांच्या नजरेतून आभाळातील तारकांकडे पाहणारी कवीची ही दृष्टी
लहानपणी तुम्हा आम्हाला आणि नेहमीच सर्व पिढीतील लहान मुलांना पडलेल्या प्रश्नाची कुतूहल
आणि जिज्ञासा वृत्ती आहे.
वर म्हटल्याप्रमाणे या संग्रहातील सर्वच
कविता इंद्रधनुषी रंगाच्या आहेत. या सप्तरंगी दुनियेचे विवरण, विवेचन, आणि प्रस्तुती,
कवीने आपल्या काव्यातून केली आहे. परंतु या सप्तरंगापैकी पांढऱ्या रंगावरील त्यांची
कविता अधिक सप्तरंगी झाली आहे. कापूस पांढरा असतो. कागद पांढरा असतो. रानात वेगाने
धावणारा ससा पांढरा असतो. दूध पांढरे असते. सायी पांढरी असते. ताक पांढरे असते. खडू
पांढरा असतो. रांगोळी पांढरी असते. साखर पांढरी असते. साबणाचा फेस पांढरा असतो. या
पांढऱ्या रंगाला पाहून मुलांपुढे उजेडाचे उजळ असे पांढरे रूप उलगडत जाते.
या संगत एकूण 19 कविता आहेत या सर्वच कविता
मुलांच्या भावना कल्पना आकांक्षा जिज्ञासा विचार आणि एकूणच जीवनमानावर व्याख्याइत होतात.
मुलांना स्वतःची दृष्टी असते. ही दृष्टी
सतत आजूबाजूचा परिसर पाहत असते. शाळेत जाताना त्यांना रस्त्याने एखादी भाजीवाली आजी
दिसते. तिच्याजवळचा हिरवा गार भाजीपाला दिसतो. या संग्रहातील ' भाजीवाली आजी ' ही कविता
खूपच अलंकारिक रूप घेऊन संग्रहात अवतरते.
अनुसया माळीन बाई होत्या
माझ्या शेजी
गावभर ओळख त्यांची भाजीवाली
आजी
अशा
कमीत कमी शब्दातून कवीने भाजीवालीचे व्यक्तिचित्रण रेखाटले आहे. सर्वांना परवडणाऱ्या
भावात ही माळीन बाई भाजी विकत असे. त्या शाळा शिकलेल्या नव्हत्या. पण त्यांचे वागणे पाहून सगळेजण त्यांचा सन्मान
ठेवीत असे.
माणूस आणि संवेदना यांचे एक अतूट नाते आहे.
या संग्रहातील अनेक कवितांना कवींने संवेदनेची विविध रूपे जोडलेली आहेत. विशेषतः बाल
मनोवैज्ञानिक अनेक रूपे या संग्रहातील कवितांमध्ये दिसून येतात. कारण लहान मुलांची
मने ही संवेदनांची गाठोडी असतात. आजच्या तांत्रिक युगात मानवी संवेदना बोथट झाल्या
आहेत. कवी येथे त्यांना परत उजाळा देताना दिसतो. ' चिऊताई कुठ तू हाय ' या कवितेतून
अशी संवेदना काळजाला भिडते.
उन्हाचे तांडव अंगणात
मांडव
मांडवाला खोपाच न्हाय
चिऊताई कुठे तू हाय
?
अशी
जिव्हारी लागणारी संवेदना कवी कवितेतून व्यक्त करतो.
तर ' हरीण बाई ' या कवितेत उंच उंच उड्या मारीत
मोकळ्या राणी फिरणाऱ्या नाजूक हरणाचे बागडलेपण कवी निरागस पणे व्यक्त करतो. पण वाघोबाच्या
तिरक्या चाली पासून स्वतःचा बचाव करायला ही सांगतो. ही कविता मानवी पातळीवर हळूहळू
उतरत जाते. जणू कवीने उत्साहाने बागडणाऱ्या लहान मुलींसाठी ही कविता लिहिली आहे की
काय असे वाटू लागते. कारण मुलींचे बालपण हे बागडणाऱ्या हरणी सारखे असते. हरणी नाजूक
असते. भित्री असते. पण तिला आजूबाजूच्या परिसराकडून मोठा धोकाही असतो.
छोट्या छोट्या आणि नाजूक गोष्टींवर कवीने केलेल्या
कविता मुलांना खूप आवडतील इतक्या सोप्या भाषेतून त्यांनी कविता लिहिल्या आहेत हाताच्या
पाच बोटांवर केलेली कविता मुलांच्या हृदयात खुशीची ओंजळ भरून टाकते म्हणूनच कवी म्हणतो
की
पाच पाच बोटांच्या निराळ्या
तर्हा
एके जागी आणून ओंजळ
भरा
ढग
आणि पाऊस यांचे एक अतूट नाते आहे. या नात्यावर मराठी बालसाहित्यात अनेक कवींनी सुंदर
सुंदर कविता केल्या आहेत. पण भानुदास धोत्रे यांनी ढगांवर आणि पावसावर केलेल्या कविता
खूप मार्मिक,साध्या सोप्या शब्दातील, आणि आशय घन, कविता आहेत.
पांढऱ्या ढगा पांढऱ्या ढगा
नेसून येरे काळा झगा
असे ' ढगा ' या कवितेतून
म्हणताना पुढील ' पाऊस' कवितेत कवी म्हणतो की,
पावसाला कुठे लागते
शिडी
टप टप थेंबाने घेतो
उडी
लहान मुलांची बहुआयामी क्षितिजे कवी अशाप्रकारे
विस्तारित नेतो. काळे ढग आले की पाऊस पडतो. पण हा पाऊस पडण्यासाठी पावसाला शिडीची गरज
नसते. तो टप टप थेंबानी खाली येतो.
या दोन्ही कवितांमध्ये बालकांची भाषा आहे.
म्हणून या कवितांना बालकाव्य म्हणतात. त्यांची स्वतःची दृष्टी या कवितेमधून विस्तारत
जाते.
शाळेला सुट्टी आणि आनंद यांचे नाते अतुट आणि पिढ्यानपिढ्यांचे आहे. ' हुप हुप
हुर्रे....! हुप्पा हुय्या..!' या कवितेत मुलांना सुट्टी लागल्यानंतरचा उसळता आनंद
कवीने किती सोप्या आणि अलवार भाषेत रेखाटला आहे.
अट्टी कट्टी बारा बट्टी
हुप हुप हुर्रे लागली
सुट्टी
अशी
शब्दांची नादमय लय मुलांना उड्या मारीत नाचायला शिकवते. बालपण आणि कवितेची भाषा यांच्यामधील
एक अस्पर्शीय संबंधाकडे ही कविता इशारा करते. आणि कवीच्या अनुभव व अभिव्यक्तीची प्रामाणिकता
दाखवते. कविता काव्यभाषा आणि बालपण यांच्या एकत्रिकरणाला सकस बालकविता म्हणतात.
असे म्हणतात की कवी लहान मुलांच्या कथित बालरूपातून
अधिक काव्यात्मक अभिव्यक्तीद्वारे आपले मासूम बालपण शोधित असतो. त्याशिवाय इतकी सुंदर
अभिव्यक्ती कवीकडून होऊ शकत नाही.
