कविता माझी मुलगी

"माझी मुलगी" कवी प्रदीप निफाडकर यांची ही मुलीवरची कविता....( मात्र दुर्दैवं हे की पुण्यात अपघातात निफाडकर यांची मुलगी प्रांजली हिचे  निधन झाले.प्रांजलीचे नुकतेच लग्न झाले होते तिला दीड वर्षाचे बाळ आहे.)
माझी मुलगी

जागोजागी भेटत असते माझी मुलगी
कोणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी

तिला न रुचते नटणे-बिटणे तरी नेहमी
परीसारखी सुंदर दिसते माझी मुलगी

मला मिळाले किती चांगले आई-बाबा
मैत्रिणींना सांगत असते माझी मुलगी

हळूहळू मग चालतात हे वादळवारे
झोक्यावरती जेव्हा बसते माझी मुलगी

कर्जाचा हा डोंगर थोडा हलण्यासाठी
मुलासारखे राबत असते माझी मुलगी

चित्र काढते, पोळ्या करते, गाणे गाते
दु:खालाही खुशाल पिसते माझी मुलगी

गळ्यात माझ्या घास उतरण्या नाही म्हणतो
अवती भवती जेव्हा नसते माझी मुलगी

घरी यायला मला जरासा उशीर होता
आईसोबत जागत बसते माझी मुलगी

तिला लागली गझलांची या खोड आगळी
हळूच रात्री कुशीत घुसते माझी मुलगी

आठवते मज माझी आई अशीच होती
जेव्हा माझे डोळे पुसते माझी मुलगी

तिला न्यायला राजकुमारा उशिरा ये तू
अजुनी मजला अल्लड दिसते माझी मुलगी

 प्रांजलीला भावपूर्ण श्रध्दांजली🙏🏼🙏🏼