कशाला शोधताय विश्वास….?
कशाला शोधताय विश्वास….?
सद्यस्थिती पाहत असताना लोक यंत्रासारखे बोलत -चालत आहे. जो तो आपलीच पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे .आपल्याच स्वार्थी आणि आत्मकेंद्री विचाराशिवाय माणसांजवळ दुसरे काहीही नाही.गोरगरीबांचा विचार करण्यास कोणीच तयार नाही सर्व पैशाच्या मागे लागलेले दिसतात. आगळं वेगळं काही नसून सर्व विनाशाच्या मागे पळत आहेत.मानवाच्या जीवनाचा सध्याच्या काळात काहीच विश्वास राहिला नाही.जातीपातीच्या नावाखाली नेते आपली पोळी भाजतात यात मात्र गोरगरीबांचे मरण होत आहे.यांच्या पोळीचा कोणीच विचार करत नाही.यांनी जगावं तर कसं आणि मरावं तर कसं.? कोण कोणाच्या तव्यावर आपली पोळी भाजून घेत आहे,कळतही नाही. गरीबीमुळे लोक साध्या साध्या आमिषाला बळी पडतात आणि मग त्यांचा केसाने गळा कापला जातो. या जगात सध्याच्या काळात विश्वास ठेवण्यासारखे काही उरले नाही. अहो साधी बाजारातील भाजी किंवा फळे सुद्धा विश्वासाने खरेदी करू शकत नाही कारण ते कृत्रिम पिकवली आहेत की नैसर्गिक हे देखील व्यापारी विश्वासाने सांगत नाही . हे तर दूरच राहू द्या घरातल्या घरात भावाचा भावावर बापाचा लेकावर अजिबात विश्वास उरलेला नाही.पैशासाठी किंवा दौलतीसाठी जमीन ,जायदाद यासाठी भाऊ भावालाच मुलगा बापालाच विष देऊन मारू लागला आहे.यामुळे कुठेतरी असं वाटतं की विश्वास जिवंत राहिला आहे का?
अहो बायकोचा नवऱ्यावर देखील विश्वास नाही जर नवऱ्याच्या शर्टला कशाचा डाग लागला की बायकोला लगेचच वाटते की आपला नवरा कुठे तरी तोंड काळे करून आला .अशी अनेक उदाहरणे सांगण्यासारखी आहेत यावरून असे वाटते की विश्वास जिवंत आहे का..?
विश्वास….! विश्वास….!! विश्वास….!!!काय आहे हो या साडेतीन अक्षरी शब्दात जर हा शब्द पचला नाही तर नक्कीच पोटदुखी होणार. आणि एखाद्याचा दुसऱ्यावर असलेला विश्वास उडाला तर त्याच्या मागे या साडेतीन शब्दांची साडेसाती लागलीच म्हणून समजा.
हंsss....विश्वास दाखवताना सध्याच्या काळात विश्वास कामापुरता वापरला जातो पुन्हा काम संपलं की विश्वास गेला उडत.या स्वार्थी दुनियेत कोणीच कोणाचं नाही.आणि तेव्हा असं वाटतंखरंच आहे का हो विश्वास.?आता कुणावरही विश्वास ठेवू नये असं वाटतं. कशाला ठेवावा कुणावर तरी विश्वास. फकत असावा स्वतःचा स्वतःवर विश्वास. नका ठेवू कोणावरही विश्वास. कारण जगात आहे सर्वत्र अविश्वास. कशाला शोधताय या कठोर दुनियेत विश्वास? शोधायच असेल तर स्वार्थ शोधा.शोधायच असेल तर अत्याचार शोध.शोधायचा असेल तर अविश्वास शोधा.कशाला शोधताय विश्वास?खरंच आहेत का हो विश्वास ठेवावा असे दिवस? नाही, नाही खरंच नाही, विश्वास… कारण विश्वास तर पानिपतच्या युद्धातच गेला म्हणून मित्रहो म्हणतो, “कशाला शोधताय विश्वास……? कशाला शोधताय विश्वास….?”
श्री.नाब्दे शशिकांत नामदेव (सह-शिक्षक )
सरस्वती विद्यालय पानगांव ता.रेणापूर जि.लातूर.
मो.नं. ८०५५८५७९८१
उपसंपादक
संतोष सेलूकर
परभणी