' फळांच्या दुकानात ' या कवितेतून प्राकृतिक
वस्तूंच्या साथीने त्या वस्तूंची विशेषता कवीने प्रदर्शित केली आहे. त्यामुळे कवितेतून
विविध रंगीबिरंगी प्रेरणा मुलांसाठी उपलब्ध करून दिली आहे. वेगवेगळ्या झाडाला वेगवेगळी
फळे लागलेली असतात. पण ही सर्व फळे दुकानात विक्रीसाठी एकाच ठिकाणी ठेवलेली दिसतात.
त्यामुळे फळांची रंगीबिरंगी दुनिया कवीने या कवितेतून यमक, अलंकार, उपमा, यांच्या मदतीने
मुलांपुढे खाऊ सारखी ठेवलेली आहे.
फळांच्या दुकानात पेरू
हिरवे लाल
केळाच्या फण्यांचे पिवळे
जर्द गाल
फळांच्या दुकानात फळ
फळावळे
लबाडा रे जीभ तुझी कशी
वळवळे
अशी
सुखमय आणि रसयुक्त कवितेची रचना लहान मुलांच्या जीभेची चव वाढविणारी आणि बुद्धीला पौष्टिक
खाद्य पुरवणारी आहे.
शेतकऱ्याकडे असलेली बैलजोडी म्हणजे त्याचा
जीव आणि प्राण. तो परमेश्वरा इतकीच आपल्या बैल जोडीची भक्ती करतो. भानुदास धोत्रे यांच्या
कवितेतील ' सर्जा राजा ' म्हणजे एक आळशी आणि एक कामसु ...आळशी बैलाला कामसू बनवण्यासाठी
या कवितेतील शेतकऱ्यांनी वापरलेली युक्ती मात्र अफलातून आहे. तो कामसू बैलाचे भलतेच
लाड करतो. त्यामुळे सर्जाला भलतेच कोडे पडते. मालक करतो राजाचे लाड
आपल्या नशिबी मात्र
हाड हाड
असा
विचार करून सर्जा ही आपले लाड करून घेण्यासाठी आळस झटकून कामाला लागतो.
या कवितेतून भावनात्मक आणि शारीरिक सामंजस्य
दाखवीत कवीने सर्जा राजाच्या रूपाने नकळत मुलांमध्ये आळस झटकून टाकण्याचा संदेश पेरला
आहे.
पर्यावरणीय बोध देण्यासाठी लहान मुलांनी ' खेळावे
कुठे ' ही कविता कवीने समर्पक शब्दातून साकारली आहे. मैदानच नाही खेळावे कुठे
सवंगड्यांसह लोळावे
कुठे
ही समस्या आजकाल सगळीकडे दिसून येते. कारण वाढत्या
लोकसंख्येमुळे, आणि वाढत जाणाऱ्या इमारतींमुळे, खेळाची मैदाने कमी होत आहेत. ही फक्त
मुलांचीच समस्या नाही. तर निसर्गातील पक्षांची ही आहे. पक्षांना घरटी बांधण्यासाठी
झाडेही शिल्लक राहिलेली नाहीत. म्हणूनच ' एक पाखरू' या कवितेत कवी एका पाखराची तक्रार
नोंदवतो.
आम्ही
पाखरं रस्त्यावर आलो
झाडाविना
पोरके झालो
नाही
अन्न नाही खोपा
दिवसाढवळ्या
उडाल्या झोपा
माणसांमुळेच
बेतली दशा
आमच्या
पिढ्या वाढतील कशा
मुलांना
अनेक प्रश्न पडतात. त्यांचे चेहरे नेहमी प्रश्नांकित असतात. का? का? आणि का? या प्रश्नांचे
कोडे त्यांना नियमित पडत असते. या कवितासंग्रहातील ' का चे कोडे ' ही एक सुंदर कविता
आहे. संवेदी वातावरणातून आणि अस्तित्वगत चिंतेतून मुलांपुढे असे संज्ञानात्मक प्रश्न
उभे राहतात. तरीही त्या प्रश्नांची उत्तरे ना कालच्या पिढीकडून त्यांना मिळाली. ना
आजच्या पिढीकडून. म्हणूनच कवितेच्या शेवटी कवी म्हणतो की,
'का' ची गाडी 'का '
चे घोडे
घालून दमलो ' का ' चे
कोडे
' नावडतीचे मीठ आळणी ' या कवितेत कवीने मुलांच्या
नावडत्या भाज्यांवर खूपच सुंदर कविता केली आहे.
कारल्याची
भाजी कडूच कडू
कांद्याला
पाहतात येते रडू
हिरवा
चुका लागतो आंबट
शेपू
मेथीचे दाताला संकट
काय
सुंदर कविता केली आहे? तीही मुलांच्या रोजच्या नावडत्या भाज्यांवर. बालकविता काय असते?
आणि बाल कवितेला कसे महत्त्व दिले पाहिजे? याची कवीला खूपच रचनात्मक जाण आहे.
भानुदास धोत्रे यांच्या अभिजात वर्गात मोडणाऱ्या
या सगळ्याच कविता एकदा तरी वाचायलाच हव्या. त्यांचा हा पहिलाच कवितासंग्रह असला तरी
कवीला बाल कवितेची किती सुंदर जाण आहे हे दिसून येते. बाल कवितेच्या काव्यशास्त्रधारेमध्ये
ही कविता वेगळ्या प्रकारे उठून दिसते. काव्यभाषेच्या शरीर लय शास्त्रामध्ये त्यांच्या
कवितेच्या रूपाने नवीन शैली निर्माण केली आहे. लहान मुलांची कविता एक फलता फुलता बाजार
आहे. तिच्यात विशिष्ट विषय वस्तूचे संकलन करणे म्हणजे वैचारिक, सौंदर्यपर, आणि शैक्षणिक
मूल्यपर, निहित अर्थ उजागर करणे आहे. बालसाहित्य म्हणजे प्रतिभाशाली बौद्धिक खेळाडूंसाठी
एक सुंदर आणि रोमांचककारी खेळ असतो. पण त्यात प्रवेश करणे खूप त्रासदायक असते. त्यासाठी
असाधारण प्रतिभा आणि बालकांची आंतरदृष्टी असावी लागते. ती कवी भानुदास धोत्रे यांच्याकडे
मोठ्या प्रमाणावर आहे. कोणतीही साहित्यकृती आपल्याला प्रभावित का करते? तर तिच्यात
संज्ञानात्मक काव्यशास्त्र असावे लागते. अभिजातवादी स्थिती असावी लागते. म्हणूनच या
कवितांचे मूल्यांकन करणे हा माझा हेतू नाही. तर त्या ऐवजी मुलांनी आणि मोठ्यांनीही
व्यापक प्रमाणात ही कविता वाचावी आणि त्यांनी ती पसंत करावी म्हणून मी सर्वांना आमंत्रित
करीत आहे. बाल कवितेच्या प्रती एक बालवादी दृष्टीकोन निर्माण होण्यासाठी हे एक प्रकारे
आवाहन आहे.
-प्रा. साईनाथ पाचारणे, पुणे
9623862646
़
वाऱ्यासारखा मनाला स्पर्श
करून जाणारा बालकाव्यसंग्रह -- वाऱ्या रे वाऱ्या.
कवी शंकर वाडेवाले
सरांचा वाऱ्या रे वाऱ्या हा बाल काव्य
संग्रह मला माझ्या शाळेतील तळेगावे सरांनी
वाचण्यासाठी दिला.हा काव्यसंग्रह मी एकाच बैठकीत वाचुनही काढला. अतिशय सुंदर
असा हा बाल कवितासंग्रह आहे. वाचून खूप आनंद झाला त्यांच्यातील कविता खूप उत्कृष्ट
आहे. काव्यसंग्रहाचे नाव वाऱ्या रे वाऱ्या असे का ठेवले असावे बर ? आसा प्रश्न मला
पडला. याचे उत्तर मला त्यातील वाऱ्या रे वाऱ्या ही कवीता वाचुन मिळाले.आणी मला एक माझ्या लहानपणी
ची कवीता आठवली.
