जेव्हा साहेब येतात

जेव्हा साहेब येतात……….
सकाळची साधारण आकराची वेळ…..जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा परिसर…..अभ्यासात आणि कृती उपक्रमांत विद्यार्थी मग्न…… तर शिक्षक शिकविण्यात दंग….
एवढयात गावक-यांचा भला मोठा लोंढा एका जीपच्या मागे शाळेकडे येत होत.पाहता पाहता ती जीप माझ्याच वर्गाच्या दारात येऊन थांबली.जीपमधून सन्माननीय सिईओ  बी.पी.पृथ्वीराज साहेब खाली उतरले अन् थेट बाजूच्या सातवीच्या वर्गात गेले.सातवीचे वर्गशिक्षक भागाकाराचा सराव घेत होते.त्यांना बाजूला करत स्वत: सिईओ साहेबांनी खडू हातात घेऊन भागाकाराची काही उदाहरणे फळ्यावर लिहिली.त्यांची उदाहरणे फळ्यावर लिहिणे होत आहेत तो पर्यंतच काही चपळ विद्यार्थ्यांचे हात उत्तर सांगण्यासाठी वर सरसावलें. विद्यार्थ्यांची चपळाई पाहून सिईओ साहेबांची उत्सुकता वाढली.त्यांची अचूक उत्तरे पाहून साहेबांनी समाधान व्यक्त केले.
यानंतर साहेबांचा मोर्चा वळला तो माझ्या वर्गाकडे.एकाच खोलीत दोन वर्ग : तिसरा व चौथा. तिसरीची मुले इंग्रजी शब्दपटट्या वाचनाचा जोडीमध्ये सराव करत होती.तर चौथीची मुले इंग्रजीचा पाठ वाचण्यात दंग होती.वर्गात येताच साहेबांनी हिंदीमध्ये बोलण्यास सुरूवात केली. “कौनसी क्लास है ? क्या पढाई हो रही है ?” पण विद्यार्थ्यांकडून मात्र काहीच प्रतिसाद नाही.मग माझ्याच लक्षात आले की, हिंदी भाषा मुलांना काही समजत नाही.मी साहेबांना वर्गाची ओळख करून दिली.आणि मुले कोणता अभ्यास करत आहेत हे सांगितले.एवढयात माझी नजर वर्गाच्या खिडकीकडे गेली.माझ्या वर्गाचे चित्र कमीतकमी पंधरा ते वीस सेलफोन्सच्या कॅमे-याच्या चौकटीत बंदिस्त होत होते.मुलांच्याही नजरेतून ही गोष्ट सुटली नव्हती.चौथीच्या मुलांनी न अडखळता मायाज ड्रीम हा पाठ साहेबांना वाचून दाखवला.साहेबांचे गुड,.. नाईस असे कौतुक ऐकून मुलांचा आणि माझाही हुरूप वाढला.तिसरीच्या विद्यार्थ्यांनी कृतियुक्त इंग्रजीच्या कवितेचे सादरीकरण केले.कृतिमुळे इंग्रजी शब्दांचे अर्थ मुलांना समजले आहेत हे साहेंबांच्या लक्षात आले.त्यामुळे ऐकणा-या सर्वांवर ती कविता प्रभाव टाकून गेली.वर्गात फिरत असतांना साहेबांनी वेन्सडे चे कार्ड उचलले.आणि एका मुलाच्या हातात देऊन त्याला वाचावयास लावले.तो मुलगा अत्यंत लाजाळू, अबोल होता. पण एका झटक्यात त्यांने ते स्पेलींग मोठ्याने वाचले अन वेन्सडे म्हणून सांगितले.तेव्हा साहेबांनी त्याला दिलेली कौतुकाची थाप जणू काही आम्हा शिक्षकांनाच मिळाली होती.
माझ्या चौथीच्या वर्गात मोनिका नावाची मुलगी घरच्या परिस्थितीमुळे दोन वर्षाच्या आपल्या बहिणीला घेऊन दररोज शाळेत यायची.सामान्‌यत: शिक्षकांची मानसिकता अशी असते की दररोज लहान भावंडं सोबत शाळेत आणणा-या विद्यार्थ्यांस शिक्षक रागावतात. पण तिची बहीणही शाळेच्या वातावरणात छान रमली होती म्हणून मला मोनिकाला त्या मुलीला शाळेत आणू नको असे म्हणावेसे वाटत नव्हते शिवाय ती आमच्या वर्ग प्रक्रियेत छान प्रतिसादही देत होती. मोकळेपणाने वर्गात वावरत होती.ती दररोज वर्गातच झोपायची. आजही साहेब आले तेंव्हा ती वर्गात गाढ झोपलेली होती.आता तीला वर्गात झोपलेली पाहून साहेब   रागावतील या भितीने मी तिला बेंचवर पांधरून घालून झोपवले.पण वर्गात सगळीकडे फिरतांना साहेबांना ती झोपलेली दिसली.हा काय प्रकार आहे असे त्यांनी विचारल्यावर मोनिकाला शाळेत आपलया छोटया बहिणीला घेऊन येणे भागच आहे,जर तिने बहिणीला शाळेत आणले नाही तर मोनिकालाच बहिणीला सांभाळण्यासाठी घरी रहावे लागले असते. परिणामी ती शाळाबाह्य झाली असती.असे जेव्हा आम्ही साहेबांना सांगितले तेव्हा रागवायचे सोडून त्यांनी मुलीचे कौतुक केले की एवढी छोटी मुलगी दिवसभर आपल्या बहिणीला सांभाळून शाळा करते व अभ्यासही करते. त्या मुलीला शाळेत बसण्यास परवानगी देऊन शाळाबाह्य होण्यापासून वाचवले त्यामुळे शिक्षकांचे सुदधा साहेबांनी कौतुक केले.
जेव्हा साहेब येतात…….
तेव्हा विद्यार्थ्यांसह शिक्षकांचीही तारांबळ उडते.पण आमच्या शाळेतील सिईओ साहेंबांच्या भेटीचे हे अनमोल क्षण आमच्यातील उत्सुकता वाढवणारे व प्रेरणादायी ठरले.आता तर नेहमीच माझे विद्यार्थी असे विचारतात की आमचे मार्क पहायला सिईओ साहेब कधी येणार? आमच्या विद्यार्थ्यांसाठी व शाळेसाठी जेंव्हा साहेब येतात ते क्षण आनंददायी आणि प्रेरणादायी नक्कीच ठरले 
                                        सारिका काळवीट
                                        प्रा शिक्षक जि.प.प्रा.शा बलसा बु.
                                         ता. पूर्णा जि. परभणी 
                                         मो .8975722385
                                         इमेल.sarikakalwit@gmail.com 

उपसंपादक संतोष सेलूकर ,परभणी
7709515110