"झु झु झोपाळा
नेऊ चला आभाळा
झोका जाई वर वर
वारा ये भर भर
"
या
संग्राहातील कविता वाऱ्यासारखे मनाला स्पर्श करणारे आहेत. "शुभमंगल" ही कविता खूप छान आहे. सध्या
सगळी कडे लग्नाच सिजन सुरु आहे. ही कविता वाचून
मला खेळभंडयांचा खेळ आठवला .आम्ही ही बाहुला
बाहुलीच लग्न लावायचो.
झुक
झुक झुक झुक
आगीनगाडी
धुरांच्या रेषा हवेत सोडी
विमान उतरले गाडी ही आली
वाहनांची तर रेलचेल झाली
या
कवीतेत कवीने बाहुला बाहुलीच्या लग्नातील गमती जमती सांगितल्या आहेत. लग्नाला मुराळ
आगीनगाडीतुन,विमानातुन आणी वेगवेगळ्या वाहनातुन आले आहे तिथे वाहनाची तर गर्दीच गर्दी
जमली आहे.चिमणी करवली झालीआहे.कावळा महाराज झाला आहे.माकड आणी वानर बँन्ड वाजवत आहेत.लांडगा
आचारी झाला आहे.ऐवढेच नव्हे तर कोल्हा जेवायला वाढतो आहे.आणी पंगतीत जेवायला हत्ती,आस्वल,सिंह
पोटभर जेऊन ढेकर देत आहेत.किती मजेशीर आहे हे लग्न खरोखरच हे सगळ चित्र डोळ्यासमोर उभ राहील.
वाऱ्या रे वाऱ्या
शेतात जरासा
येशील का?
कैऱ्याही पाडून
देशील का?
वाऱ्या रे वाऱ्या या
कवितेत उंच झोका घेण्यासाठी कवी वाऱ्याला साद घातलो आहे. बागेतील मनमोहुन टाकणारी
फुले यांचा सुगंध देण्यासाठी ,आणि सगळ्याच्या तोंडाला पाणी सोडणारी कैरी पाडण्यासाठी सध्या आंबाआणि कैरीचा
मोसम सुरच आहे.आम्ही ही शेतातील आंब्याच्या झाडाकडे कैऱ्या पाडण्यासाठी धाव घेत आसतो.आणी रात्री वारा जर सुटला तर सकाळी आंब्याच्या
झाडाखाली कैऱ्यांचा सडाच पडलेला दिसतो. म्हणून कवी या कवीतेत वाऱ्याशी जणु काही बोलत
आहे.आणि वारा ही आपणासर्वांसाठी अंत्यंत महत्वाचा वायू आहे .म्हणुनच याला प्राणवायू
असे म्हणतात. आपणा सर्वांना शुद्ध हवा पहीजे आसल्यास आपण प्रदूषण कमी केले पाहिजे व झाडे लावले पाहीजे.
जर उंच उंच झोका घ्यायचा आसेल तर झाड आवश्यक आहे. झाडाचेही महत्व या कवीतेत कळते .
हत्तीदादा
या कवितेतून हत्तीच्या महाकाय शरीराचे वर्णन केले आहे.हत्तीचे मोठे मोठे पाय,तीचे सुपाच्या
आकाराचे कान,तिची सोंड,तिच चालण या सगळ्या गोष्टींच वर्णन या कवितेत केले आहे.आणि ऐवढा
भयंकर हत्ती एका लहानातल्या लहान मुंगीला घाबरतो.पाऊस या कवीतेत कवी म्हणतो.......
"अवखळ खट्याळ
वेडगळ पाऊस
इंटरनेट बंद
फेल झाले माऊस"
सध्या
आवकाळी पाऊस पडत आहे .विजेचा गडगडाट ,गारा, वादळी वारे यामुळे खुप नुकसान होते आहे. या आवकाळी पावसामुळे रात्रंरात आंधारात काढावी लागते ,मोबाईल ,इंटरनेट
ची ही रेंज जाते त्यामुळे सारे काही विस्कळीत
होते. सध्या इंटरनेट चा जमाना आहे .प्रत्येकाचीच
आज मोबाईल, इंटरनेट अत्यंत मुलभुत गरज बनली आहे.याचे दुष्परिणाम ही खुप आहेत.
या आवकाळी पावसामुळे सगळ्यांचीच मोठी पंचाईत
होते.
मोबाईल आणि इंटरनेट मुळे चिमण्याची संख्या कमी
होत आहे. काव्यसंग्रहात ही एक चिऊताई भेटते व तिच्याशी संवाद सादणारा एक चिमुकला ही
भेटतो .
"अंग अंग चिऊ
तुला देतो खाऊ
दूर दूर आकाशात
उडायला जाऊ"
आशा एकापेक्षा एक किती तरी सुंदर कवीता या काव्यसंग्रहात
वाचायला मिळतात जसे गोगलगाय,ढोल,मनीमाऊ,मोती,कपिला,प्राण्यांची शाळा ,मामी,या मुलांनो
या ,बाहुली ,ढगोबा आशा सुंदर सुंदर कविती या संग्रहातुन वाचायला मिळतात.या बालकविता
संग्रहात १९ कविता आहेत . मुखपृष्ठ खूप छान
आहे त्यावर दोन मुली झोका खेळताना दिसत आहेत. आणि झाडे ,एक छोटस सुंदर गाव ही आहे
.अतिशय सुंदर असे चित्र संतोष घोंगडे सरांनी
रेखाटले आहे.आतील चित्रे खूप छान आहेत व प्रत्येक कवीतेला आनुसरुन सुंदर व सुबक चित्र रेखाटले आहेत . मलपृष्ठावर शंकर
वाडेवाले सरांचे प्रकाशित साहित्य छापले आहे. एकंदरीतच हा काव्यसंग्रह वाचणीय आहे सर्वांनी वाचावा
संग्रही ठेवावा आसा आहे.
काव्यसंग्रह:- वाऱ्या
रे वाऱ्या
कवी:- शंकर वाडेवाले
प्रकाशन :-इसाप प्रकाशन
मुखपृष्ठ:- संतोष घोंगडे मुल्य:-३५ रु
परिचय:
कु.सुभेदार शिवानी भारत वर्ग:- ८ वा
श्री शिवाजी माध्यमिक
विद्यालय येवती
ता. मुखेड जि.नांदेड.
काव्यरंग…
युद्ध बाकी आहे
जीवनाच्या युद्ध भूमीवर खुप लढाया लढलो
काही जिंकलो काही हरलो युद्ध बाकी आहे
कोण आपलं कोण परकं अनुभवाने सांगतो आहे
एक एक पाऊल मात्र जपून टाकतो आहे
हरलो आता युद्ध सारे जग समजते आहे
अपयशाचे माकड काळे उगाच हसते आहे
जिंकण्याची आस उरी अजुन लढतो आहे
हरणारे जिंकू शकतात नवा पायंडा पाडतो आहे
योद्धा मी कर्मभूमीचा प्रयत्नवाद जपतो आहे
एकच ध्यास जिंकण्याचा मनी फुलतो आहे
ज्ञानेश्वर गायके, कन्नड
मो.९४०३३८४८८९
झाड आणि रक्त
झाडाची पानं
दिसतात कधीकधी
जीर्ण.. सच्छिद्र....
कदाचित गारपिटीने झोडपले असेल पानांना..
सच्छिद्र होतात.. पुन्हा भरतात.... आणि
पुन्हा पुन्हा तेजाने तळपतात झाडाची पानं....
ऐन मध्यान्ही
ग्रीष्माच्या रखरखत्या उन्हात
झाड दिसते कोमेजलेले.. भाजलेले....
पण कातर वेळी थंड वाऱ्याच्या
झुळकीने
पुन्हा होते झाड टवटवीत..
निसर्गाचे सगळेच नियम आत्मसात केलेत झाडांने
पण तरीही
अनाहूत एखादा घाव
बसतो झाडावर....
मग व्याकुळ होते झाड
तेव्हा झाडाचे रक्त तर
साकाळत नसेल?
देवीदास फुलारी, नांदेड.
गूज
तिच्या कानी मायबाई
काय सांगतसे गूज
असा लाडका दिवस
नाही उगवत आज
आडावर येता जाता
उकलित काळजाला
ठेवितसे हातावर
मनातला गलबला
तुझे खेळण्याचे वय
ठेव आता पाठमोरे
पारखून घे गं पोरी
नव्या उंब-यात वारे
होऊनिया सुई दोरा
जोड घरातली नाती
नको म्हणायला जागा
कोण्या रानातली माती
छान मांडीवर तुला
किती जोजवले पोरी
फिरविले कथेतुनी
नव्या सावित्रीच्या दारी
नको करू मांडामांड
आपल्याच परीघात
अंधाराला खोडताना
घे गं उजळून वात
खेटलेल्या दिवसाला
नको घालूस गं भीक
उभ्या सावित्रीच्या लेकी
दे गं मनातून हाक
जगदीश कदम
भ्र.९४२२८७१४३२
कविता
(एक)
शेत अन्
पाणी, कुणब्याचा जीव
कुणाची
ना कीव, दुष्काळाला I
मिरगाच्या
वक्ताला, कासाविस बाप
दुष्काळाचा
शप, बळीला I
कोसळलेला
पाऊस, डोळ्यादेखत वाहतो
एक दुजा
पाहतो, पाण्यात I
शेतशिवारात,
वाहणारे पाणी
आडवावे
कोणी, सरकाराने I
ठेवियले
आम्ही, पाण्यामध्ये देव
कुणाला
ना भेव, भविष्याचे I
आधाशासारखे,
उपसिले पाणी
त्याच्या
काय मनी,दडलेले I
नद्यांचे
पाट,पावसाळयात कोरडे
धरणाचे
नरडे , सुकलेले I
स्वार्थाच्या
घागरीत, पाणी पेटलेले
झरे आटलेले,
आपुलकीचे I
शेतामध्ये
पेरा, पावसाचे पाणी
उगवतील
गाणी , समृद्धीची I
रमेश चिल्ले, लातूर
अवकाळी पाऊस
अवेळीचा पाऊस, अवकाळी बरसतो
कुणब्याला तरसितो, सालभर I
आला आला म्हणतांना, घालितो धिंगाणा
मोडलेल्या माना, कुणब्याच्या I
सालभर मातीत, सारी सपानं पेरले
हाती काय उरले, धुपाटणे I
किती बांधावे इमले, सपनाच्या गावी
हाती नाही चावी, बिचा-याच्या I
पोटाला चिमटे, तोंडचाच घास
गेला लांब कोस, मातीमंदी I
इथं तिथं सा-या ,पडलेल्या गारा
सुअलेला वारा, फुफाट्याचा I
लहरी निसर्गानं, मांडलेला खेळ
कधी बसायचा, मेळ जगण्याशी I
कुणब्याच्या, नशिबी दरसाली आपत्ती
किती पेटवाव्या, वाती वादळात I
रमेश चिल्ले, लातूर
(पाणीबाणी
नंतरच्या कविता,या संग्रहातुन..)
गोंधळलाय माणूस
बाप शिकला झाडापासून
फळासाठी अन् सावलीसाठी जगायचं
आम्ही झाडं तोडली
सारंच उजाड झालं
मायला माहित आमच्या
चुलीतल्या लाकडावानी जळावं लागतं
तवाच कुठं भाकर गोड लागते
आम्ही गॅस आणला
जगणं सपक झालं
गणागोतानं सांभाळली नाती
ढाळज भरुन राहायची
आम्ही मोबाईल आणला
समोरचा माणूस दूर गेला
विकास की प्रगती ?
यात अडकलाय माणूस
हे का ते ? यात गोंधळलाय माणूस
या वादळात त्याचा तिनका झाला
पत्ता नाही तो कुठं उडाला
नारायण शिंदे
नांदेड 7387788821
फुलराणी
आला पाऊस असा उधाणून, सारीकडे ही जादू घडे
फुलराणी मी भासे मजला, फुलाफुलांचे भोवती कडे
वळून पाही जाता जाता, खट्याळ मोगरा माघारी
हिरव्या पानी सोनचाफा, हसून खाणाखुणा करी
अधीरलेल्या त्या भ्रमराचा, अखंड गुंजारव गडे
फुलराणी मी भासे मजला फुलाफुलांचे भोवती कडे
निशिगंधाचे फुलले झेले, गंध गेला आभाळी
तुषारांतून आला कणकण, टिपून घेई भुई भाळी
हळू उघडता गुलाब पाकळी, अलगद तिजवर टिंब पडे

पखरण झाली प्रातःकाळी, गर्द केशरी देठांची
भरली ओंजळ प्राजक्ताची, शुभ्र मुलायम मलमलची
सुगंधाने भूल पाडली, श्वास थांबला त्या तिकडे

उंच उभ्या पर्णांमध्ये, हळूच डोकावती सुमने
वेड लावले तलम फुलांनी, गंधाळून गेली मने
कौतुक झेलित हिरवाईचे, धवल लिलीचे फूल खडे

वेलीवरती खुदकन हसली, जुई आपुल्या कळ्यांसवे
आली सायली चुकवून इकडे, फुलपाखरांचे थवे
आभाळातल्या चांदण्यांचे, वेलीवरती पडती सडे

सुरेख रंगी अगणित गंधी, भान हरपून गेले मी
येऊ लागला नाद नाजूक, म्हणून जराशी झुकले मी
इवले नाजूक पैंजण होते, रानफुलांचे पायी गडे
फुलराणी मी भासे मजला,
फुलाफुलांचे भोवती कडे

सौ. प्रतिभा पद्माकर जगदाळे
सांगली 9423872499
दिवसेंदिवस
सायंकाळी
जेव्हा काळोखाचे
विस्तीर्ण
पसरणारे लांबच लांब
हात
उजेडाच्या अंगाखांद्याला
घट्ट
विळखे घालत येतात....पश्चिमेकडून
तेंव्हा उफाळून वर येऊ पाहणाऱ्या
किलकिल्या उजेडाचे गतप्राण होतांनाचे
असह्य कासावीस स्वर उमटत राहतात
वा-याच्या उदासीन लहरीवर...
रोज तिन्ही सांजेच्या वेळी
हंड्या खालच्या चुलीतल्या
आगीत अंतर्बाह्य भाजून तावून सुलाखून
शुद्ध आणि सैल होऊन थंड पडलेली
गौ-याची लोण्यासारखी मऊसूत राख
चिमटीत धरून पुसून काढत असते ती
कंदिलाच्या काचेवर
साचलेली काजळी
दिवसरात्र समाजातील
वखवखलेल्या विकृत नजरा सोसतांना
देहाच्या काचेवर
साचत जाणारी काजळी पुसून लख्खं करण्यासाठी
मात्र स्वत:च जळून राख व्हावे लागते हे तिला
उमगत राहते राहून राहून आजकाल
त्यातही काचेवर अधिक जोर लावला तर
तडे जाण्याची भीती
अन् हळूवार पुसत राहिले तर काजळी
कायम साचून राहिल्याची रुखरुख
खात रहाते तिच्या मनाला दिवसेंदिवस
डॉ.संतोष सेलूकर ,परभणी
भ्र.7709515110
कविता
मरनांगी मांजर उकरते मुडदा
इतिहासावर पडदा टाकलेला.
माणसाचे हाल बेगडी चेहरे
पडद्याआड डाव खेळतात.
बेताल बोलण्या नाही राहिला
लगाम
इज्जतीला बदनाम करतात
फुसक्या योजना हलकेच दावे
तोडतात गावे माणसाची
जातीलाही आता खुंट दावे भारी
उपजातीची कडी दणकट
माणसाची आता बेगमीच चाल
धर्माचे नाळ तुटलेली
धर्माचा यांनी केलाय धंदा
देवाचाही वांधा झालेला
ज्याची त्याची जात लईचं वरची
दुसऱ्याला मिरची झोंबतीया
भावकी समदी
येड्याचीच शाळा जमला गोतावळा अज्ञानाचा
नेते त्यांचे थोर तोंडातचं जोर
घरात शिरजोर आपापल्या.
संजय जगताप नांदेड
९६२३०३३२१५
माझ्या मायचं पुराण
(एक)
चुल्हयामध्ये
एक
एक जळतन भरतांना
तोंडाचा
फुगा करुन
दमछाक
होईपस्तोर
माय
बीना फुकनीनं फुकायची,
तापलेली
गरम राख
डोळ्यात
भरायची
तरही
ढण् ढण् जाळ लागेना.
आराटी
-बोराटीच्या काटक्या मोडतांना
अन्
चुल्हयात खुपसताना
विंचू
ढसल्यागत
काटा
बोचायचा
तरीही
ढण् ढण् जाळ लागेना.
कडूझ्यार
विषाचा
धूर
डोळ्यात दाटायचा
पापणीही
व्हायची ओली
कचकचा
डोळे चोळायची
म्हणायची,
पोरा,
ठणक
उठली डोळ्यात
तरीही
ढण् ढण् जाळ लागेना,
माय
ढसाढसा रडायची
म्हणायची,
कोण्या
जलमाचा भोग....?
(दोन)
आकाड
महिना लागला की
चिमणीच्या
पिल्ल्यानं
तोंड
आ करुन
वाट
पहावी
तशीच
दिस
मावळतीला गेला की
शेतावरुन
येणाऱ्या मायची
लेकरं
वाट बघायची.
रस्त्यातच
लटकणा-या लेकरांसाठी
लुगड्याच्या
घोळात
शण्णी,
वाळकं आणायची
आकाड
महिना लागला की
पोटाच्या
खळगीसाठी
कधी
करटुले
कधी
वागाटे
कधी
तरवट्याच्या पाल्यावर दिवस काढायची.
घरात
तेल, मिठ नसताना
सासरी
कंटाळलेल्या लेकीला
आकाड
पाळायला आणायची
हातावरचं
उसनं काढून
काकणचोळी
करायची
वै-यासारखा
एक एक दिवस
बोटावरती
मोजायची
आकाड
महिना लागला की....
(तीन)
मोडकं
टोपलं डोक्यावर घेऊन
माय
माझी
अनवाणी
पायानं गौ-या वेचायची
तव्हा
बारीक
बारीक चोर चिपकाटा
मायच्या
पायात घुसायचा
इजा
सोसत सोसत
घर
गाठायची
अन्
चिमणीच्या
मिणमिणत्या दिव्यापुढं
सुई
घेऊन टोकरत बसायची..
जीभाळ
लागताच
काळजाला
इजा पोहचायची
तव्हा
काळा
बिबा फोडून
ठसठसत्या
जाग्यावर लावयची,
कळत
नाही
माझ्या
मायचा
चिपकाट्यांनेही
सूड घ्यावा.
(चार)
माय
काळच
बदलतोय आता
तुझ्या
पुराणातल्या कथा
जात्यावरच्या
ओव्या
इथं
कुणीबी ऐकत नाय....
इथं
ऐकण्यापेक्षा
रस्त्यावरच
पहावयास मिळते
तुझ्याच
घरच्या
द्रोपदीचे
वस्त्रहरण
अन्
रावणांचे
नृत्य
माय
लोकशाहीच्या
गर्भात आता
झपाट्याने
वाढते आहे
भ्रष्टाचार
बलात्कार
लुटालूट
आणि
उपासमारीची
लेकरं..
जगण्याच
स्वप्न
डोळ्यात
घेऊन ...फाटक्या बनेलात
राबणारा
बाप
झाडाला
घेतोय फाशी ...
लांबसडक
जीभ बाहेर काढून..
माय
म्हणते ,
तोच
काळ बरा व्हता
आता
स्वातंत्र्याने पदरात
आमचाच
गुदमरलेला
श्वास टाकलाय..
माय,
असच
आता कण्हत कण्हत
जगाव
लागतयं
स्वतः
ला स्वतः शीच सावरत..
माणसांच्या
गर्दीत माणुसकी शोधत ...!
प्रा. रामदास केदार
श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय
वाढवणा ता. उदगीर जि लातूर ४१३५१८
मो. ९८५०३६७१८५
शीर्षक नियती
नियतीने खेळी अशी सुरेख खेळली
जीवनाची फुलबाग बहरली,फुलली
सुखाचे फुलपाखरू ओंजळीत माझ्या
येऊन बसले अवचित,अगदी क्षणभर
रंग तयाचे सांडले बोटांवरती,मनोहर
आणि उडून गेले कुठेतरी,खुप दूरवर
मनाचा पाठलाग सुरू आता सुखाचा
भिववीते त्याला सावल्या दुःखाच्या दमवतो,
श्रमवतो हा अगम्य पाठलाग
मग होते मन रुसुनी किती ते नाराज
अन नेमके त्याचवेळी भिरभिरते,येते
सुखाचे सुंदर फुलपाखरू अगदी समोर
समजेना नियतीचा हा अवघड खेळ
कशी? कुणावर? येईल कसली वेळ
कसले? कोणते नियम ह्या जीवनाचे?
त्याल तर असे वरदान, क्षणभंगुरतेचे
सुखाचे फुलपाखरू फिरते हे भिरभिर
मना पहा त्याला आता,ठेवून बुद्धी स्थिर.
अश्विनी गहणकारी (पेंढारी)
अमरावती
कोपले आभाळ
कोपले
आभाळ
आला
महापूर
झाले
सर्व दूर
पाणी
पाणी
ढग
गडगडे
विज
कडकडे
धारा
भुईकडे
लोंबलेल्या
आकांड
तांडव
पिसाळले
पाणी
लाट
जीवघेणी
काळ
झाली
खेळ
नियतीचा
धरण
फुटले
आभाळ
फाटले
एकाएकी
झोपेतली
रात्र
झालीच
वैरीण
गेलीच
घेऊन
सारे
सारे
पंडित पाटील
बाप कल्पतरूचे झाड
चिमणी
पाखरं घेऊन
सारा
संसार थाटतो
त्याच्या
उतार वयात
बाप
परका वाटतो
घालून
पाडून बोलता
हुंदका
उरात दाटतो
जसा
मुचकुणी काटा
खोल
जिव्हारी डाचतो
मुलांना
जरी आली थंडी
थोडा
जरी भरला ताप
डोळे
मिटून असले तरी
रात्रभर
नाही झोपलेला बाप
पिल्लांच्या
काळजीने
काढतो
पिंजून गावं
नाही
दिसत कुणाला
त्याच्या
हृदयाचे घाव
बाप
असतो देवता
सारे
पुरवितो लाड
हयातभर
देतो सावली
बाप
कल्पतरूचे झाडं
घराच्या
भेगाळल्या भिंती
पांढऱ्या
मातीन लीपावं
त्याच्या
थकल्या जीवाला
नाजूक
हाताने जपावं
व्यंकट अनेराये
शेळगाव छत्री
ता. नायगाव जि. नांदेड
मो. 7588425319
पारखी
बाशिंग कपाळी नटले
दु:ख आवरेना मनी
टपो-या डोळ्यातून वाहे
जसं मिरगाचं पाणी
आज जाशील सासरी
लागे माहेरची धाव
जणू श्रावण सरला
पुन: ओसाडलं गाव
तुझं रानातलं रुप
जावो फुलात झुराया
तरसे पाटाचं पाणी
काळ्या मातीत मुराया
घर धरेल रुसवा
अंगण उदास उदास
भरल्या रांगोळीचा दारी
कोण करील सायास
बाप अंगणात उभा
माय दारात पोरकी
भरल्या मांडवात हरणी
झाली माहेर पारखी
विठ्ठल सातपुते गंगाखेड
निसर्ग
निसर्ग पीडीत पडला एकटा दुकटा
विरुद्ध उभा सात अब्ज इथला भामटा
निसर्गाचा गर्भित इशारा केराच्या टोपलीत फेकला
बलशाली निसर्गाने कफलक अन्याय सोसला
निसर्गाचे कुणी काही बिधडवू शकणार नाही इथला
मानवा इतिहास जमा व्हायचे डोहाळे लागले का तुला
एवढा विस्मयकारक रित्या तू कसा रे हपापला
बुद्धी भ्रष्ट झाली विसरला इतिहासाचा दाखला
आठव लयास गेल्या त्या सिंधू संस्कृतीच्या पाऊलखुणा
महाकाय डायनासोर देखील त्या निसर्गापुढे नाही टिकला
मानवा तू काय कुणी तिस्मारखान आहे का इथला
पावसाने तुला कसा धू धू धोपटून धुतला
उत्तराखंड महाराष्ट्र पंजाब अन् कोण कुठला
सांगशील कुणाला आता की मी नाही त्यातला
नद्यांवर लाखोनी बंधारा तू दिमाखात घातला
विजेत्याच्या थाटात धरणाचा एवरेस्ट गाठला
तासाभराच्या पावसाने तुला झाडून पुसून घेतला
अहंकार तुझा वादळी वादळाने वेढून विरला
भूकंप म्हणाला मी ही येतो पावसा दिमतीला
कपटी मानवाने स्वत:हूनच आहे काळ ओढावला
गाभारा धरणीमातेचा मानवा तू काळवंडून टाकला
धरणी म्हणाली उष्णतेचा भार आता सोसवेना झाला
मानवा आज जर तू नाहीच स्वत:हून सावरला
समजून घे विश्वाच्या पसा-यात तुझा खेळ आवरला
शिल्लक उरणार नाहीत तुझ्या प्रगतीच्या खुणा
पराकोटीचा स्वार्थ ठेव नियंत्रणात सांगतो पुन्हा पुन्हा
!
डॉ.संगीता आवचार,
परभणी
बदली
नोकरीतल्या बदलीमधले गुरुजी आणिक बाई....
अर्ध्यावरती वर्ग सोडला पाऊल उचलत नाही...||धृ||
गुरुजी वदले,मला भेटली मनासारखी शाळा
सोडूनी जाता परि
वाटते दुःख मला रे बाळा
का बाईंच्या डोळा तेव्हा दाटून आले पाणी....
अर्ध्यावरती वर्ग सोडला पाऊल उचलत नाही....||१||
बाई वदल्या बघत एकटक दूरदूरचा फळा
उद्या सकाळी दुसरी गाडी,दुज्या गावची शाळा
पण दोघांना उशिरा कळली गूढ अटळ हे काही
अर्ध्यावरती वर्ग सोडला पाऊल उचलत नाही....||२||
पालक म्हणती सारे
बदली अशी का व्हावी?
का बदलीने जाता जाता,मुले अशी रडवावी?
या प्रश्नाला उत्तर नव्हते, मुले ही केविलवाणी
अर्ध्यावरती वर्ग सोडला पाऊल उचलत नाही....||३||
का गुरुजींनी पुसले डोळे शाळेतून जाताना?
का बाईंचा दाटे हुंदका निरोप हा घेताना?
शाळेच्याही झरू लागले भिंतीमधुनी पाणी
अर्ध्यावरती वर्ग सोडला पाऊल उचलत नाही....||४||
सारिका काळवीट
(एक
)
मन
मन, आकाशाचं बन
सागराचा तळ अन्
अंधाराचं बळ.
डोळे फाडून फाडून पाहिलं तरी,
दिसत नाहीत तळघराच्या वस्तू
आणि
कळत नाहीत सागरतळाच्या गूढ हालचाली
म्हणूच होतात व्यवहार
तर्कावर न उतरणारे
अन् उमजत नाहीत
बिंबाचे प्रतिबिंबाशी झालेले खेळ.
भावनांच्या कल्लोळात
विचारांची तगमग
बुध्दी गहाण पडते तेव्हा
मन, मनासारखंच करुन घेतं
मग कधी तारु खडकावर आपटून खेळ संपतो
तर कधी न संपणारा प्रवास सुरू होतो
दुधडी भरुन वाहणा-या नदीत
नाव तरंगत राहते.
माहित नसतं
हा खेळ संपणार कधी
मन, मनाला कळणार कधी ?
(दोन
)
माझा अद्वैत
तू तू नाहीस मी आहे
असे वाटते तेव्हा
मला अद्वैताचा अनुभव येतो.
तुझ्यातला मी आणि माझ्यातली तू
अनुभवास येते तेव्हा,
तुझं
हसणं माझं होतं
तुझं लाजणं माझं होतं
आणि न पेलणारं तुझं दुःखही
मी आनंदाने वाटून घेतो.
आपलं म्हणावं असं कोणीतरी आहे
या विचारानं सुखावतो मी,
खिशात पै नसतानाही
जत्रा करायला निघतो मी.
कोणी कितीही म्हणो,
'मायेने जग व्यापिले, सत्य झाकले'
पण मी म्हणतो,
तूच माया, तूच सत्य, बाकी सारे मृत्य.
(तीन )
आंतरजाल
जन्मलेल्या बालकाला
वठलेल्या म्हाताऱ्याला
तरुण आणि तरुणींना
प्रिय झालाय मोबाईल.
झोपेतून उठल्यावर
निवांत बसल्यावर
कोठेही गेल्यावर
मोबाईल हवाच हाताशी.
गर्दीत तो एकटा ,खोलीत तो एकटा
बोलणे बंद, डोके बंद
गेमिंगच्या जाळ्यात अडकला बेबंद
का कोणास ठाऊक
त्याला एकाकीपण असह्य झाले
चाट जीपीटीला तेव्हा प्रश्न विचारले जाऊ लागले,
'हॅंगिंग' केले तर मृत्यू येतो का?
उत्तर तेव्हा ' निश्चित ' आले.
प्रयोग त्याने साकारला
एक जीव हकनाक गेला.
कशाला हवा असला खेळ
आंतरजालात हरवतेय वेळ
मोबाईलच्या दुनियेमध्ये
जगण्याचा बिघडतोय मेळ.
दिनकर के. देशपांडे , परभणी.
मो. 9766488892
कहाणी
निगुतीने पूजा मांडायची ती
आया बाया जमवून.
कहाणी
सांगायची हौसेने,
भक्ती
भावाने रंगवून.
सोमवारची, शुक्रवारची, पुसातल्या रविवारची.
अशाच
एका सोमवारच्या सकाळी
विस्कटून गेली पण,
तिच्याच
आयुष्याची अवघी कहाणी.
पाण्यात
बुडालेल्या कपाशीच्या बांधावर
तिनेच
वाढवलेल्या फांदीवर लटकलेलं सौभाग्य बघून
तिने
केलेल्या आकांताने
फाटून
चिंध्या झाला तिचा भवताल.
कुंकू
पुसताना, काकणं फोडताना
ओरबाडून
निघाली ती.
सोलून
निघाली.
उंबऱ्याच्या आणि बंधाऱ्याच्या आतील
काबाडातच अखंड बुडालेली ती
कोलमडली,
हेलपाटत राहिली
वादळात
सापडलेल्या केळीसारखी .
गळतच
होते डोळे तिचे
मदतीचा
चेक घेतानाही.
दिवस
जात राहिले.
निवत
गेला पांढऱ्या कपाळाचा जाळ.
दिसू
लागला हळूहळू
चिमुरड्याच्या डोळ्यातील विझत चाललेला
चंद्र,
घरादारावर वाढत चाललेला काळोख.
दडवले
मग अश्रू तिनं पापण्यांच्या आड.
उठली
ती झटकून.
खोचला
पदर, मागे सारली काकणं.
उंबरठ्याच्या आतील सुरक्षित अंधारात
घोटाळणारी बुजरी पावलं
रोवली
तिनं ठामपणे उंबरठ्याबाहेर.
बघून
घेतला भवताल. जोखलं स्वतःला
स्वतःच्या आत खोलवर दडलेल्या उजेडात.
निघाली
ती.
वाटेवरील निखारे, शब्दांच्या ठिणग्या,
नजरांचे
विखारी बाण
सारंच
झेललं तिने
निग्रहाने ओटीत.
शेतातील
माती, गोठ्यातील गुरं
परकी
नव्हतीच तिला.
आता ती दिसू लागली
मुलांच्या शाळेत,
बचत गटात, सोसायटीच्या सभेत,
कधी जाब विचारताना, कधी उत्तरं देताना,
एखाद्या
मंचावरून ठासून काही सांगताना.
आता ती सांगत नाही कुणालाच
चमत्काराच्या कहाण्या
सोमवारच्या, शुक्रवारच्या.
ती कोसळताना,
कहाण्यातील कुणीच तर
आलं नव्हतं तिला सावरायला.
एकटेपणाच्या राखाडी रेषांमधूनही
फुलत
चाललेली तिचीच कहाणी
साठा
उत्तराची, सफळ संपूर्ण निर्धाराची
सांगितली जाते आता
एखाद्या
मंचावरून.
तिच्याचसारख्या कुणाला
मिळावं
बळ कोसळताना म्हणून.
ललिता गादगे
गावाकडचा पाऊस
गावाकड
झिम्माड
पाऊस
पडला
दलदलीनं
भाऊचा
संसारच
मोडला
पिकाऐवजी वावरात
गवतच
वाढले
तुरीच्या डोक्यावर
बाबर
चढले
कापसाच्या झाल्या
जाग्यावर वाती
साळिंदरने आणली
धुऱ्यावर माती
ज्वारी
गेली हिसाळ्या
मुगान
दगा दिला
उडिदानं
तर चक्क
हाय खाल्ली बगा
डोंगर
हिरवागार
फुलांनी
सजला
शिवार
मात्र सगळा
उताणा
निजला
अशी दाणादाण
गावाकडे
झाली
कोणत्या
रागात देवानं
सुगी
धुऊन नेली
वीरभद्र मिरेवाड
व्यंकटेश नगर नायगाव जिल्हा
नांदेड
अश्वत्थमी व्यथा...
मनामनाची व्यथा निरंतर,
भटकंती
ही वृथा निरंतर -
गळल्यानंतर पान म्हणाले,
सृष्टीची ही कथा निरंतर -
देह पिंजरा आत्मा सोडी,
शाश्वत
आहे प्रथा निरंतर -
बदलत
नाही माणुस जोवर,
यथा असो वा तथा निरंतर -
तू गेल्यावर भाळी आली,
अश्वत्थामी व्यथा निरंतर -
- डॉ. अविनाश कासांडे, सुपेकर. गंगाखेड
दान भुईचे
गावकऱ्यांच्या डोळ्यांमधली ओल जराशी पुसून जातो
गोड कोवळ्या ओठांवरती हळवी गाणी पेरून जातो
सुटेल दरवळ अंगणातल्या फुलझाडांच्या रांगेमध्ये
वर्गामधल्या बाकांवरती अत्तरदानी ठेऊन जातो
भिरभिरली मोकळेपणाने अंगाखांद्यावरती माझ्या
सोनपाखरांच्या पायांना रेशम दोरा बांधून जातो
नुसते जातो म्हटले म्हणजे सारे काही संपत नाही
दारावरच्या टाळ्यालाही एक आठवण देऊन जातो
उन्हाळ्यात सावली द्यायचे येता जाता रस्त्यावरती
वळणावरच्या त्या झाडाला 'भेटूनंतर' सांगून जातो
निरोप देतांना म्हातारी करेल थोडा पदर ओलसर
जाता जाता ओंजळीतले दान भुईचे घेऊन जातो
-प्रशांत भंडारे. आमडी,बल्लारपूर
जिल्हा-चंद्रपूर
दोर
प्रत्येकाच्या आयुष्यात
कधीतरी 'तुका' येतो.
तुका वसत असतो
नेहमीच..
पण मनाच्या तळाशी..
आपण लपवत असतो त्याला....
हरणे व हरवून जाणे
हे सर्वांच्याच नशिबी..
आपण हरवलो तर
असावं कुणीतरी
शोध घेणारेही...
तुमच्याविना अडकावा
कुणाच्या तरी गळ्यातील
घास....
अन्,
सैर-भैर नजरेने
दिसतील त्या वाटा
अनवाणी पावलांनी तुडविणारे ....
लाभतात भाग्यवंतानाच
म्हणून 'तुका' भाग्यवंत.
तुम्ही स्वतःवर प्रेम करता
तेंव्हा.....
इतरांना हरवून बसता..
परंतु..
इतरांवर प्रेम उधळताना
तुम्ही स्वतःला गवसत जाता..
कुठल्याही शोधाशिवाय
स्वतःच स्वतःला सापडणे
हाच तो दोर
द्वैत -अव्दैताचा
पिढ्यांना -पिढ्या जोडण्याचा
जन्म -मरणाला
सांधण्याचा.
संजय प्र. चिटणीस
परभणी ९२८४८८२५५८
कविता (1)
धीरोदात्त असा एक
तगमग तळमळ
घुसमट किती
येते आग उफाळून
भूकंपाची भीती
दऱ्याखोऱ्या काटेकुटे
रक्ताळला काळ
हळू घालून फुंकर
चढायचा माळ
होती घाव पुन्हा पुन्हा
तरी हसायचे
विष पचवून पाही
स्वप्न उडायचे
आले वादळ जाईल
संपेलही जोर
सावरावे आसपास
समजून थोर
धीरोदात्त असा एक
सहन कराया
विस्कटली अंधारात
घडी बसवाया
कविता (2)
सावरून घ्यावे
मिळेल मातीत फुलले रोपटे
उरतील काटे दंशण्याला
जिण्या भवताल आवळून फास
कवळणे भास क्षणोक्षणी
वरवर देती लोक मोठेपण
प्रवासाचा क्षण निपटाया
किड्यामुंगीसम चिरडेल मन
सावराया तन नसे कुणी
मुक्त जगण्यात कोमेजते कळी
रखरख ओली करायची
सावरून घ्यावे लोभस सजण
चुका वगळून बिनघोर
कविता (3)
नदीरूप एकरूप
नदीमाय सावडते
पदरात गारा
सृष्टीकोपाचा असीम
चढलेला पारा
नदीपोर हुंदडते
पावसाची घाई
ढग पिकले आडूळ
हाकलतो वारा
नदीबाई पहुडली
सोडून किनारा
शेतमळे पिकपाणी
वाजलेले बारा
नदीआजी थके आता
सुरकुत्या देही
अंधुकशा नजरेत
वाळवंट सारा
नदीप्रिया विरहात
खाचखळग्यात
थांबेनात आठवाच्या
अखंडीत धारा
नदीदेेवी कधीमधी
डोळ्यांत सर्वांच्या
बरस रे ढगबाप्पा
जीवाचा पुकारा
नदीरूप एकरूप
साऱ्या जिवामधी
नभराया ओथंबू दे
जगाचा आसरा
तुकाराम पुंडलिक खिल्लारे,
लोकमान्यनगर, परभणी – मो. ८८३०५९९६७५
माहेराची
आली -आली गं दिवाळी, सण मोठा वरसाचा
वाट पाहते मालन, बंधू येई जिव्हाळ्याचा
बंधू येई जिव्हाळ्याचा, माय उभी शिवारात
कितीं - कितीं ओढ बाई, काय असे माहेरात ?
काय असे माहेरात,कसे सांगू सईबाई?
बाप झाड आनंदाचे, माय अमृताच्या ठाई
माय अमृताच्या ठाई, अन्नपूर्णा तिच्या हाती
ओठीं मधाळ गोडवा, जपे जिव्हाळ्याने नाती
जपे जिव्हाळ्याने नाती, तिच्या माहेरचा वसा
लेकी
सुनांना ही सांगे, जपा जिव्हाळा हा असा
जपा जिव्हाळा हा असा, माझी वयनीं जपते
सान- थोरं सगळ्यांचा, मानं सासरी राखते
मानं सासरी राखते, शिकवण माऊलीची
सई दिवाळीच्या सणां, ओढ लागे माहेराची
सौ. शारदा श्रीकृष्ण वानखेडे-चोपडे
परभणी ९८२३०६६६०६
कविता 1
बाई जन्माचं व्याज म्हणून
दाबलेल्या हुंदक्याचे
आवाज
छळत असतात रात्रभर
असंख्य उसासे उमाळे
ती सजवुन ठेवते गात्रभर
संयमाने बांधुन ठेवलंय
मनाच्या पापण्यांना
आजी म्हणायची
बाईला रडता येत नाही मनमोकळं
तश्या डोळ्यांच्या पापण्या वाहतच
राहतात अधुन मधुन
पण बाईने फक्त वाहुन घेत
राहवं सारं काही
हे सांगण्यासाठी
चुलीच्या धुरा सारखं
धुपत राहणारं
आयुष्य
पेटवण्यासाठी
ती वाहत असते
ती जळत असते
जन्माची घागर रिचवत असते
निर्जीव खडकावर
तिला माहिती असतं दगडच
आहे तो
तरीही ती घालत असते
पाणी ....आजन्म
बाई जन्माचं व्याज म्हणून
कविता 2
प्रकाश वाट
कुणीतरी उरात खोल आत आर्त वाहणे
कितीकदा स्वतःस हे नको नकोच वाटणे
रितेपणात शोधली अखंड कैक अंतरे
पुन्हा पुन्हा नवीन वाट अन् जुनेच चालणे
मनातला विषण्ण काळ आत आत लोटतो
सलज्ज भास वेढता विचीत्र खेळ खेळतो
उरात पेटल्या जगास अंत ना विराम ही
कणाकणामधून कोण अंश अंश व्यापतो
पुसून कोण चालला लिहून ठेवल्या खुणा
कुणास शीळ घालतो अमूर्त एक पाहुणा
उगाच तर्क लावतेय आत आर्तता किती?
जळून दूर चालली समग्र खिन्न कामना
धुकेरल्या तमातुनी अपार दान मागतो
प्रकाश वाट शोधण्या सबाह्य जन्म जाळतो
घडी घडीत दाटल्या अगाध गूढ सावल्या
रुतून काळ बैसला समूळ शल्य रापतो
मधुरा उमरीकर परभणी
स्वप्नातील परी
काल
माझ्या स्वप्नांमध्ये
आली
होती परी
टिव्ही
मध्ये दिसलेली
हुबेहूब
खरी
स्वप्नांमध्ये
नेले मला
चॉकलेटच्या
बंगल्यात
खुप
सारे चॉकलेट तिने
टाकले
माझ्या पुढ्यात
स्वप्नांमध्ये
तिने मला
पंख
बसविले
इकडून
तिकडून तिने मला
उंच
उंच नेले
रोजच्याच
गृहपाठाचा मी
प्रश्न
तिथे मांडला
एका
चुटकी तिने माझा
गृहपाठ
केला
स्वप्नामध्ये
रोज रोज
परी
ताई यावी
आवडीचा
खाऊ तिने
सोबत
घेऊन यावी
तळेगावे संतोष गणपतराव
मुखेड जि. नांदेड
मराठी माणूस धन्य पावले....!
भाग्य माझे थोर या मातीत मी जन्मलो
काळजात मराठी भाषा घेऊन खरे जगलो
भाषा माझी गोमटी पूर्व जन्मीचे संचित
घास भरवी आपुलकीचा नसे कुणीही वंचित
संत ज्ञाना, नामा, तुका, जना आणि बहिणाबाई
मोती अभंग ओवीची माळ घाली विठूमाई
स्वरचिन्हानी व्यंजन नटले प्रांतनिहाय बोली भाषा
बीज पेरी मानवतेचे जागवूनी नवी आशा
अनेक वर्षाच्या प्रयत्नांना यश आले हो धावून
माय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा पाहून
कृतज्ञता व्यक्त करताना नयनी आनंदाश्रू दाटले
आज मराठी माणूस मनोमन धन्य पावले
सौ. सविता उमेश वडगांवकर..
गोदा विकास
दिवाळी 2025
मुखपृष्ट
नदी झाडे मंदिर शाळा शेतकरी
माणसांचा जमाव, लहान मुले
सुंदर दृश्ये यातून सलेक्ट
करता येईल.

करता करवता..

श्रीमती सविता
देशपांडे परभणी

देणाऱ्याने
देत जावे…